Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 January, 2010

पेडणे केरी जत्रेतील जुगार पोलिस रोखू शकतील ?

अधीक्षकांनाच जनतेचे आव्हान

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - राज्यात अंमलीपदार्थांचा वापर अजिबात होत नाही, असा छातीठोकपणे दावा करून गृहमंत्री रवी नाईक यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेतच, पण आता गृहमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून वरिष्ठ पोलिस अधिकारीही त्यांचाच कित्ता गिरवू लागले आहेत. पेडणे तालुक्यात जत्रौत्सवांनिमित्त खुलेआम जुगार चालतो हे पूर्ण सत्य आहे व या भागातील शेंबड्या पोरालाही ते ठाऊक आहे, पण उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी मात्र माहिती हक्क कायद्याखाली दिलेल्या उत्तरात पेडणे भागांत जत्रौत्सवांना अजिबात जुगार चालत नाही, असा दावा करून मुर्दाडपणाचा कळसच गाठला आहे. आता या तालुक्यातील अखेरची जत्रा केरी येथे होणार आहे, त्यावेळी पोलिस कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पेडणे तालुक्यातील शेवटची व प्रसिद्ध समजली जाणारी पेडणे तालुक्यातील केरी येथील श्री देव आजोबा देवस्थानची जत्रा येत्या २९ रोजी साजरी होणार आहे. या जत्रोत्सवाला हजारोंच्या संख्येने भाविक येतात. केरी हा गाव महाराष्ट्राच्या सीमेला टेकून आहे व त्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व दोडामार्ग तालुक्यातूनही मोठ्या संख्येत लोक येतात. जुगाराच्या बाबतीतही ही जत्रा प्रसिद्द आहे व या जत्रेला लाखो रुपयांची उलाढाल होते. खुद्द देवस्थान समितीला जुगारातून किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळते, अशी माहिती आहे. या जुगारासाठीचे "सेटिंग' थेट वरिष्ठ पातळीवरून होते अशीही खबर आहे. अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी पेडण्यात जुगार चालत नाही असा दावा केल्याने ही जत्रा त्यांच्यासाठी एक आव्हान ठरणार आहे.
पेडणे तालुक्यात जुगाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या जुगारामुळेच इथे वेश्याव्यवसायही चालतो. येथील युवा पिढी नकळतपणे याकडे ओढली जात असताना या भागातील समाजही या घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. या जुगाराला स्थानिक पंचायतींपासून ते देवस्थान समिती व इतर अनेकांचा पाठिंबा मिळतो व त्यामुळे त्याविरोधात बोलण्याचे धाडस कुणीच करीत नाही. पेडणे तालुक्यात एकार्थाने बुद्धिवादी व विचारवंतांनी या प्रकारासमोर सपशेल नांगी टाकली आहे की काय अशी दारुण परिस्थिती ओढवली आहे. "मांद्रे सिटीझन फोरम' कडून हा विषय हाताळण्याचा निर्णय झाला. या भागातील नव्या दमाच्या तरुणांनी किमान मांद्रे गावात जुगाराला बंदी घालण्यासाठी प्रयत्न चालवले पण त्यांचीही सतावणूक सुरू झाली. प्रशासकीय यंत्रणा व पोलिसांच्या मदतीनेच हा प्रकार चालतो व त्यामुळे फोरमच्या कार्यकर्त्यांसमोरही पेचप्रसंग निर्माण झाला आहे. फोरमला या लढ्यात येथील स्थानिक जनतेची साथ मिळत नसल्याने ते काही प्रमाणात निराश झाले आहेत.
मांद्रे गावातील सुदेश सावंत या युवकाने माहिती हक्क कायद्याखाली उघडपणे सुरू असलेल्या बेकायदा जुगाराबाबत पोलिस खात्याकडे माहिती मागितली. यासंबंधी बॉस्को जॉर्ज यांनी दिलेली माहिती केवळ धक्कादायकच नव्हे तर निखालस खोटारडेपणाचा कळस गाठणारीच ठरली आहे. पेडणेत जुगार अजिबात चालत नाही व जिथे जुगार चालतो तिथे पोलिस तात्काळ कारवाई करतात, असा खोटा दावा त्यांनी केला आहे. २९ व ३० ऑक्टोबर २००९ रोजी मांद्रे येथे श्री देवी भगवती सप्ताहानिमित्त जुगार चालू नव्हता व याठिकाणी सुमारे १३ पोलिसांची कुमक नजर ठेवण्यासाठी होती, असेही श्री.जॉर्ज यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात मात्र पोलिसांच्या उपस्थितीत तेथे मोठ्या प्रमाणात जुगार सुरू होता व त्याचे छायाचित्रणही "फोरम'च्या सदस्यांनी करून ठेवले आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग भागांत तेथील पोलिसांनी जुगारावर पूर्ण बंदी आणली आहे. गोवा पोलिसांना याबाबत काहीच माहिती नाही,असाच आव त्यांनी आणला आहे. पोलिस खात्याकडे जुगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगळे धोरण नाही. केवळ गोवा दमण व दीव जुगार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी पोलिस करतात, असेही जॉर्ज यांनी स्पष्ट केले आहे. जॉर्ज हे एक कर्तबगार व प्रामाणिक पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात; तथापि, त्यांच्याकडूनच जेव्हा अशी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली जाते तेव्हा पोलिस खात्यात नेमकी काय दारुण परिस्थिती बनली आहे याचेच दर्शनच घडते. या खुलेआम चालणाऱ्या जुगाराला पूर्णपणे राजकीय आश्रय मिळतो व या जुगाराला विरोध करणारा राजकीय नेता आपल्या "मतपेढी' च्या काळजीने धास्तावतो अशीच परिस्थिती आहे.

No comments: