Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 January, 2010

राज्यात अंमलीपदार्थांचा वापर नाहीच


गृहमंत्र्यांचे अजब तर्कट


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)- राज्यात अंमलीपदार्थांचा अजिबात वापर होत नाही व या बाबतीत होणारी टीका निरर्थक आहे, असा अचंबित करणारा हास्यास्पद दावा गृहमंत्री रवी नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. गोव्यात अंमलीपदार्थांचे उत्पादन नाही. इथे अंमलीपदार्थ इतर भागांतून आणले जात असले तरी अशा लोकांना पोलिसांनी वेळोवेळी ताब्यात घेतले आहे. राज्यात अंमलीपदार्थांचे सेवन केले जाते हे देखील सत्य नाही, एवढ्यापर्यंत जाऊन रवी नाईक यांनी या बाबतीत होणारे सगळे आरोप फेटाळून लावले.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या आरोपांमुळे तिळपापड झालेल्या गृहमंत्री रवी नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत राज्यात अंमलीपदार्थांचा व्यवहार, वेश्या व्यवसाय आदी काहीच चालत नाही, असा दावा त्यांनी केला. या प्रसंगी उत्तर गोवा अधीक्षक बॉस्को जॉर्ज, अंमलीपदार्थविरोधी पथकाचे अधीक्षक वेणू बन्सल व पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी हजर होते. यावेळी पत्रकारांनी अंमलीपदार्थांच्या वापराबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले व त्यांचा हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. विधानसभेत विरोधकांचे आरोप फेटाळावेत त्याप्रमाणेच त्यांनी पत्रकारांचेही आरोप फेटाळून लावत आपले म्हणणेच उचलून धरण्याचा प्रयत्न केला.
पोलिस कारभारात आपण अजिबात हस्तक्षेप करीत नाही. कांदोळी येथील "सनबर्न' पार्टीवेळी पोलिस महानिरीक्षकांनी छापे टाकण्याचे आदेश दिलेच नव्हते, असा दावा रवी नाईक यांनी केला. आपण हे आदेश रोखले हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. हा आरोप सिद्ध केल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ पण ते खोटे ठरल्यास पर्रीकरांनी विरोधी पक्षनेतेपद सोडावे, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले. कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नाही. "सनबर्न' पार्टीबाबतही त्यांच्या आरोपांत काहीही दम नाही. आग्नेल यांनी आत्तापर्यंत एकदाही पोलिसांना का माहिती दिली नाही, असा खोचक सवाल त्यांनी केला. यावेळी उपस्थित बॉस्को जॉर्ज व वेणू बन्सल यांनी आग्नेल यांच्याकडून एकदाही माहिती मिळाली नसल्याच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब करून आग्नेल यांना तोंडघशी पाडले.
गेल्या वर्षी पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ पकडून एकूण २४ लोकांना ताब्यात घेतले. दरम्यान, मेहा बहुगुणा ही तरुणी अंमलीपदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत झाल्याचा दावाही रवी नाईक यांनी खोडून काढला. तिचा वैद्यकीय अहवाल अजून पोलिसांना मिळालेला नाही पण ती आणखी कसल्यातरी दुखण्याने आजारी होती, असेही ते म्हणाले. "सनबर्न'मधील पार्टीत काय घडले हे "सीसीटीव्ही'वरून कळणार. या "सीसीटीव्ही'ची पाहणी पोलिस करीत असल्याचेही यावेळी बॉस्को जॉर्ज यांनी सांगितले.
"एनसीबी' चे निरीक्षण चुकीचेः बस्सी
"नार्कोटिक्स काऊन्सील ब्यूरो' (एनसीबी) यांनी गोवा राज्य हे अंमलीपदार्थ तस्करीचे प्रमुख केंद्र बनत असल्याचा निष्कर्ष काढला होता. हा निष्कर्ष पूर्णपणे चुकीचा असल्याचा दावा पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी केला. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती कांदोळी येथील "सनबर्न' पार्टीत अंमलीपदार्थांचा अजिबात वापर झाला नाही, असेही ते म्हणाले.
"कॅटामाईन' या गोळ्या औषधांचाच एक भाग आहे पण त्याचा वापर नशेसाठी केला जातो. हा विषय आरोग्य खात्याअंतर्गत येतो व तो त्यांनी हाताळावा. पोलिसांची मदत हवी असल्यास ती देण्यास तयार असल्याचेही यावेळी बस्सी म्हणाले.

No comments: