Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 17 December, 2009

माहिती संचालकांना निलंबित कराः पर्रीकर

पुस्तिका छपाई भ्रष्टाचारप्रकरण
पणजी, दि.१६ (विशेष प्रतिनिधी): दिगंबर कामत सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचे गोडवे गाणाऱ्या पुस्तिकांच्या छपाईत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला असून,त्यात खुद्द माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक गुंतले असल्याचा सनसनाटी आरोप आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत केला.विरोधी पक्षनेत्याच्या या गंभीर आरोपामुळे माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या गलथान आणि भ्रष्टाचारी कारभाराची जणू लक्तरेच आज वेशीवर टांगली गेली.
या खात्याचे संचालक मिनीन पिरीस यांचा या १४-१५ लाखांच्या भ्रष्टाचारात हात असल्याचा आरोप करून त्यांना या पदावरून ताबडतोब निलंबित करावे व निःपक्षपातीपणे या घोटाळ्याची चौकशी करावी अशी जोरदार मागणी पर्रीकरांनी यावेळी केली.
प्रसंगाचे व पर्रीकरांनी केलेल्या आरोपांचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.अशी चौकशी सुरू करण्यापूर्वी संचालकांना तेथून हलवा अन्यथा ते सर्व पुरावे नष्ट करतील असा इशारा पर्रीकरांनी श्री.कामत यांना दिला.
एकाच प्रकारच्या पण गोलमाल करण्याच्या उद्देशाने दोन वेगवेगळ्या पद्धतींनी छापल्या गेलेल्या पुस्तिका सभागृहात दाखवीत पर्रीकरांनी प्रश्न केला "खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच खात्यात असा भ्रष्टाचार होतो ही अत्यंत शरमेची बाब आहे. दोन वर्षांचा आढावा प्रसिद्ध करताना एवढा मोठा घोटाळा, तर मग यापुढे काही विचारायलाच नको', असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लगावला.
आज प्रश्नोत्तराच्या तासाला काणकोणचे आमदार विजय पै खोत यांनी लेखी स्वरूपात हा प्रश्न उपस्थित करून माहिती आणि प्रसिद्धी खात्याला कोंडीत पकडले.
दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने दोन वर्षे पूर्ण केली म्हणून माहिती आणि प्रसिद्धी खात्याने सरकारच्या कार्याचा आढावा घेणारी एक ४४ पानी पुस्तिका तयार केली होती व त्याच्या सुमारे ४०,००० प्रती इंग्रजी,मराठी व कोकणी भाषांतून सरकारपक्षीय मंत्री आणि आमदार, कॉंग्रेस कार्यकर्ते, नगरपालिका व पंचायतींना वाटल्या होत्या. पैकी ज्या पुस्तिका मंत्री आणि आमदारांना वाटल्या गेल्या त्या पूर्ण ४४ पानी आणि सर्व पानांवर मजकूर असलेल्या होत्या तर नगरपालिका आणि पंचायतींना वाटल्या गेलेल्या पुस्तिकांची फक्त २२-२४ पाने छपाईने भरलेली होती व बाकी सुमारे २२ पाने अगदी कोरी होती.अशा स्वरूपाच्या कोरी पाने असलेल्या पुस्तिका आज विरोधी पक्ष नेते व आमदारांनी गोळा करून सभागृहात आणल्या व या भ्रष्टाचारावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
सक्षम अधिकारिणीने या पुस्तिकेच्या बिलावर शिक्कामोर्तब केले आहे असे जरी दाखविले गेले असले, तरी ती शिक्कामोर्तब करणारी व्यक्ती खरोखरच सक्षम अधिकारिणीचे हक्क असणारी होती काय, असाही सवाल विरोधी पक्ष आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केला. ४४ पानाच्या या रंगीत पुस्तिका रु.५० प्रमाणे छापल्या गेल्या आहेत तर २२ पानी रंगीत पुस्तिका बाजारात सुमारे २२ रुपयांनी छापून मिळतात, मग वरचे लाखो रुपये कोणी खिशात घातले असे विचारुन पर्रीकरांनी सरकारला निरुत्तर केले.

No comments: