Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 12 October, 2009

लेखनात गुणात्मक वाढ व्हावी - विद्या बाळ

महिला साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) - लेखकांच्या संख्येने वाढ होत आहे. मात्र, लिखाणात गुणात्मक वाढ झालेली दिसत नाही, कसदार साहित्य निर्मितीसाठी वाचन, मनन आणि चिंतनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक विद्या बाळ यांनी आज दुपारी येथे केले आहे.
खडपाबांध फोंडा येथील श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेने गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या आल्मेदा विद्यालय सभागृहात आयोजित ७ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे समई प्रज्वलित करून उद्घाटन केल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक विद्या बाळ बोलत होत्या. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री, निर्माती स्मिता तळवलकर, विशेष अतिथी म्हणून मोनिका गजेंद्रगडकर, स्वागताध्यक्ष सौ. मंदा बांदेकर, आयोजन समितीच्या अध्यक्षा श्रीमती माधवीताई देसाई, श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन देव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
विद्या बाळ पुढे बोलताना म्हणाल्या, आजच्या काळात लेखक लिखाण केल्यानंतर ताबडतोब प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी माध्यमाकडे पाठवून देतो. आजच्या काळात माध्यमाच्या संख्येत वाढ झालेली असल्याने लेखकाचे लिखाण कुठं ना कुठे छापून येते. लेखकाने आपल्या प्रसिद्ध झालेल्या लेखनाचे वाचन करून त्यांच्या गुणात्मकतेवर विचार केला पाहिजे. लेखकाने प्रसिद्धीचा मोह टाळला पाहिजे. कसदार लेखनासाठी मान्यवर लेखकांच्या साहित्याचे वाचन केले पाहिजे. लेखकाने लेखन करताना आत्मशोध घेण्याची गरज आहे. लेखकाने साहित्य निर्मिती केल्यानंतर ताबडतोब प्रसिद्धीसाठी पाठवू नये. त्या लेखनाचा पुन्हा वाचन करून साहित्य निर्मिती आणखी कसदार कशी होईल यासाठी चिंतन केले पाहिजे, असेही विद्या बाळ यांनी सांगितले. विद्या बाळ यांनी आपल्या भाषणात महिला लेखिकांसाठी कसदार लेखनासंबंधी मौल्यवान सूचनाही केल्या. महिलांनी जीवनातील अनुभव शब्दबद्ध करावेत, असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी केले. महिला साहित्य संमेलन हे महिलांची दिवाळी पूर्वीची अक्षरांची दिवाळी आहे. महिलांनी महिलांसाठी आयोजित केले जात असलेले एकमेव साहित्य संमेलन आहे. ह्या संमेलनाच्या माध्यमातून गोव्यातील महिलांच्या सुप्त लेखन व कला गुणांना वाव मिळू शकतो. महिलांना आपले लेखन सादरीकरणासाठी व्यासपीठ सुध्दा उपलब्ध झाले आहे, असे डॉ. कार्व्हालो यांनी सांगितले.
स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार झाला पाहिजे. साहित्य हा समाजाचा आसरा आहे. त्यामुळे महिलांचे जीवन सुध्दा साहित्यात शब्दबद्ध झाले पाहिजे. महिलांनी जीवनात सोसलेले त्रास, कष्ट याचे चित्रण होणे आवश्यक आहे, असेही कार्व्हालो यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष डॉ. कार्व्हालो यांनी आपल्या भाषणात साहित्यातील स्त्री साहित्याचा आढावा घेतला.
स्वत्व जपणाऱ्या महिला या समाजात आहेत. फोंड्यातील महिलांनी महिलांच्या अंगातील लेखन गुणांना चालना देण्यासाठी हाती घेतलेला साहित्य संमेलनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे अभिनेत्री, निर्माती स्मिता तळवलकर यांनी सांगितले.
छोट्या दिव्याने अनेक दिवे उजळले जातात. त्याचप्रमाणे या लहानशा महिलांच्या साहित्य संमेलनातून महिलांच्या अंगातील सुप्त लेखन गुणांना चालना मिळू शकते. महिला साहित्य संमेलन हा स्त्री शक्तीचा उत्कट सोहळा असून महिला एकत्र झाल्यास काय करू शकतात. हेच फोंड्यातील महिलांनी साहित्य संमेलनाचे आयोजन करून दाखवून दिले आहे, असे मोनिका गजेंद्रगडकर यांनी सांगितले.
या महिला साहित्य संमेलनात वाघिणीशी झुंज देऊन वाघीण पकडण्यासाठी साहाय्य करणाऱ्या काणकोण येथील श्रीमती रंगावती वेळीप या महिलेचा स्मिता तळवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिळून साऱ्याजणी दिपावली विशेषांक २००९ चे प्रकाशन स्मिता तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. डॉ. पूर्णिमा उसगावकर यांच्या "आरोग्य टिप्स' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या उत्कृष्ट बाल वाचक पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी साहित्यिक महाबळेश्र्वर सैल, हरिश्चंद्र खोलकर यांचा सन्मान करण्यात आला.
बा.भ. बोरकर यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त व्यासपीठाला कै. बा.भ. बोरकर यांचे नाव देण्यात आले होते. तसेच व्यासपीठाची सजावटीसाठी पोफळीची झाडे आणि सुपाऱ्यांचा वापर करण्यात आला होता. बा.भ. बोरकर यांची लेखन कार्याची माहिती देणारे भित्तिपत्रक सभागृहात लावण्यात आले होते. तसेच गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्याची माहिती देणारे भित्तिपत्रक सुध्दा सभागृहात लावण्यात आले होते.
संमेलनाच्या सुरुवातीला कु. नेहा करमरकर हिने शारदास्तवन सादर केले. सौ. मंदा बांदेकर यांनी स्वागत केले. डॉ. पूर्णिमा उसगांवकर, सौ. गीता सोमण, अरुणा बधोरिया, स्मिता नाईक, सरिता दळवी, भारती चौगुले, विजया दीक्षित, वंदना जोग, सौ.लक्ष्मी जोग यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माधवी देसाई यांनी प्रास्ताविक केले. महिलांमध्ये साहित्याची आवड निर्माण करणे, महिलांना लिहिते आणि बोलते करण्यासाठी ह्या संमेलनाचा आयोजन दरवर्षी केले जात आहे, असे माधवी देसाई यांनी सांगितले. सूत्रसंचालन संगीता अभ्यंकर यांनी केले. शेवटी डॉ. नूतन देव यांनी आभार मानले.
या संमेलनात "स्पंदने दोन पिढ्यांची...' या परिसंवादात विद्या बाळ, माधवी देसाई, कादंबरी कुलकर्णी, सौ. पौर्णिमा केरकर, प्रांजली देसाई यांनी भाग घेतला. कथाविष्कार सत्रात मोनिका गजेंद्रगडकर यांनी कथा लेखनाबाबत मार्गदर्शन केले.

No comments: