Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 17 October, 2009

'मिंट कॅसिनो'च्या उपाध्यक्षाला अटक

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने आज सकाळी केलेल्या एका कारवाईत "मिंट कॅसिनो'चा उपाध्यक्ष संजय कौशिक (४०) याला मानवी तस्करी कायद्याखाली अटक केली व त्याच्या खोलीतून एका २३ वर्षीय मुलीला ताब्यात घेतले.
या मुलीची मेरशी येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मिंट कॅसिनोचा हा अधिकारी मुली आणून गोव्यात पुरवत असल्याची माहिती मिळाल्याने सीआयडीने आज सकाळी नागाळी येथील एका हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी संशयित कौशिक याच्या खोलीत ही तरुणी सापडली अशी माहिती उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी दिली.
तथापि, या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गृहखात्याचे सचिव सिद्धिविनायक यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी पथकाने मिंट कॅसिनोवर छापा टाकला होता. तेव्हा पोलिसांना त्याठिकाणी काहीही हाती लागले नव्हते. त्यामुळे पोलिस हात हालवत माघारी फिरले होते. बंद असलेल्या कॅसिनोत बेकायदा जुगार चालत असल्याची माहिती मिळाल्याने हा छापा टाकण्यात आला असल्याचे सीआयडीने पत्रकारांना सांगितले होते. तसेच कॅसिनो चालवण्यासाठी सरकारी तिजोरीत पाच कोटी रुपये भरावयाचे शुल्क या कॅसिनोने भरले नसल्याने त्यास सरकारतर्फे नोटिसही बजावली होती.
या घटनेनंतर आज अचानक सकाळी संशयित कौशिक राहात असलेल्या हॉटेलातील खोलीवर छापा टाकून पोलिसांनी तेथून एका तरुणीला ताब्यात घेतल्याने या प्रकरणामागे भलतेच राजकारण शिजत असल्याची चर्चा आज सर्वत्र सुरू होती. त्या तरुणीचा कौशिक याच्याशी कोणताही संबंध प्रस्थापित झाला नसला तरी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कौशिक याला अटक केल्याचे सांगण्यात आले.
तो गोव्यात मुली आणून व्यवसाय करीत होता काय, या दिशेने तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------
मिंट कॅसिनोच्या उपाध्यक्षाला कथित सेक्स रॅकेट प्रकरणात अटक केल्याप्रकरणी असोसिएशन ऑफ ऑफशोअर कॅसिनो (एओसी) व कॅसिनो असोसिएशन ऑफ गोवा (सीएजी)ने तीव्र निषेध केला आहे. सरकारी नियम न पाळल्याच्या कारणास्तव मिंट कॅसिनो बंद आहे. मात्र अशावेळी जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीकडून दाखल केलेल्या तक्रारीमुळे एकूण उद्योगालाच फटका बसल्याचे संघटनेने म्हटले आहे. कॅसिनो संघटना कोणत्याही प्रकारच्या चौकशीला किंवा तपासणीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते नरिंदर पुंज यांनी पत्रकात म्हटले आहे.

No comments: