Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 October, 2009

निकष न ठरविताच चित्रपटांची निवड?

प्रभाकर क्रिएशनतर्फे कायदेशीर नोटीस
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)- आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या "इंडियन प्रिमियर' विभागात निवड झालेल्या चित्रपटांची यादी उद्या ३० रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी आज येथे दिली. दरम्यान, कोणतेही निकष जाहीर न करता ही निवड करण्याच्या पद्धतीला "प्रभाकर क्रिएशन'ने आक्षेप घेत श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
या विभागासाठी एकूण पंचवीस चित्रपटांचे अर्ज आले होते. त्यातून सात चित्रपट निवडण्यात आले असून त्यात काही गोमंतकीय चित्रपटही आहेत. मात्र हे चित्रपट कोणते ते उद्याच जाहीर केले जाईल असे श्रीवास्तव यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची या निवडीला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या विभागासाठी कोणतेही नियम व अटी निश्चित केल्या नसल्याचा आरोप करून स्थानिक चित्रपट निर्मात्यांनी या विभागाची निवड प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली होती. स्थानिक चित्रपट निर्मात्यांच्या आक्षेपामुळे इफ्फीचा हा विभाग वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्या पार्श्वभूमीवर श्रीवास्तव यांना छेडले असता त्यांनी त्यासंदर्भात मला कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही असे स्पष्ट केले.
नियमबाह्य काहीही घडलेले नाही असे सांगून श्रीवास्तव म्हणाले की, या विभागासाठी संस्थेने वेगळी नियमावली तयार केली नाही. जे नियम आधीपासून अमलात आणले आहेत त्यांच्या आधारेच चित्रपटांची निवड झाली आहे. हे नियम चित्रपट महोत्सव संचालनालयही तयार करत नसल्याचे सांगून सदर नियम हे माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत तयार केले जातात असे ते म्हणाले. शिवाय ही नियमावली चित्रपट संचालनालयाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.यंदाच्या इफ्फीसंदर्भात कोणतीही कायदेशीर नोटीस तूर्तास तरी आपल्याला मिळाली नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
परंतु चित्रपट संचालनालयाच्या संकेतस्थळाला भेट दिली असता केवळ इंडियन पॅनोरमा विभागाची पूर्ण नियमावली व माहिती उपलब्ध असल्याचे यावेळी दिसून आले. इंडियन प्रिमियर विभागाविषयी कोणतीही माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याचे जाणवले. खुद्द मनोरंजन संस्थेच्या संकेतस्थळावरही याविषयी कोणताही उल्लेख नसल्याचे दिसून आले.
दरम्यान, सिने सृष्टीशी संबंधित काही जाणकारांशी संपर्क साधला असता त्यांनी इफ्फी हा सरकारी निधीतून साजरा होत असल्याने त्याच्या आयोजनासंबंधी पारदर्शकपणे हाताळणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले. चित्रपट निवडीसाठी अटी व नियम असणे गरजेचे असल्याचेही मतही बहुतेकांनी व्यक्त केले. श्रीवास्तव यांच्या म्हणण्याविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सरकारी अधिकाऱ्याने जबाबदारपणे वक्तव्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचा टोला हाणला.
गोवा मनोरंजन संस्थेला कायदेशीर नोटीस
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन प्रीमियर विभागात चित्रपटांची निवड करण्याच्या प्रक्रियेत अजिबात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत "प्रभाकर फिल्म्स' चे मालक ज्ञानेश्वर गोवेकर यांनी आपल्या वकिलांमार्फत गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. "प्रभाकर फिल्म्स' तर्फे "हॅलो गंधे सर' या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवात "इंडियन प्रिमिअर' विभागात कोणत्या नियमानुसार चित्रपटांची निवड केली जाते, याचा खुलासा मागण्यात आला आहे. या विभागासाठी अर्ज करण्यासाठी ही माहिती हवी असल्याचे सांगून हे कायदे व नियम वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात यावेत जेणेकरून या विभागासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला ही माहिती मिळेल,असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, ही नियमावली सादर करण्यापूर्वी या विभागाची यादी जाहीर करण्यासही या नोटिशीत विरोध करण्यात आला आहे. मुळात या विभागाबाबत गोवा मनोरंजन संस्थेतर्फे कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. केवळ काही वृत्तपत्रांवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवरूनच याबाबतची माहिती चित्रपट निर्मात्यांना कळली. हा चित्रपट महोत्सव सरकारी पैशांतून साजरा केला जात असल्याने सर्व व्यवहारांबाबत पारदर्शकता बाळगणे गरजेचे आहे,असेही सुचवण्यात आले आहे.

No comments: