Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 28 October, 2009

हरिहरन यांचे ८ रोजी गझलगायन

विशेष मुलांच्या मदतीसाठी 'दिशा'तर्फे आयोजन
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): विशेष मुलांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या व त्यांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी धडपडणाऱ्या " दिशा चॅरिटेबल ट्रस्ट' च्या निधिसंकलनासाठी ख्यातनाम गझलगायक पद्मश्री हरिहरन यांचा गोव्यातील पहिलावहिला गझल गायनाचा कार्यक्रम ८ नोव्हेंबर रोजी कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
'स्वस्तिक ' या कला-सांस्कृतिक क्षेत्रातील लोकप्रिय संस्थेने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून पहिल्यांदाच एका सेवाभावी संस्थेच्या निधिसंकलनासाठी ही संस्था वावरणार आहे. प्रवीण गांवकर व देवानंद मालवणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी "दिशा चॅरिटेबल ट्रस्ट' च्या व्यवस्थापिका संध्या साळोंखे व आदरातिथ्य भागीदार हॉटेल मॅरीएटच्या कुमारी रूबानी हजर होत्या. ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेला सुमारे दोन लाख रुपये निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे."दिशा चॅरिटेबल ट्रस्ट' ही संस्था विशेष मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी विविध उपक्रम राबविते व त्यासाठीच त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन व हातभार लावण्यासाठीच संस्थेने हा निधी उभारण्याचे काम हाती घेतले आहे.विशेष मुले व त्यांचे पालक यांच्यासमोर अनेक समस्या व अडचणी असतात.अशा कठीण प्रसंगी त्यांना योग्य मार्गदर्शन तथा मार्ग दाखवण्यासाठी दिशा ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात.या कार्यक्रमांना हातभार लागावा हाच हेतू या कार्यक्रमामागे असल्याचे यावेळी श्री.गांवकर यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे साहाय्यक पुरस्कर्ते भारतीय स्टेट बॅंक, गोवा पर्यटन खाते, उद्योजक नाना बांदेकर समूह आदी आहेत.आदरातिथ्य सौजन्य हॉटेल मॅरिएट यांचे लाभणार आहे. विमान व्यवस्था किंगफिशर एयर लाईन्स यांची लाभणार आहे व रेडिओ भागीदार म्हणून रेडिओ मिर्ची यांचा सहभाग असेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. हरिहरन यांनी गोव्यात यापूर्वी कार्यक्रम केले असले तरी गझलांचा हा त्यांचा पहिलावहिला कार्यक्रम असणार आहे. त्यांना तबल्यावर शहादाब भारतीय,गिटारावर संजय दास, सारंगीवर लियाकत अली खान व संवादिनीवर श्री.बुरे साथसंगत करणार आहेत. देणगी कुपनाचे दर १ हजार, पाचशे व तीनशे असे ठेवण्यात आले आहेत. देणगी कुपनांसाठी योगिता कौचर - ९९२३५८२१५३ कला अकादमी तिकीट कक्ष, मडगाव- ९८८१२८६३७७ व अनंताश्रम हॉटेल, वास्को-९८२२१२८७९० यांच्याकडे उपलब्ध असतील. या कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी प्रवीण गांवकर-९४२२०५८१५४ व देवानंद मालवणकर-९८२२२८८२१७ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: