Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 28 October, 2009

तळपण येथे आगडोंब दहा घरे बेचिराख : ऐंशी लाखांचे नुकसान


काणकोण, दि. २७ (प्रतिनिधी): जलप्रलयामुळे हादरलेला काणकोण तालुका नुकताच कुठे सावरत असताना, आज अचानक तळपण या गावात आज दुपारी १२.३० वाजता लागलेल्या भीषण आगीत एकूण दहा घरे भस्मसात झाल्याने पुन्हा एकदा तेथील रहिवाशांवर संकट कोसळले आहे. या आगीत सुमारे ऐंशी लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
येथे असलेल्या गणपतीच्या देवळात आज दुपारी भजनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरू असताना देवळाजवळ असलेल्या दहा घरांना व जाळी, होड्या जिथे ठेवल्या जातात त्या "मांगोरां'ना अचानक आग लागली व त्या आगीत आतील सामान भस्मसात झाले. जळालेल्या घरांपैकी नारायण केळूसकर यांचे घर पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर रवी चरवणकर, दिलखूष ठक्कर, विष्णू केळूसकर, सुनंदा केळूसकर, विठ्ठल मोरजकर, दयानंद ठक्कर यांची घरे अर्धीअधीक जळाली. रवी चरवणकर, गणपत गोवेकर, विश्वनाथ तारी, मनोहर केळूसकर, वसंत केळूसकर, दयानंद ठक्कर आणि सुधाकर आरोंदेकर यांचे होड्या, जाळी इत्यादी सामान असलेले "मांगोर'ही जळून खाक झाले. हे सर्व घडत असताना जवळच असलेले गणपतीचे देऊळ मात्र या आगीतून आश्चर्यकारकरित्या बचावले.
सदर घटनेची माहिती मिळताच मामलेदार विनायक वळवईकर, काणकोण पोलिस आणि अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्मिशामक दलाने महत्प्रयासाने आगीवर ताबा मिळवला. त्यासाठी त्यांना पाण्याच्या तीन बंबांची मदत घ्यावी लागली. मामलेदार श्री. वळवईकर यांनी घटनेची पाहणी करून वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे ऐंशी लाख रुपयांची हानी झालेली आहे. त्याचप्रमाणे "शॉर्ट सर्किट'मुळे ही आग भडकली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सावर्डे व मडगाव येथून अग्निशामक दलाचे बंब मागवण्यात आले. काणकोणचे बंब दोन वेळा पुन्हा भरून आणण्यात आले त्यामुळे एकूण पाच बंब पाणी वापरण्यात आले. एकूण १ कोटीची मालमत्ता वाचवण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी के. डी. सैल यांनी सांगितले. काणकोण पोलिस निरीक्षक सूरज हळर्णकर, उपनिरीक्षक डॅरेन डिकॉस्ता यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.

No comments: