Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 25 October, 2009

मडगाव स्फोट प्रकरणाचा तपास थंडावला

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - मडगाव स्फोट प्रकरणी आठवडा उलटला तरी अद्याप पोलिसांच्या हाती काहीही सापडले नसल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने होत असल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणतात, तर गेले काही दिवस गृहमंत्री रवी नाईक यांनी वक्तव्य करण्याचेच सोडून दिल्याने सरकारातील अंतर्गत मतभेद या चौकशीच्या आड तर येत नसावेत ना,असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
या स्फोटात बळी ठरलेले मालगोंडा पाटील व योगेश नाईक हेच या स्फोटाचे सूत्रधार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. या दोघांचेही सनातन संस्थेशी संबंध असल्याचे सांगून पोलिसांनी चौकशीची दिशा या संस्थेच्या दिशेने फिरवली आहे.याप्रकरणी अद्याप पोलिसांना संस्थेविरोधात कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत वा पोलिसांनी अद्याप कुणालाही ताब्यात अथवा अटक केली नाही.मडगाव स्फोटाची चौकशी सुरू असताना आता सनातन संस्थेला विदेशातून आर्थिक साहाय्य मिळत असल्याचा विषय समोर आला आहे व स्फोटाचा तपास लावण्याचे सोडून पोलिस त्याकडे वळल्याचीही खबर आहे.या एकूण प्रकरणी राजकीय नेते व पोलिस यांच्या वक्तव्यांत मतभेद आढळल्याने गोंधळ निर्माण झाला व त्यामुळे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांना जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमून प्रसारमाध्यमांना माहिती देण्याची जबाबदारी देण्यात आली.फोंडा अथवा मडगाव येथील पोलिस अधिकृत माहिती पणजी मुख्यालयात दिली जाईल,असे सांगतात व इथे मुख्यालयात मात्र कुणीच हजर राहत नाही,असेही जाणवत आहे. शनिवार व रविवारी तर मुख्यालयात एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसतो, त्यामुळे हा नक्की काय प्रकार सुरू आहे,असा सवाल उपस्थित होतो.
सनातनच्या आश्रमाची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली झडती आज बंद होती,अशी माहिती मिळाली.या झडतीत पोलिसांना नेमके काय पुरावे सापडले आहेत याबाबत पोलिस गोपनीयता बाळगून आहेत.मुख्यमंत्री दिगंबर कामत हे उद्या २५ रोजी दिल्लीला जाणार असल्याची खबर असून याप्रकरणी चौकशीचा अहवाल ते केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

No comments: