Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 October, 2009

ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात अजय कौशलला देणार

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - भारत आणि ब्रिटिश देशांमध्ये झालेल्या एका करारानुसार भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक अजय कौशल याला ब्रिटिश पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. भारतीय वंशाचा महाठक कौशल्य याला एका गुन्ह्यात १५ वर्षाची शिक्षा झाली होती. त्यानंतर तो ब्रिटिश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बॅंकॉक येथून भारतात पळून आला होता. बॅंकॉक येथे असलेल्या ब्रिटिश राजदूतावासातून त्याने बनावट कागदपत्रे सादर करून पासपोर्ट बनवला आणि त्याचा वापर करुन तो अनेकवेळा भारतात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यापूर्वी अनेक वेळा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अट्टल गुन्हेगार भारतात आल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले असून त्याचे गोव्यात कोणाशी संबंध होते, याचा मात्र तपास घेण्याच्या मनस्थितीत गोवा पोलिस नसल्याचे दिसून येत आहे. गोव्यात त्याच्यावर कोणतेच गुन्हे नसून आम्ही त्याची कोणत्या आधारावर चौकशी करणार, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. गोव्यात आल्यावर कौशल हा एका महिलेबरोबर कोलवा येथे राहत होता. ही महिला कोण आणि ती गोव्यात काय करते, याचा तपास घेणे गोवा पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. कोणत्या अनैतिक धंद्यात या दोघांचा सहभाग आहे का किंवा त्यांच्यातर्फे कोणता अनैतिक व्यवसाय सुरू आहे , असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
कौशल्य हा मुंबईमार्गे गोव्यात आला आहे. यावेळी ब्रिटिश पोलिसांना जारी केलेला "रेड कॉर्नर' नोटीस नसल्याने त्याला कोणीच विमानतळावर चौकशीसाठी अडवले नाही. त्यामुळे दर तीन महिन्यासाठी तो गोव्यात येऊन जात होता. काही दिवसापूर्वी कोलवा येथील एका विदेशी व्यक्तीचा हॉटेलच्या खोलीत अमली पदार्थाच्या अति सेवन केल्याने मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर हवा असलेला कौशल कोलवा पोलिसांच्या हाती लागला होता.

No comments: