Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 October, 2009

उपोषणकर्त्या शिक्षकांकडे मुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ


सर्वदा गांवकरची प्रकृती ढासळली

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)-गोवा लोकसेवा आयोगाने शिफारस करूनही नियुक्तीस सरकारकडून चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची प्रकृती ढासळत चालली आहे. सर्वदा गांवकर या शिक्षिकेला आज तिसऱ्यांदा गोवा वैद्यकीय महाविद्यालयांत हलविण्यात आले. तिचा रक्तदाब पूर्णपणे खालावल्याची माहिती मिळाली आहे. तिला वेळीच दाखल केली नसती तर संकट ओढवले असते,असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.आठ दिवस होऊनही सरकारकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने या शिक्षकांचे व पालकांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले आहे. हे उपोषण त्वरित थांबवले गेले नाही तर एखाद्या शिक्षकाला जीव गमवावा लागण्याची शक्यताच सध्याच्या परिस्थितीवरून व्यक्त होत आहे.
दरम्यान, हे शिक्षक २२ रोजीपासून उपोषणाला बसले होते पण याविषयी तात्काळ तोडगा काढण्याचे सोडून मुख्यमंत्री दिल्लीला गेले. काल रात्री गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री आज इथे भेट देणार अशी आशा धरून बसलेल्या शिक्षक व त्यांच्या पालकांची घोर निराशा झाली. आज दिवसभरात मुख्यमंत्री इथे फिरकलेच नाहीत." दिगंबर कामत हे हळव्या व संवेदनशील स्वभावाचे आहेत, असा आत्तापर्यंतचा समज होता पण तो पूर्णपणे फोल ठरला. कामत हे आत्तापर्यंतचे सर्वांत कठोर व निर्दयी मुख्यमंत्री ठरले"असा आरोप आपल्या मुलांची परिस्थिती पाहून व्याकूळ झालेल्या पालकांनी केला. " गोवा लोकसेवा आयोगाने केलेली शिफारस कशी चुकीची आहे हे कामत यांनी इथे प्रत्यक्ष भेट देऊन या उपोषणकर्त्या शिक्षकांसमोर व आमच्यासमोर स्पष्ट करून दिले असते तर त्यांच्या धाडसाची व प्रामाणिकपणाची कदर केली असती पण या शिक्षकांना सामोरे जाण्याचेही धारीष्ठ त्यांच्याकडे नसावे हे दुर्भाग्यपूर्ण आहे' अशी टीकाही या पालकांनी केली. कामत हे मुख्यमंत्री आहेत म्हणजे सर्व सरकारी पदांवर त्यांच्या जवळीकांची व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या मर्जीतील लोकांचीच भरती व्हायला हवी असा जर अलिखित नियम आहे तर मग लेखी परीक्षा,मुलाखती किंवा सरकारी पदांच्या जाहिराती हा फार्स तरी का करावा, असाही संताप या पालकांनी व्यक्त केला.
गोवा लोकसेवा आयोगाने आत्तापर्यंत केवळ या शिक्षकांचीच निवड केली आहे काय, आत्तापर्यंत आयोगाने केलेल्या शिफारशींचा स्वीकार करून सरकारने मुकाट्याने त्यांची नियुक्ती केली, मग या शिक्षकांच्या भरतीबाबतच हा वाद का, असा सवालही यावेळी करण्यात आला. गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांची निवडही विद्यमान सरकारनेच केली आहे मग त्याच अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत सरकारला आत्ताच संशय घेण्याचे नेमके कारण काय, असे एकापेक्षा एक प्रश्न पालकांकडून टाहो फोडून विचारले जात आहेत.
गोवा लोकसेवा आयोगाने निवड करूनही केवळ कुणाचातरी राजकीय स्वार्थ जपण्यासाठी तोंडातील घास हिरावून घेतला गेला तर हे शल्य पूर्ण आयुष्यभर सतावत राहील त्यापेक्षा जीव गेलेलाच बरा,अशी प्रतिक्रिया याठिकाणी उपोषणाला बसलेल्या एका शिक्षिकेने व्यक्त केली.आज इथे भेट दिलेल्यांत पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष नरेंद्र आजगांवकर, सचिव महादेव गवंडी, डॉ.उदय सावंत, श्रीधर कामत बांबोळकर, माजी आमदार प्रकाश वेळीप, ऍड.शिवाजी देसाई आदींचा समावेश होता.

No comments: