Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 31 October, 2009

अजूनही जळतोय् इंडियन ऑईलचा डेपो

-सहा अधिकाऱ्यांसह १३ ठार, २०० जखमी
-अब्जावधींचे नुकसान
-लष्कर कार्यरत, अन्य राज्यांतील अग्निशमन दलांना पाचारण
-पेट्रोलियम मंत्रीही हताश
-आगीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
-अतिरेक्यांनी घातपात केल्याची भीती

जयपूर, दि. ३० : राजस्थानातील जयपूर येथील इंडियन ऑईलच्या सीतापूर डेपोला लागलेली आग अजूनही विझलेली नसून, आणखी एक दिवस या ज्वाला भडकतच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी लष्कराने प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून, आजूबाजूच्या राज्यातील अग्निशमन दलाच्या सर्वच्या सर्व गाड्याही कामाला लागल्या आहेत. तरीही आगीचा फैलाव पाहता घटनास्थळी आलेले पेट्रोलियम मंत्री मुरली देवराही हताश झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर ही हानी अतिरेक्यांचा प्रताप तर नसावा, अशी शंका व्यक्त करीत सरकारने या आगीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
इंडियन ऑईलच्या डेपोत गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही आग लागली. जयपूरच्या बाहेर असलेल्या पाईपलाईनकडे पेट्रोल नेले जात असताना ही आग लागली. आतापर्यंत त्यात १३ जण ठार झाले असून २०० वर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये इंडियन ऑईलच्या सहा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ही आग इतकी भीषण आहे की, त्याची व्याप्ती आज दुसऱ्या दिवशीही वाढतच होती. या ज्वाळांनी अब्जावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आगीचे भयंकर स्वरूप लक्षात घेऊन तिला आटोक्यात आणण्यासाठी कालच लष्कराला पाचारण करण्यात आले होते. पण, या परिसरात इंधनाचेच साम्राज्य असल्याने आग आटोक्यात आणण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. अग्निशमन दलाच्या ३५ गाड्या ही आग आटोक्यात आणण्याच्या कामी लागल्या आहेत. सध्या २० हजार किलोलिटर्सच्या दोन डिझेलच्या टाक्या आणि १० हजार किलोेेलिटर्सच्या पेट्रोेलच्या तीन टाक्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. आजूबाजूच्या तीन किलोमीटर परिसरातील काही कंपन्यांमध्येही ही आग पसरली आहे.
या आगीत दगावलेल्यांचे मृतदेह समोर दिसत आहेत. पण, ते काढणे शक्य नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक जिल्हाधिकारी कुलदीप राणा यांनी सांगितले. प्रशासन निव्वळ हतबल होऊन आगीचे हे तांडव पाहत आहे. कारण आजूबाजूला इंधनच असल्याने आग कोणत्या दिशेने झेपावेल याचा अंदाजच येत नाहीय. नेमके किती कर्मचारी आग लागली तेव्हा कामावर होते याची पडताळणी केली जात आहे. किमान चार ते सहा अधिकारी आत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंडियन ऑईलच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त नेमके किती लोक आत अडकले असावे, याचा अंदाज अजूनही आलेला नाही. आतापर्यंत किमान १३ जण यात दगावल्याची पुष्टी झाली आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढू शकते.
आग पसरू न देण्याची कसरत
ही आग पसरू न देणे याचीच कसरत मुख्यत्वेकरून सुरू आहे. त्यासाठी थंड पाण्याचे मोठमोठे फोम या परिसरातील टाक्या आणि पाईपलाईनवर टाकले जात आहेत. जेणेकरून ही आग त्यांच्यापर्यंत येता कामा नये. या आगीने आता सीतापूर, प्रतापनगर आणि आसपासच्या गावातील लोकांना अनेक दुष्परिणामांना सामोरेे जावे लागत आहे. या आगीमुळे निघणाऱ्या काळ्या, विषारी धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला आहे. प्रशासनाने परिसरातील लोकांना मास्क वापरण्यास सांगितले आहे. पण, हे मास्क प्रशासन पुरविणार आहे का, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. आगीचे वाढते प्रस्थ पाहता डेपोपासून काही किलोमीटर अंतरातील परिसर निमर्नुष्य करण्यात आला आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आला आहे. आजूबाजूच्या परिसरातील शाळा आणि सरकारी प्रतिष्ठानेही बंद ठेवण्यात आली आहेत.
वाहतुकीवर परिणाम
स्थानिक लोकांप्रमाणेच या परिसरातील वाहतुकीवरही आगीचा परिणाम झाला आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने आपल्या ११ गाड्यांचे मार्ग बदलविले आहेत. तसेच, दक्षतेचा उपाय म्हणून दोन गाड्या रद्दही केल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये जयपूर-श्वामगड पॅसेंजर आणि जयपूर-बयाना पॅसेंजर यांचा समावेश आहे. सवाईमाधोपूर-जयपूर हॉलिडे एक्सप्रेस ही परतीची गाडी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. याशिवाय, मुंबई-जयपूरचा मार्ग बदलविण्यात आला आहे. जयपूर-जबलपूर, जयपूर-बांद्रा आदी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रस्ते वाहतूकही इतरत्र वळविण्यात आली आहे. जयपूरलगतच्या महामार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे.

No comments: