Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 July, 2009

मेंदूज्वर लसीकरणाचा सावळागोंधळ थांबवा

नियोजित पद्धतीने मोहीम राबवण्याची भाजपची मागणी
पणजी, दि.३० (प्रतिनिधी)- मेंदूज्वर लसीकरणाची मोहीम राबवताना सरकारी पातळीवर जो सावळागोंधळ सुरू आहे तो तात्काळ थांबवा, अशी जोरदार मागणी भाजपने केली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही मोहीम राबवण्यासाठी सुरू केलेली घिसाडघाई योग्य नसून या मोहिमेबाबत खुद्द डॉक्टर व पालकही संभ्रमित असल्याची टीका सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी केली.
आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली. राज्यातील सुमारे साडे चार लाख लहान मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या या लसीकरण मोहिमेबाबत योग्य ती जागृती झाली नाही. खुद्द आरोग्य खात्याचे डॉक्टर व पालकांनाही याबाबत काहीही माहिती नाही, असेही प्रा. पर्वतकर म्हणाले. विद्यार्थ्यांकडे एक इंग्रजी भाषेतील पत्र पाठवून त्यावर पालकांनी सही करण्याचे आवाहन शिक्षकांकडून केले जाते. या पत्रावर मुलांच्या आरोग्याबाबतच्या काही लक्षणांबाबत माहिती विचारण्यात आली आहे. आवश्यक माहिती देऊन त्यावर सही करण्याची विनंती करण्यात आली आहे. मुळात या पत्रावरील माहिती किती पालकांच्या लक्षात आली हे समजण्यास वाव नाही, असेही ते म्हणाले. वाळपई येथील एका मुलाला ही लस टोचल्यानंतर इस्पितळात दाखल करण्याची वेळ ओढवल्याने आता पालकांतही चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे एक चांगली योजना अपयशी ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुळात या लसीची संपूर्ण माहिती पालकांना व डॉक्टरांना समजावून देण्याची गरज आहे. या लसीची का गरज आहे? ही लस कशी अपायकारक नाही, याबाबत पालकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य खात्याकडून मात्र घाईगडबडीत ही मोहीम राबवली जात असल्याने अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्याचे प्रा.पर्वतकर म्हणाले. ही मोहीम तात्काळ थांबवून जनतेच्या मनातील संशय दूर करून योग्य व नियोजित पद्धतीने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन प्रा. पर्वतकर यांनी सरकारला केले आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या "स्टंटबाजी'ला आवरा
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला आकस्मिक भेट देऊन तेथील एका वरिष्ठ परिचारिकेला फाटक्या चादरीवरून निलंबित करण्याचे आदेश देण्याची कृती ही केवळ "स्टंटबाजी' असल्याची टीका प्रा. पर्वतकर यांनी केली. परिचारिकांनी आपली एकजूट दाखवून आरोग्यमंत्र्यांना वठणीवर आणले तोच त्यांनी अधीक्षक डॉ. राजन कुंकळ्ळीकर व डीन डॉ. जिंदाल यांना भ्रष्ट म्हणून त्यांचा अपमान करण्याची कृतीही सध्या बरीच चर्चेत आहे. एक वरिष्ठ व लौकिक प्राप्त झालेल्या डॉ. जिंदाल यांना अशी वागणूक देण्याची ही कृती निषेधार्ह असल्याचेही ते म्हणाले. एकीकडे इस्पितळाच्या संपूर्ण व्यवहारात आरोग्यमंत्र्यांचा हस्तक्षेप होत असताना गोमेकॉच्या गचाळ कारभाराला त्यांना दोषी धरणे अजिबात योग्य नाही, असे मतही यावेळी प्रा.पर्वतकर यांनी व्यक्त केले. मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी नाटके करून जनतेचे प्रश्न सोडवता येणार नाहीत, असा टोलाही प्रा. पर्वतकर यांनी हाणला.

No comments: