Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 29 June, 2009

कॉंग्रेस सरकार विरोधात आयटक रणशिंग फुंकणार

विविध क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारकडून कामगारवर्गाची मोठ्या प्रमाणात फसवणूक व छळणूक होते आहे. राज्यातील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आगामी काळात व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय कामगार संघटनेने ("आयटक') दिला आहे. "गोमेकॉ'तील कंत्राटी सफाई कामगारांवरील अन्याय, कदंब महामंडळाच्या कामगारांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम खात्यातील कंत्राटी कामगारांचा विषय तसेच किमान वेतन लागू करणे आदी विषयांवरून येत्या काळात सरकारशी तीव्र संघर्ष करण्याचे स्पष्ट संकेत या बैठकीत देण्यात आले.
आज पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात "आयटक' ची सर्वसाधारण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज्यात कामगारांसमोरील विविध विषयांवर सखोल चर्चा करून पुढील कृती निश्चित करण्यात आली. आगामी काळात राज्यातील कामगारवर्ग पेटून उठणार आहे,असा इशारा कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयटकचे अध्यक्ष प्रसन्ना उट्टगी होते. ऍड. राजू मंगेशकर, ऍड. सुहास नाईक, ज्योकिम फर्नांडिस, ए. एफ.जी मास्कारेन्हास, प्रगती निरगुडकर, सुदेश नाईक व इतर कामगार संघटनांचे पदाधिकारी हजर होते. राज्यातील असंघटित कामगारांना किमान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी येत्या ७ जुलैला व्यापक निदर्शने पणजीच्या कदंब बसस्थानकावर केली जातील. गोमेकॉच्या सफाई कामगारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी येत्या १७ जुलै रोजी गोमेकॉतील आवारात व्यापक धरणे कार्यक्रमाचीही घोषणा यावेळी करण्यात आली. याच काळात वास्को येथे गोवा शिपयार्ड कामगारांच्या मागण्यांसाठीही विराट रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्यमान सरकार हे भांडवलदारांचे हस्तकबनले आहे व थैलीशहांच्या सांगण्यावरूनच हे सरकार चालते, असा थेट आरोप फोन्सेका यांनी केला. केंद्रात डाव्यांची ताकद कमी झाल्याची संधी साधून कामगार चळवळ पायदळी तुडवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त संघटित कामगारांत फूट पाडून त्यांची ताकद कमी करण्याचा विडाच कॉंग्रेस सरकारने उचलल्याने आगामी काळात कामगारांसमोर जबरदस्त आव्हान उभे ठाकले आहे, असे संकेतही फोन्सेका यांनी दिले. आर्थिक मंदीमुळे लाखो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड ओढवली आहे. देशात सुमारे ५० लाख लोक बेरोजगार आहेत व त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे औद्योगिक घसरण, दरवाढ व अन्नधान्याचा तुटवडा आदी संकटेही उभी आहेत. अशा स्थितीत कामगारांसमोर विविध समस्या व अडचणी उभ्या ठाकणार असल्याचे ते म्हणाले. सध्या साम्यवादी चळवळ मोडून टाकण्याचा चंगच विद्यमान सरकारने बांधला आहे. माओवादी संघटनेवर बंदी घालून त्यांना दहशतवादी घोषित केले आहे खरे; पण त्यांच्यावर ही स्थिती का ओढवली याचा विचार कोण करणार? केवळ वरचेवर प्रश्न हाताळून चालणार नाही तर सरकारने या प्रश्नाचे मूळ जाणून घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
गोव्यात कामगारांवर अपरिमित असा अन्याय होत आहे. गोव्यात कामगार संघटनेची ताकद सुमारे ३५ ते ४० हजारांवर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कामगार संघटनेचे दोन मुख्य नेते रिंगणात असताना त्यांना मिळालेली अल्प मते काय दर्शवतात,असा सवाल करून जोपर्यंत कामगारांची ताकद राजकीय परिवर्तन घडवून आणणार नाही तोपर्यंत कामगारांचे हित जपणे कठीण होणार,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राणे पितापुत्रांचा कारनामा!
वाळपई येथील गोवा फॉर्म्युलेशन कंपनीच्या सुमारे १७० कामगारांचे भवितव्य सध्या अधांतरी बनले आहे. बहुतेक सर्व स्थानिक कामगार असूनही त्यांच्या मदतीला कुणीही येत नाही. सभापती प्रतापसिंग राणे यांच्या मतदारसंघात ही कंपनी येत असूनही ते याप्रश्नी लक्ष देत नाहीत,अशी अवस्था आहे. आता तर कंपनीच्या काही अधिकाऱ्यांकडून खुद्द राणे पिता-पुत्राने या कामगारांना कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले, अशी चर्चा सुरू असल्याचा आरोप फोन्सेका यांनी केला.कामगार आयुक्तांनी तात्काळ या कंपनीशी बोलणी करून या कामगारांचा विषय निकालात काढवा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
गोमेकॉ सफाई कामगारांचे १७ रोजी आंदोलन
गेली नऊ वर्षे कंत्राटी पद्धतीवर गोमेकॉ व इतर संबंधित सरकारी इस्पितळात सेवा बजावणाऱ्या सफाई कामगारांना एका घटकेत घरी पाठवण्याची भाषा करणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या कृतीचा यावेळी निषेध करण्यात आला.आत्तापर्यंत या कामगारांना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी अचानक आपली भूमिका बदलून या कामगारांप्रति आपण काहीही करू शकत नाही, असे म्हणणे योग्य नाही. यासंदर्भात बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या सुमारे २०७ कामगारांना डावलून नव्याने १५२ जणांची भरती करणे व त्यात बहुतेक सत्तरी भागातील लोकांचा भरणा करणे हा अन्याय असून त्याविरोधात आता प्राणपणाने लढा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. येत्या १७ जुलैपासून आंदोलन छेडले जाणार असून या सफाई कामगारांच्या पाठिंब्यासाठी सर्व कामगार एकत्र येतील अशी माहितीही देण्यात आली.
यापुढे "टॉवेल' वर्गणी गोळा करणार
यापुढे कामगार संघटनेची कुठेही बैठक किंवा सभा असेल तेव्हा पक्षनिधी जमवण्यासाठी "टॉवेल'द्वारे वर्गणी जमा करण्याचा ठराव संमत करण्यात आला. या बैठक किंवा सभेच्या ठिकाणी टॉवेल फिरवण्यात येणार असून उपस्थितांकडून यथाशक्ती मदत त्यात टाकली जाईल आणि ती पक्षनिधीसाठी वापरली जाईल,असे ठरवण्यात आले.

No comments: