Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 20 March, 2009

'आजगावकरांना शिमगोत्सव साजरा करू देणार नाही'

पेडणे, दि. १९ (प्रतिनिधी): पालकमंत्री बाबू आजगावकर यांना २० मार्च रोजी कोणत्याही परिस्थितीत पालिका क्षेत्रात शिमगोत्सव साजरा करू दिला जाणार नाही, या दिवशी पेडणे शहर बंद ठेवले जाईल, असा इशारा नगराध्यक्ष इजिदोर फर्नांडिस यांनी शिमगोत्सव समितीच्या बैठकीत दिला.
नगराध्यक्ष इजिदोर फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या शिमगोत्सव समितीची बैठक पालिका सभागृहात १८ रोजी रात्री उशिरापर्यंत चालली. पर्यटन खात्याने पालिकेला दिलेला शिमगोत्सव पालकमंत्र्यांनी हिसकावून घेतल्याने याला तीव्र विरोध करण्यात आला.
पर्यटन खाते, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कृतीचा निषेध करताना बाबू आजगावकरांनी मडगावमधील दादागिरी येथे सुरू केल्याचे सांगून २० मार्च रोजी पेडणे बंद ठेवण्याचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला. पालिकेचा शिमगोत्सव पालकमंत्र्यांनी हिसकावून घेतल्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीला सरकार व पालकमंत्री जबाबदार असतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
माजी आमदार परशुराम कोटकर यांनी इजिदोर फर्नांडिस यांना पाठिंबा दर्शवताना मडगावकरांनी येथे येऊन पेडणेकरांना शिमगोत्सव खेळायला शिकवू नये, याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा दिला. वेळप्रसंगी हौतात्म्य पत्करण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगराध्यक्ष व पालकमंत्री या दोघांनीही अध्यक्षपदावरून चाल पावले दूर राहून ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली २० मार्च ऐवजी पुढील तारखेला शिमगोत्सव आयोजित करण्याचा ठरावही या बैठकीत मांडण्यात आला. सदर ठराव बाबू आजगावकर यांच्यापर्यंत पोचवण्यात आला आहे.
पेडणे तालुक्यात शासकीय स्तरावर शिमगोत्सव साजरा करण्यासाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडण्यात आली होती व मान्यतेसाठी पर्यटन खात्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यानंतर पालकमंत्री बाबू आजगावकर व आमदार दयानंद सोपटे यांच्या अध्यक्षतेखाली अन्य दोन समित्या निवडण्यात आल्या होत्या व पर्यटन खात्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. गेल्या वर्षी आमदार दयानंद सोपटे यांना शिमगोत्सव आयोजनासाठी परवानगी देण्यात आली होती तर यंदा बाबू आजगावकर यांना मान्यता देण्यात आला.
----------------------------------------------------------------
पेडणे पालिका बंद
पालकमंत्री बाबू आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या पेडणे तालुका शिमगोत्सवाला मुख्याधिकारी सुधीर केरकर यांनी पालिका मंडळाला विश्वासात न घेता "ना हरकत' दाखला दिल्याच्या निषेधार्थ १९ रोजी पालिका कार्यालय बंद ठेवण्यात आले. पालिकेचा मुख्य दरवाजा तसेच इतर दरवाजांनाही कुलूप लावण्यात आल्याने गुरुवारच्या बाजारासाठी आलेल्या नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू होती.
पालिकेचे कामकाज सकाळी ९.३० वाजता सुरू होते. परंतु, दरवाजे बंद असल्याने कर्मचाऱ्यांना ताटकळत बाहेर राहावे लागले. पालिकेच्या एका शिपायाने दिलेल्या माहितीनुसार १८ रोजी रात्री उशिरापर्यंत पालिका कार्यालयात शिमगोत्सवासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक सुरू होती. नगराध्यक्षांनी चाव्या आपल्याकडेच ठेवून घेतल्या होत्या व त्यांनीच बैठक संपल्यानंतर कार्यालय बंद केले होते. १९ रोजी सकाळी ८.३० वाजता नगराध्यक्षांच्या घरी चाव्या घेण्यासाठी गेलो असता आज पालिका बंद राहणार असून चाव्या देणार नसल्याचे त्यांनी शिपायाला सांगितले.
नगराध्यक्ष इजिदोर फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या दबावाला बळी पडूनच मुख्याधिकाऱ्यांनी ना हरकत दाखला दिल्याचे सांगितले. याचा निषेध करण्यासाठी पालिका बंद ठेवण्यात आली असून यापुढील कामकाज मुख्यमंत्र्यांनीच चालवावे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी सुधीर केरकर यांच्याशी याविषयी संपर्क साधला असता, नियमाला धरूनच शिमगोत्सव समितीला ना हरकत दाखला दिला असून याचा अहवाल पालिका प्रशासकीय संचालकांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आर्थिक वर्षअखेर असल्याने व आज कामकाज न झाल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली.

No comments: