Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 2 September 2008

राजकीय अस्थैर्य कायम, गणेशोत्सवानंतर राजकीय हालचालींना वेग

पणजी, दि.२ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सभागृहात विनियोग विधेयकाला मंजुरी मिळवण्यात यश मिळवले असले तरी त्यांच्या सरकारवरील टांगती तलवार मात्र अद्याप दूर झालेली नाही. गणेश चतुर्थीनंतर कुंभारजुवेचे आमदार तथा विद्यमान सरकार पक्षातील अनुसूचित जमातीचे एकमेव नेते पांडुरंग मडकईकर यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लावली जाईल, असा ठाम निर्णय पक्षाचे केंद्रीय निरीक्षक बी.के.हरिप्रसाद यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्याने सध्या आघाडीत अस्वस्थता पसरली आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात गणेश चतुर्थीचे वेध लागल्याने जनता जरी उत्सवात तल्लीन झाली असली तरी राजकीय पटलावर मात्र वातावरण शांत झालेले नाही. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारवर सासष्टी तालुक्याचा जो वरचष्मा प्राप्त झाला आहे तो आता आघाडी पक्षातील नेत्यांनाच बोचत असल्याने मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालटाचे वारे सध्या घोंगावत आहे. मडकईकर यांच्यासाठी ज्योकीम आलेमाव यांचे मंत्रिपद जाणार असल्याने आलेमाव बंधू अस्वस्थ झाले आहेत. मंत्रिमंडळात दोन बंधू असताना अन्य नेत्यांवर अन्याय झाल्याची भावनाही काही नेत्यांत बनल्याने याबाबत सामंजस्य तोडगा काढण्याचे श्री.हरिप्रसाद यांनी मान्य केले आहे. पुढील आठवड्यात ते गोवा भेटीवर येणार असून याच काळात श्री.मडकईकर यांचा शपथविधी होण्याचेही संकेत मिळत आहेत.
माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आल्याने त्यांनी सध्या जो सरकारवर हल्लाबोल चालवला आहे त्याबाबत मात्र मुख्यमंत्री चिंतित नाहीत, भाजपकडूनही नार्वेकर यांना जवळ करण्याची शक्यता नसल्याचे ओळखूनच त्यांना हटवण्यात आल्याचे एका मंत्र्याने सांगितले. दरम्यान, भाजपने जर नार्वेकर यांना जवळ करण्याचे प्रयत्न केले तर त्याचा जास्त फटका त्यांनाच होणार असल्याने नार्वेकर यांची परिस्थिती "इकडे आड तिकडे विहीर'अशीच बनली आहे. नार्वेकर यांनी स्थापन केलेल्या नव्या आघाडी अंतर्गत सरकारविरोधात जोरदार मोहीम उघडण्याची तयारी चालवली असून सरकारच्या अनेक भानगडींची यादीच तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या सूत्रांनी दिली. उत्तर गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभांचे आयोजन करून सरकारच्या या भानगडींचा पर्दाफाश करण्याचेही नियोजन सुरू आहे. नार्वेकर यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची विनंती केल्याचीही खबर आहे. दरम्यान, पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र या प्रस्तावास विरोध केला असून तसे झाल्यास पक्षाची सूत्रे पूर्णपणे त्यांच्या हाती जाण्याची भिती त्यांनी वाटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीनंतर गोव्यातील राजकीय नाट्याला नव्याने कलाटणी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

No comments: