Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 31 August, 2008

गोव्यात बहुजन समाजावर मोठा अन्याय- रवी नाईक

स्वाभिमान जागवून न्याय मिळविण्याचे आवाहन
फोंडा, दि.३१ (प्रतिनिधी) - गोव्यात बहुजन समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू असून बहुजन समाजातील लोकांत जोपर्यंत स्वाभिमान, अभिमान जागृत होत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणे कठीण आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री रवी नाईक यांनी आज संध्याकाळी फर्मागुडी फोंडा येथे केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने फर्मागुडी येथील श्री गोपाळ गणपती सभागृहात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर गृहमंत्री रवी नाईक बोलत होते. यावेळी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. कैलास कमोद, परिषदेचे गोव्यातील प्रमुख संयोजक आमदार नीळकंठ हळर्णकर, प्रा. हरी नरके, माजी मंत्री सुभाष शिरोडकर, फोंड्याचे नगराध्यक्ष संजय नाईक, कुडचडेचे नगराध्यक्ष अभय खांडेकर, संयोजक रामचंद्र मुळे, गुरूदास सावळ, उल्हास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
बहुजन समाजातील लोकांना काही जणांनी पैशांच्या जोरावर लाचार बनविल्याने त्यांच्यातील स्वाभिमान, अभिमान नष्ट झाला आहे. त्यामुळे गोव्यात आज बहुजन समाजाला अन्यायाला तोंड द्यावे लागत आहे, असे सांगून गृहमंत्री श्री. नाईक म्हणाले की, प्रत्येक मनुष्याने आपल्या जाती धर्माबाबत स्वाभिमान बाळगला पाहिजे. समानता नसल्याने श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. बहुजन समाजातील शिक्षित लोकांनी आपल्या समाज बांधवाच्या उद्धारासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
गोव्यातील राजकारणात बहुजन समाजावर अन्याय सुरू असल्याची तक्रार माजी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी आपल्या भाषणात केली. बहुजन समाज एकसंध नसल्याने काही राजकारणी आपली पोळी भाजून घेत आहेत. बहुजन समाजाने ताठ मानेने जगण्याची गरज आहे. शिक्षणातून बहुजन समाजाचा विकास होऊ शकतो, असेही श्री. शिरोडकर यांनी सांगितले.
ओबीसी समाज आपल्या हक्कासाठी झगडण्यात उदासीनता दाखवत असल्याने या समाजाला राखीवतेचा लाभ पन्नास वर्षानंतर मिळाला आहे. ह्या समाजाचे राखीवता हक्क डावलण्याचा प्रयत्न होत असून हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ह्या समाजाने समता परिषदेच्या माध्यमातून एकजूट होऊन लढण्याची गरज आहे, असे प्रा. हरी नरके यांनी सांगितले.
डॉ. कैलास कोमद यांनी परिषदेच्या कार्याची माहिती दिली. आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी स्वागत केले. उल्हास नाईक यांनी प्रास्ताविक केले. संदीप नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रामचंद्र मुळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुभाष महाले यांनी केले.

No comments: