Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 3 February, 2008

गोव्याच्या किनाऱ्यांवर बॉम्बस्फोट मालिकेचा कट
० चोरीच्या दुचाकींद्वारे स्फोटांचा डाव
० हैदराबादेत दोघांना अटक, "हुजी'शी संबंध
० चार किनाऱ्यांची टेहळणी केल्याचे उघड

हैदराबाद, दि. २ ः चोरीच्या मोटरसायकलींमध्ये स्फोटके पेरून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर बॉम्बस्फोट मालिका घडवून मोठ्या प्रमाणात प्राणहानी घडवण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट उघडकीस आला आहे. दावणगिरी पोलिसांनी यासंदर्भात रझिउद्दिन नासीर याला हैदराबाद येथून ताब्यात घेतले असून त्याने दिलेल्या माहितीतून या कटाचे धागेदोरे हाती आले आहेत. आपला हा कट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दहशतवाद्यांनी गोव्यातील काही किनाऱ्यांची टेहळणीही केली होती, असेही चौकशीत उघड झाले आहे.

गोव्यातील किनाऱ्यांवर फार मोठ्या संख्येने देशी व विशेषतः विदेशी पर्यटक येत असल्यामुळे "लष्कर ए तोयबा', "हरकत उल जिहादी अल इस्लामी' आदी दहशतवादी संघटनांची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली आहे. त्यातूनच या कटाची आखणी हैदराबादेत करण्यात आली होती. मूळ कर्नाटकवासी असलेल्या नासीर व असादुद्दिन अबुबकर यांनी काही मोटारसायकली चोरल्या होत्या व गोव्यातील निवडक किनाऱ्यांच्या परिसरात त्या ठेवून बॉम्बस्फोटमालिका घडवून आणली जाणार होती.

अनेक राज्यांशी तार

हैदराबादेत अटक करण्यात आलेल्या नासिर याच्याकडून या घातपाताच्या कटाचा तपशील मिळवण्यासाठी गुप्तचर अधिकाऱ्यांनी कंबर कसली असून इतर अनेक राज्यांशी त्याची तार जुळलेली असल्याने जवळजवळ बारा राज्यांच्या पोलिस व गुप्तचर अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जात आहे.
हैदराबादमध्ये गेल्या वर्षी २५ ऑगस्ट रोजी दोन स्फोट झाले होते. त्यात महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी ठार झाले होते. त्या स्फोटांनंतर लगेचच नासीर याने गोव्याला भेट दिली होती. आपल्या या गोवा भेटीत त्याने गोव्यातील काही ठिकाणांची घातपाती कारवाईच्या शक्यता आजमावण्यासाठी बारकाईने टेहळणी केली होती. गोव्यात स्फोटमालिका घडवून आणण्यासाठी ठिकाणे निवडण्याची जबाबदारी दहशतवाद्यांनी त्याच्यावर सोपवली होती.

पाकिस्तानात प्रशिक्षण

नासिर हा बावीस वर्षांचा युवक अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. शिक्षण अर्ध्यावर सोडून त्याने पाकिस्तानात "हुजी' कडून घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेतले. भारतात परतल्यावर त्याच्यावर गोव्याची मोहीम सोपवण्यात आली होती. गोव्यात किमान चार ठिकाणी आपण स्फोट घडवणार होतो, अशी कबुली नासिरने गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली आहे.

दुचाकींचा वापर

बॉम्बस्फोट घडवण्यासाठी चार चाकी वाहनांचा वापर केला तर अशा बेवारस वाहनांचा नागरिकांना संशय येत असल्याने दहशतवाद्यांनी अलीकडे दुचाकी वाहनांचा वापर स्फोटांसाठी चालवला आहे. वाराणशी, लखनौ व गोरखपूर येथे जे स्फोट झाले, त्यात सायकलींना आयईडी (इंप्रोव्हाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हायसेस) जोडण्यात आल्याचे आढळून आले होते. गोव्यात मात्र सायकली प्रचलित नसल्याने मोटारसायकलींचा वापर केला जाणार होता.
दावणगिरी पोलिसांनी नासिर व त्याच्या अबुबकर या साथीदाराने मिळून चोरलेल्या अकरा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. नासिर व अबुबकरने मोटारसायकली चोरल्या, पण त्या न विकल्याने चौकशी अधिकारी बुचकळ्यात पडले. त्यातूनच या दहशतवादी कटाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पन्नास किलो स्फोटके

आपल्याला स्फोटके कोण पुरवणार होते याचा तपशील उघड करण्यास मात्र नासिर अजूनही तयार नाही. आपल्याला पन्नास किलो स्फोटके देण्यात येणार होती, एवढीच माहिती त्याने अद्याप उघड केली आहे.
दरम्यान, संभाव्य कटाचे गांभीर्य जाणल्याने गुप्तचर अधिकाऱ्यांची झोप उडाली असून त्यांनी कसून तपास चालवला आहे. शाहीद ऊर्फ बिलाल या कुख्यात दहशतवाद्याचे नासिरला पाठबळ होते, असे तपासात उघड झाले असून दोघांमधील संभाषणही अधिकाऱ्यांनी मिळवले आहे.

दाढदुखीमुळे पोलिसांच्या जाळ्यात


"सगळे काही ठरले आहे ' असे सांगून शाहीदनेच त्याला काठमांडूला जाण्यास सांगितले होते, असेही अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. मात्र, दाढदुखीवर उपचार करून घेण्यासाठी नासिर हा काठमांडूला न जाता हैदराबादेत थांबला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. नासिरच्या डोळ्यांतही दोष होता व ते तपासून घेण्याचा सल्ला त्याला डॉक्टरांनी दिला होता.

संभाषण ध्वनिमुद्रित

सीमेपार "हुजी'मार्फत दहशतवादी प्रशिक्षण सुरू असताना भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरील त्याचे संभाषण "टॅप' केले होते. नासिरचा चष्मा हरवला होता व त्यावाचून दिसत नसल्याने यापुढे दोन चष्मे जवळ बाळगीत जा, असे दूरध्वनीवर पलीकडली व्यक्ती त्याला सांगत होती. हे संभाषण गुप्तचर अधिकाऱ्यांनी ध्वनिमुद्रित केलेले आहे.
नासिर व अबुबकर यांच्या चौकशीसाठी गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी दावणगिरीत दाखल झाले असून गोवा पोलिसांनीही त्या दोघांची चौकशी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुप्तचर अधिकारी असादुल्ला अबुबकर व नासीर ऊर्फ महंमद घोस यांच्याबरोबरच महंमद आसीफ या कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अंतिम वर्ष एमबीबीएसचा विद्यार्थ्याचीही चौकशी करीत आहेत. तिघांनाही प्रसारमाध्यमांचा डोळा चुकवण्यासाठी अज्ञात स्थळी चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

पथके रवाना
दरम्यान, नासिरने दिलेल्या माहितीचा पडताळा करण्यासाठी दावणगिरी पोलिसांच्या एका पथकाने हैदराबाद, गोवा, हुबळी, मंगळूर व शिमोगा येथे भेट दिली असून दोन्ही संशयितांनी आपण त्या ठिकाणी वास्तव्य केले होते अशी माहिती दिलेली असल्याने तिच्या सत्यतेची चाचपणी केली आहे.

No comments: