Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 6 February, 2008

समन्वय समिती बैठकीतील निर्णय
० सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश
० नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते मुख्यमंत्र्यांकडे
० ज्योकीम आलेमाव यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता

० सा. बां. खाते राष्ट्रवादीकडे जाण्याचे संकेत
० नीळकंठ हळर्णकर यांना तिळारी पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्षपद
नार्वेकरांचे वित्त खाते; ज्योकीमचे मंत्रिपद जाणार
सुदिन मंत्रिमंडळात; नीळकंठना महामंडळ

पणजी,दि. ५ (प्रतिनिधी)- दिल्लीतील "फॉर्म्युल्या" ची अंमलबजावणी केल्यास आता गोव्यातील राजकीय "फॉर्म्युला" पुन्हा बिघडण्याची स्थिती कॉंग्रेस आघाडीत निर्माण झाली आहे. कॉंग्रेसचे निरीक्षक बी. हरिप्रसाद व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळातील समावेश व दयानंद नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते काढून मुख्यमंत्र्यांकडे परत करण्याबरोबर खातेबदल करण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या योग्य कार्यपद्धतीसाठी काही बदल करणे अपरिहार्य असून आघाडीतील वाद मिटल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कोणत्याही क्षणी होण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी यावेळी दिले. कॉंग्रेसचे निरीक्षक बी. हरिप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक आज दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलात पार पडली.
राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते तथा केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल हे या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार फ्रान्सिस सार्दिन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ.विल्फ्रेड डिसोझा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मगोपचे आमदार सुदिन व दीपक ढवळीकर, राष्ट्रवादीचे नेते पर्यटनमंत्री मिकी पाशेको, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, आमदार नीळकंठ हळर्णकर यांची उपस्थिती या बैठकीला होती.
दिल्लीत मान्य केल्याप्रमाणे मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे यावेळी श्रेष्ठींनी मान्य केले आहे. दयानंद नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे देण्याबाबतही निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. खातेवाटपातील बदल करण्याचाही निर्णय घेण्यात आला असला तरी हा बदल नक्की काय असेल याबाबत मात्र मौन पाळण्यात आले असून या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच सोपवण्यात आल्याने त्यांच्यासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
दरम्यान, सुदिन ढवळीकर यांच्यासाठी मंत्रिपदाचा त्याग करण्यास कोणीही तयार नसल्याचे वृत्त आहे. सुदिन यांच्यासाठी ज्योकीम आलेमाव यांचा बळी घेतला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. यासंबंधी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. या तडजोडीप्रकरणी आता कोणत्याही बेशिस्तीस थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत श्रेष्ठींनी दिल्याने ज्योकीम यांचा मंत्रिमंडळातील डच्चू जवळजवळ निश्चित झाल्याचे वृत्त आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रवादीकडे येण्याचे संकेतही या बैठकीनंतर पक्षाच्या सूत्रांनी दिले. राष्ट्रवादीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना मंत्रिपद देता येत नसले तरी त्यांची तिळारी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. सुदिन ढवळीकर यांच्याकडे सा.बां.खाते न देता त्यांना शिक्षण खात्याची सोय केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सकाळपासून सुरू झालेल्या या बैठकीनंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला. संध्याकाळी मुख्यमंत्री कामत यांच्या सरकारी निवासस्थानी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी हरिप्रसाद यांच्याशी चर्चा केली. यावेळी बाबूश यांच्या नियोजित कॉंग्रेस प्रवेश व 'आयटी हॅबिटेट' प्रकरणी बोलणी झाल्याचे संकेत आहेत.

No comments: