Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 4 February, 2008

Editorial

हे धिंडवडे थांबवा
कार्निव्हलचे यंदाचे आकर्षण ब्राझिलीयन नाच असेल, असा प्रचार केला गेल्याने पणजीचे रस्ते शनिवारी संध्याकाळी देशीपरदेशी नागरिकांनी भरून गेले असावेत, अशी आयोजकांची समजूत होण्याची शक्यता आहे पण दरवर्षीच कार्निव्हलची मिरवणूक पाहण्यासाठी सामान्य नागरिक पणजीच्या रस्त्यांवर जमा होतो कारण गेल्या काही वर्षांत बदलवले या उत्सवाचे स्वरूप लहानथोरांना आकर्षित करते. काही अटी घालून प्रवेश दिला गेल्याने कल्पक आणि सुंदर असे चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी होत असल्याने आपल्या कुटुंबासह राज्यातील सर्वच भागांतून नागरिक पणजीला धाव घेत असत. यंदा मात्र ब्राझिलयन नृत्याच्या नावाखाली अर्धनग्न तरुणींना चित्ररथांवर स्थान देऊन त्यांचे उघडेनागडे प्रदर्शन करण्यात आयोजकांनी धन्यता मानलेली दिसते. अशाच चित्ररथावर देशाचा ध्वज उलटा फडकावून जो अवमान करण्यात आला, त्याबद्दलही संबंधितांनी स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. राष्ट्रध्वजाबद्दल एवढी बेफिकिरी दाखविणारे माफीसही पात्र नाहीत. राजधानीच्या शहरात प्रमुख रस्त्यावर अशा प्रकारे उलटा ध्वज लावून चित्ररथ मिरवतो, हेच चित्र मुळी संतापजनक आहे. ब्राझिलीयन संस्कृतीचा उदो करणारा, वास्को द गामाचे कौतुक करणारा चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी होऊ कसा दिला, हाच खरा प्रश्न आहे. आजही या गोमंतभूमीत पोर्तुगिजांचे गोडवे गाणारे, त्या राज्यकर्त्यांची प्रतीक्षा करणारे, त्यांच्या स्वागतासाठी आसुसलेले काही स्वाभिमानशून्य नागरिक या सर्व प्रकारांमागे आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याच मिरवणुकीत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वरूपात त्यांचीच अवहेलना करणारे सोंग बसवून जी चेष्टा चालली होती, ती जागृत नागरिकांनी बंद केली, यापासून तरी आयोजकांनी बोध घ्यावा. महात्मा गांधीजींचे नाव घेत, गांधीवादाचा पुरस्कार करीत असल्याची ढोंगबाजी करीत सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस सरकारच्या कारकिर्दीतच असे प्रकार का घडतात, हे कोडे असले तरी गोमंतकीयांना यामागच्या भेकडांची कल्पना आली आहे. आणखी किती दिवस परदेशी संस्कृती आणि राज्यकर्त्यांचे गोडवे हे गाणार आहेत? पणजीतील रस्त्यांना त्यांची नावे देत आपली देशद्रोही वृत्ती दाखविणारे काहीजण या सर्व प्रकारांमागे आहेत, यात संशय नाही. गोव्यात केवळ भारतीय संस्कृतीच नाही तर पाश्चिमात्यांचा पगडा आपल्यावर आहे, असे भासविण्यासाठी चाललेले हे खटाटोप सध्या सरकारी खर्चाने चालले आहेत, हे अधिक निषेधार्ह आहे. कार्निव्हल या उत्सवाशी ख्रिस्ती धर्माचा संबंध नाही, असा जाहीर फतवा काढून बिशपांनी काही वर्षापूर्वीच कार्निव्हलमधून आपले अंग काढून घेतले होते, तोपर्यंत हा ख्रिस्ती उत्सव असल्याचे भासविले गेले. गेली काही वर्षे पर्यटनाच्या दृष्टीने हा उत्सव अनेक ठिकाणी आयोजित केला जात आहे, त्यास आक्षेप घेतला गेला नाही कारण मर्यादा पाळून मिरवणुका काढल्या गेल्या. लोकजीवनाचे दर्शन घडविण्याचे प्रयत्न त्यामधून केले गेले, पण यावर्षी त्याचे बदललले स्वरूप चिंताजनक असून नेमक्या कोणत्या दिशेने हा उत्सव चालला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
गेल्या तीन दिवसांत तीन मुख्य कार्यक्रम गोव्यात झाले. यापैकी एक होता मडकईचा हिंदू जागृती मेळावा, दुसरा जुने गोवे येथील नरेंद्रभक्तांचा मेळावा आणि तिसरा...कार्निव्हल! या तीन उपक्रमांतील फरक सहज लक्षात यावा असे त्यांचे आयोजन होते. काही कथित धर्मनिरपेक्ष नागरिकांना हिंदू मेळावे संकुचित वृत्तीचे द्योतक वाटले असतील.तथापि देशाच्या घटनेने नागरिकांना दिलेल्या धर्मस्वातंत्र्यानेच असे मेळावे घेतले जाऊ शकतात. संघटना असणे आणि समाज जागृत असणे यासाठी जे पुढाकार घेतात, तेच या देशाचे राष्ट्रीयत्व टिकवून ठेवतात. धर्माभिमान आणि देशाभिमान यात कोणताच भेद न करता जागृती करण्यासाठी, देशद्रोह्यांच्या मनात धडकी निर्माण करणारी शक्ती दर्शविणारे असे कार्यक्रम ही आजची गरज ठरत आहे. समाजातील दुर्बल घटकांचा शोध घेऊन त्यांना मदत करण्याची नितांत आवश्यकता असल्याचा सूर मडकईच्या सभेत व्यक्त झाला. फर्मागुढी येथे होणाऱ्या कार्यक्रमाची जागा बदलली गेली तरी मडकईला असंख्य धर्माभिमान्यांनी उपस्थित राहून आपल्यातील चैतन्याचे दर्शन घडविले. उपद्रव निर्माण करणाऱ्यांना अद्दल घडविणे म्हणजे अधर्म नव्हे, असे अमृतवचन स्वामी ब्रह्मेशानंदाचार्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले. अशाच प्रकारे सध्याच्या स्वार्थी राजकारण्यांवर आसूड ओढत नाणीजधामाचे पीठाधीश स्वामी नरेंद्राचार्य यांनी हिंदूंच्या संघटनाशक्तीचे महत्त्व प्रतिपादन केले. एका बाजूला असे विचारमंथन होऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम चालू असताना, शनिवारी संध्याकाळी मात्र राजधानीत याच्या नेमक्या दिशेने जनतेला नेण्याचे काम कार्निव्हल नामक परदेशी उत्सवाच्या नावाखाली केले जात होते. या राज्यात दोन विचारप्रवाह वाहात असल्याचे चित्र दुर्दैवाने दिसत आहे. विचारस्वातंत्र्याच्या या लोकशाहीतही देशाचा विचार मागे पडता कामा नये, परदेशांची विशेषतः पोर्तुगीज राज्यकर्त्यांची या राज्यात होणारी प्रशंसा सहन केली जाणार नाही, असे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. आपल्या महान आणि अमर संस्कृतीची महती नजरेआड करीत चाललेले नखरे थांबविण्यासाठी आता जागृत नागरिकांनाच आसूड हाती घ्यावा लागेल, असे दिसते.

No comments: