Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 30 October, 2008

वैद्यक क्षेत्रातील बजबजपुरीचा बळी, अखेर मृत्यूने जिजाबाई नाईक यांना गाठलेच

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): गेल्या एका महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या पेडणे तालुक्यातील गांवकरवाडा तुये येथील जिजाबाई ऊर्फ जयश्री तुकाराम नाईक यांनी अखेर काल "गोमेकॉ'त अखेरचा श्वास घेतला.मनमिळाऊ व सदोदित हसतमुख असलेल्या आणि 'माई' या नावाने सुपरिचित असलेल्या जिजाबाई ह्या एका खाजगी वैद्यकीय इस्पितळातील हलगर्जीपणा व सरकारी इस्पितळातील बेदरकारपणाची बळी ठरल्या. त्यांच्या मृत्यूमुळे केवळ तुये गावातच नव्हे तर त्यांचे नातलग असलेल्या सर्वच गावांतून हळहळ व्यक्त होत आहे. आज (बुधवारी) तुये येथे त्यांच्यावर दुपारी शेकडोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा अनेकांना हुंदका आवरता आला नाही.
"ऍपेंडिक्स' च्या शस्त्रक्रियेचे निमित्त जिजाबाई यांच्या जिवावर बेतले. खाजगी वैद्यकीय इस्पितळांची पैशांची हाव व सरकारी इस्पितळांची बेदरकार वृत्ती या प्रकरणामुळे प्रकर्षाने समोर आली आहे. आरोग्य क्षेत्रात बोकाळलेल्या व्यावसायिकतेमुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात फरफट सुरू असल्याचेही जिजाबाई यांच्या मृत्यूने स्पष्ट झाले आहे. ५५ वर्षीय जिजाबाई यांच्यावर गेल्या महिन्यात डिचोलीतील एका बड्या खाजगी इस्पितळात "ऍपेंडिक्स'ची शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या शरीराची एक बाजू बधिर झाली. हे नेमके कशामुळे झाले याचे उत्तर संबंधित डॉक्टर देईनात. अखेर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लगेच बांबोळी इस्पितळात हलवण्यात आले. त्या खासगी इस्पितळातील शस्त्रक्रियेवळी जिजाबाईंवर "ऍनस्थेसिया'(भूल)चे प्रमाण जास्त झाल्याने त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचे काहींचे म्हणणे आहे. खरे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. बांबोळी येथे त्यांना नेले असता तिथे प्रवेश देण्यास डॉक्टरांनी नकार दिला व त्यांना दाखल करून घेण्यास चक्क आठ तास लावले. तिच्यावर तातडीच्या उपचारांची गरज असताना डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे तिची स्थिती अधिकच बिघडली व त्यामुळे त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
गोमेकॉत "व्हेंटिलेटर'ची सुविधा नाही, असे कारण पुढे करून या महिलेला खासगी इस्पितळात हलवण्याचे आदेश बांबोळी येथून देण्यात आले. तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ तिला पणजीतील एका खाजगी इस्पितळात हलवले. जिजाबाईचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने खाजगी इस्पितळाचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. तिला "मेडिक्लेम'ची मदत मिळवून देण्यासाठी अखेर या योजनेअंतर्गत येणाऱ्या येथील एका प्रसिद्ध खाजगी इस्पितळात तिला दाखल करण्यात आले.
सुरुवातीस डिचोलीतील इस्पितळाच्या डॉक्टरांनी तिला झालेल्या व्याधीवर सुमारे दीड लाख रुपये खर्च येईल, असे तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र इस्पितळे बदलत गेली व शेवटच्या इस्पितळात तिची तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांशी चर्चा करून तिच्यावर उपचार करण्यासाठी तीन लाख रुपयांची गरज लागेल, असे सांगितले. रूग्ण महिलेचे संपूर्ण शरीर बधिर झाल्याने तिला प्रति १७ हजार रुपयांची किमान वीस इंजेक्शन द्यावी लागतील, असेही सांगण्यात आले. या खाजगी इस्पितळाच्या व्यवस्थापनातर्फे "गोमेकॉ'तून तिला खाजगी इस्पितळात पाठवल्याचे "सर्टिफिकेट' तसेच "मेडिक्लेम'अंतर्गत तिची केस स्वीकारण्याचे गोमेकॉचे पत्र केवळ तीन तासांत आणण्याची सक्तीही नातलगांवर करण्यात आली. आरंभी तिच्या उपचारांसाठी दीड लाख रुपयांची व्यवस्था तिचे कुटुंबीय तथा नातेवाइकांनी केली होती, मात्र हा आकडा लगेच दुप्पट झाल्याने तसेच उपचारांनंतरही ती ठीक होण्याची हमी देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने तिच्या कुटुंबीयांसमोर पेच निर्माण झाला. पैशांची सोय करण्यासाठी दोन तासांची मुदत देऊन ती न झाल्यास रुग्णाला हलवा अशी जणू तंबीच यावेळी या खासगी इस्पितळाकडून देण्यात आली. या कुटुंबाने व नातेवाइकांनी त्याही परिस्थितीत हार न पत्करता उपचार करण्यास डॉक्टरांना सांगितले. जिजाबाईसाठी तिचे नातेवाईक व हितचिंतकांनी मदतीचा हात पुढे केला. मात्र काही दिवसांनंतर जेव्हा उपचाराला ती प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले तेव्हा डॉक्टरांनी सदर महागडी इंजेक्शने बंद करण्याचा निर्णय घेतला व तिला गोमेकॉत परत नेण्याचा सल्ला दिला. गोमेकॉत सुमारे आठवडा काढल्यानंतर काल रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात तिचा पती, तीन विवाहित कन्या व एक मुलगा असा परिवार आहे. जिजाबाई या तुये गावातील एक हरहुन्नरी महिला कार्यकर्त्या तसेच चांगल्यापैकी फुगडी कलाकारही होत्या. तुये येथील श्री राष्ट्रोळी महिला ग्रुपच्या त्या सदस्य होत्या व या गटाला अखिल गोवा पातळीवर अनेक बक्षिसे प्राप्त झाली आहेत. वैद्यकीय हलगर्जीपणाच्या बळी ठरलेल्या या महिलेच्या निधनाने तुये येथील विशेषतः मावळत्या वाड्यावर शोककळा पसरली आहे.

No comments: