Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 July, 2008

आकड्यांचे गणित अजूनही जमेना...

नवी दिल्ली, दि. 19 - आकड्यांचे गणित जमणे अतिशय कठीण जात असल्याचे लक्षात आल्यानंतर, विश्वास मतापूर्वी कॉंगे्रसची घडी नीट बसविण्यासाठी आणि सर्व खासदारांची निष्ठा तपासून पाहण्यासाठी सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी आज कॉंगे्रसच्या सर्व खासदारांची परेड करण्यात आली. आम्ही पक्षाशी बेईमानी करणार नाही, असे प्रत्येकांच्या तोंडून यावेळी वदवून घेण्यात आले. शिवाय, सर्वांना एकजूट राहून सरकार वाचविण्याच्या कामात हातभार लावण्याची शपथही देण्यात आली.
पक्षाच्या सर्वच खासदारांना एकाचवेळी भेटणे शक्य नसल्याने सोनिया गांधी यांनी गटागटाने खासदारांच्या भेटी घेतल्या. प्रत्येक खासदाराशी सोनिया गांधी यांनी स्वत: चर्चा केली आणि त्यांचे मत जाणून घेतले. दरम्यान, सूत्रांच्या मते, ही परेड केवळ सरकार वाचविण्यासाठीच नव्हती. तर, बहुमत सिद्ध करण्यात संपुआ सरकार अपयशी ठरल्यास काय करायला हवे, याबाबतची रणनीती ठरविण्यासाठीही होती.
280 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा कॉंगे्रसच्या व्यवस्थापकांकडून करण्यात येत असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेले 272 सदस्यांचे पाठबळ आपल्याकडे नाही याची जाणीव सोनिया गांधी यांना आहे. कारण, बहुतांश घटक पक्षातील अंतर्गत मतभेदांनी या क्षणाला भीषण रूप धारण केले आहे. विशेषत: समाजवादी पार्टी आणि राजद या पक्षांमध्ये दोन गट पडले असल्याचे सध्याचे चित्र आहे. सपामधील बंडखोरी तर जगजाहीर झालेली आहे. अनेक खासदारांनी आम्ही विश्वास मताच्या विरोधात मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. अशा स्थितीत सरकारचे अस्तित्व टिकविणे शक्य नसल्याची परिपूर्ण जाणीव सोनिया आहे.
कोणतीही जोखीम स्वीकारण्याची सोनिया गांधी यांची इच्छा नाही. सरकार पडले तरी त्या स्थितीत भाजपाप्रणित रालोआ किंवा डाव्यांना फायदा होणार नाही यासाठी रणनीती कशी असावी यावरही त्या प्रत्येक खासदाराचे मत जाणून घेत आहेत.
पाठिंबा देण्यासाठी समोर येणाऱ्या खासदारांच्या तोंडून निघणारा शब्द पूर्ण करण्याची कॉंगे्रसची तयारी असली तरी, सरकार टिकण्याची शाश्वती नसल्याने आधी मोठ्या उत्साहाने समोर आलेले खासदार आता मागे फिरत आहेत. यात प्रामुख्याने शिबू सोरेन, एच. डी. देवेगौडा यांचा समावेश आहे.
विश्वास मतापूर्वीच राजीनामा?
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला आकड्यांचा खेळ संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात असल्याचे हळूहळू स्पष्ट होत असून, 22 रोजी लोकसभेत सरकारवर पराभवाची नाचक्की ओढवून घेण्यापेक्षा त्याआधीच राजीनामा देऊन सन्मानाने बाहेर पडण्याचा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा विचार असल्याचे कॉंगे्रसच्याच गोटात बोलले जात आहे. दरम्यान, बहुमताचा दावा करून कॉंगे्रसच्या एका प्रवक्त्याने राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
एच. डी. देवेगौडा यांच्या सेक्युलर जनता दलाने अजूनही आपले पत्ते खुले केलेले नाहीत. त्यातच, संपुआने गृहित धरलेल्या तृणमूल कॉंगे्रसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज अणुकराराच्या विरोधात वक्तव्य केले आहे. समाजवादी पार्टीत पडलेली फूट आणि राजदच्या तुरुंगातील खासदारांनी जाहीरपणे व्यक्त केलेली नाराजी आदी गोष्टी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापुढे त्रासदायक ठरलेल्या आहेत.
समाजवादी पार्टीचे संपूर्ण 39 खासदार आणि तृणमूल कॉंगे्रस, तेलगू देसम आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांचा पाठिंबा गृहित धरून संपुआच्या पाठिशी 272 सदस्यांचे पाठबळ असल्याचा दावा कॉंगे्रसने केला होता. विशेषत: याच दाव्याच्या आधारावर स्वत: पंतप्रधानांनी टोकियोत, "डाव्यांनी खुशाल पाठिंबा काढावा, सरकार अणुकरार करणारच' असे विश्वासपूर्ण वक्तव्य केले होते. पण, तृणमूलचे अणुकरारविरोधी वक्तव्य, तेलगू देसमने धरलेली डाव्यांची कास आणि आणि समाजवादी पार्टीत पडलेली उभी फूट हे घटक संपुआच्या सर्वनाशासाठी पर्याप्त आहेत, याची जाणीव सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग दोघांनाही झाली आहे. यातूनच सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्यात 22 रोजी नेमके काय करायला हवे यावर गोपनीय चर्चा झाली आहे. आणखी दोन दिवसांचा वेळ उपलब्ध असल्याने पुरेसे पाठबळ जुटविण्यासाठी जे काही शक्य आहे ते करायचे आणि त्यानंतरही यश आले नाही तर 22 रोजी विश्वास मत सादर करण्यापूर्वीच राजीनामा द्यायचा असे त्यांच्यात ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोरेन डळमळीत
झामुमोचे अध्यक्ष शिबू सोरेन यांनी संपुआला पाठिंबा देण्यासाठी कोळसा मंत्रालयाची मागणी केली होती. त्याआधी, राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष अजितसिंग यांची मागणी पूर्ण करताना त्यांच्या वडिलांचे नाव विमानतळाला देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण, काल झालेल्या कॉंगे्रस सुकाणू समितीच्या बैठकीत तूर्तास मंत्रिमंडळ विस्तार न करण्याचा निर्णय झाला. यामुळे सोरेन यांची भूमिका डळमळीत झाली आहे.
राजीनामा नाही
सरकार पाडण्यासाठी आम्ही सज्ज
चंद्राबाबू नायडू-बर्धन यांच्यात भेट

मायावती बनू शकतात पंतप्रधान : नायडू
नवी दिल्ली - तीन खासदार असलेल्या तेलगू देसमचा पाठिंबा संपुआने गृहित धरला असतानाच या पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज डाव्यांना जाऊन मिळाले. भाकपचे सरचिटणीस ए. बी. बर्धन यांची भेट घेतल्यानंतर, "संपुआ सरकार पाडण्यासाठी आम्ही आता सज्ज आहोत,' असे नायडू यांनी जाहीर केले. बर्धन यांच्या पाठोपाठच नायडू यांनी देखील "मायावती पंतप्रधान बनू शकतात' असे वक्तव्य करून कॉंगे्रसला जबरदस्त धक्काच दिला आहे.
नायडू आज सकाळी बर्धन यांच्या भेटीला गेले. यावेळी डी. राजा हे देखील उपस्थित होते. त्यांच्यात सध्याची राजकीय स्थिती आणि संपुआविरोधी मतांचे एकत्रीकरण करण्याच्या मुद्यांवर चर्चा झाली. उभय नेत्यांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली. अमेरिकेसोबतच्या अणुकराराला तेलगू देसमचा विरोध असल्याचे स्पष्ट करताना नायडू म्हणाले, भाकप आणि अन्य डाव्या पक्षांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. सरकारविरोधी मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्हाला यात बऱ्यापैकी यश आले असून, विरोधकांकडे सध्या जे पाठबळ आहे ते पाहू जाता सरकारचे पतन अटळ आहे.
संपुआ सरकार कोसळल्यानंतर सर्व विरोधक एकत्र येतील आणि पर्यायी सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. आमच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार मायावती याच राहणार आहेत. लोकसभेच्या उर्वरित कालावधीसाठी मायावती यांच्याकडेच देशाची सूत्रे सोपविण्यात येतील, असे ते म्हणाले.
बर्धन यांची भेट घेतल्यानंतर नायडू यांनी मायावती यांची भेट घेतली आणि पंतप्रधानपदासाठी आपल्या उमेदवारीला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.
नोव्हेंबरात निवडणुका - माकप
केंद्रातील संपुआ सरकार अवघ्या तीन दिवसांचे आहे. 22 जुलै ही या सरकारची शेवटची तारीख आहे. त्यानंतर केंद्रात हे सरकार दिसणार नाही. नोव्हेंबरमध्येच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात येतील, असे भाकित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) आज झालेल्या बैठकीत करण्यात आले.
माकपच्या केंद्रीय समितीची आजपासून दोन दिवसीय बैठक सुरू झाली. या बैठकीत एकूणच राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. अणुकराराला विरोध, वाढती महागाई आणि अन्य देशहिताच्या मुद्यांवरील डाव्यांची भूमिका या सर्वच गोष्टींचे आगामी निवडणुकीत मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणती रणनीती असावी, यावरही बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.
डावे, बसप, प्रादेशिक आघाडीची आज बैठक
दरम्यान, सरकार कोसळल्यानंतर काय करायचे यावर विचार करण्यासाठी डावे पक्ष, बसपा आणि प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची उद्या (रविवारी) राजधानी दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. मनमोहनसिंग सरकारचे पतन झाल्यानंतर बसपा नेत्या मायावती यांना पंतप्रधान बनविण्याच्या मुद्यावर अन्य राजकीय पक्षांचा पाठिंबा प्राप्त करण्याच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
"सप'ला आणखी एक धक्का
संपुआ सरकार वाचविण्यासाठी पुढे आलेल्या समाजवादी पक्षाला सातत्याने राजकीय धक्के बसत आहेत. चार खासदारांनी बंडखोरीचे निशाण फडकविल्यानंतर आज या पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि सरचिटणीस शाहिद सिद्दिकी यांनी पक्षाचा राजीनामा देत बहुजन समाज पक्षात सामील होण्याची घोषणा केली.
बसपा नेत्या आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांची भेट त्यांनी आज घेतली.
"संपुआ'कडे 291 सदस्य : लालू
सरकार वाचविण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी खासदारांच्या खरेदी-विक्रीत व्यस्त आहे, असा आरोप करणारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए. बी. वर्धन यांना इतिहास कधीच माफ करणार नाही, असे सांगताना राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी, "संपुआ सरकारकडे 291 सदस्य असल्याने सरकार विश्वासमत जिंकेलच,' असा दावा केला.
सरकारविरोधात व्हीप जारी

डाव्या आघाडीतील अन्य दोन घटक पक्ष असलेल्या क्रांतिकारी समाजवादी दल आणि फॉरवर्ड ब्लॉकनेही व्हीप जारी करून "संपुआ' सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे निर्देश आपल्या सदस्यांना दिले आहेत.
दोन्ही डाव्या पक्षांनी स्वतंत्र व्हीप जारी केले आहेत. 21 पासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे आणि 22 रोजीच्या मतदानात सरकारवरील विश्वास मताच्या विरोधात मतदान करावे, असे स्पष्ट निर्देश या व्हीपच्या साहाय्याने देण्यात आले आहेत. आरएसपी आणि फॉरवर्ड ब्लॉकचे लोकसभेत प्रत्येकी तीन सदस्य आहेत.

No comments: