Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 July, 2008

ओळखपत्रांवर "कदंब'चा शिक्का तूर्त सक्तीचा नाही

पणजी,दि. 19 (प्रतिनिधी) - राज्यातील शाळकरी ते विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी बसप्रवासात 50 टक्के सूट मिळवण्यासाठी कदंब महामंडळाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांवर आपला (कदंबचा) शिक्का सक्तीचा बनवण्याचा निर्णय महामंडळाने तूर्त स्थगित केला आहे.
राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना ओळखपत्रे वितरित केली आहेत. तसेच काही संस्थांनी विद्यार्थ्यांना लॅमिनेटेट ओळखपत्रे दिल्याने ही सक्ती राबवण्यास असमर्थता दर्शवल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. ही सक्ती पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाईल,अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष तथा कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांनी दिली.
त्यामुळे सध्याची पद्धत तशीच सुरू राहणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट ओळखपत्रांचा वापर करून बस प्रवासातील या सुविधेचा लाभ अनेकांकडून केला जात असल्याने कदंब महामंडळाने याप्रकाराला आळा घालण्यासाठी ही शक्कल लढवली होती. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते विद्यापीठापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सार्वजनिक बसप्रवासात 50 टक्के सूट देण्याची एकमेव अभिनव योजना गोव्यात गेली कित्येक वर्षे सुरू आहे. विद्यार्थ्यांना पन्नास टक्के प्रवासात सूट मिळवण्यासाठी मोठे आंदोलन गोव्यात झाले होते. विद्यार्थी आंदोलनात अजूनही या आंदोलनाचा अग्रक्रमाने उल्लेख होतो. विद्यार्थी असल्याची ओळख दिल्यानंतर खाजगी तथा कदंब प्रवासी बसगाडीत राज्याअंतर्गत प्रवासासाठी केवळ अर्धे तिकीट दर आकारले जाते. या ओळखपत्राची शक्कल लढवून राज्यात बनावट ओळखपत्रांचा वापर करून या सुविधेचा गैरवापर होत असल्याचे कदंब महामंडळाला आढळले आहे. महामंडळाने याप्रकरणी शिक्षण खाते व गोवा विद्यापीठाला पत्र पाठवून ओळखपत्रांवर कदंब महामंडळाचा शिक्का सक्तीचा बनवावा असा प्रस्ताव पाठवला होता. दरम्यान, हे अतिरिक्त काम डोक्यावर घेण्यास अनेक संस्थांनी नाराजी दर्शवली होती. ओळखपत्रे विद्यार्थ्यांना दिली आहेत किंवा ती लॅमिनेट केली आहेत, त्यामुळे महामंडळाचा शिक्का घेणे कठीण बनल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने आता हा निर्णय यावर्षी लागू न करता पुढील वर्षापासून लागू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. ही नवी पद्धत लागू केल्यानंतर खऱ्या अर्थाने या योजनेला अधिकृत मान्यता मिळणार असून विद्यार्थी व बस कंडक्टर यांच्यात अर्ध्या तिकिटावरून वारंवार उडणारे खटकेही बंद होतील असे मत रेजिनाल्ड यांनी व्यक्त केले आहे.

No comments: