Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 July, 2008

रस्ता वाहतूक खात्यातील भ्रष्टाचारावर कारवाई सुरू

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): मडगावातील "जय दामोदर' संघटनेचे अध्यक्ष महेश नायक यांनी राज्यातील रस्ता वाहतूक खात्यात प्रामुख्याने दक्षिण गोव्यातील कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रारींवर दक्षता खात्याने कारवाई सुरू केली आहे. दक्षता खात्याने वाहतूक संचालकांना दिलेल्या आदेशात याप्रकरणांची सर्व कागदपत्रे दोन दिवसांत दक्षता खात्याकडे सुपूर्द करण्याचे तसेच तसे न झाल्यास ती "सील' करण्याची ताकीद दिली आहे.
विधानसभा अस्थायी समितीच्या दक्षता खात्याची सुनावणी सुरू असताना महेश नायक यांनी रस्ता वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उपस्थित करून यासंबंधीची माहिती समितीला सुपूर्द केली होती. यातील अनेक प्रकरणांत प्रथमदर्शनी तथ्य स्पष्टपणे दिसत असल्याने दक्षता खात्याने त्याची गंभीर दखल घ्यावी असे आदेश समितीने दिले होते. दक्षता खात्याचे सचिव व्ही. के. झा यांनी महेश नायक यांना बोलावून त्यांच्याकडून याप्रकरणाची सगळी कागदपत्रे घेतली होती. श्री. झा यांनी खात्याचे संचालक अमरसिंग राणे यांना याप्रकरणाची चौकशी करून पंधरा दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, त्याप्रमाणे या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आता ही कागदपत्रे हस्तगत करून त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती खात्यातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे जेणेकरून चौकशीत कोणतेही अडथळे निर्माण होणार नाहीत, अशी मागणी महेश नायक यांनी केली आहे. रस्ता वाहतूक खात्यातील भ्रष्टाचार व तेथील काही अधिकाऱ्यांच्या अरेरावीच्या वागणुकीबाबत खुद्द वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडेही तक्रारी आल्याने त्यांनीही या प्रकरणाची चौकशी व्हावी,असे आदेश दिल्याचे सदर सूत्रांनी स्पष्ट केले.
मुळातच रस्ता वाहतूक अधिकारिपदासाठी लाखोंची लाच देऊन नोकरी दिली जाते हे उघड गुपित आहे. हा पैसा वसूल करण्यासाठीच अशा प्रकारे अनेक गैरव्यवहार या खात्यात उघडपणे केले जातात. या गैरव्यवहारांना वरिष्ठांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांचा वरदहस्त लाभत असल्यानेच या भानगडी उघड होत नाहीत, असा आरोप श्री. नायक यांनी केला आहे. तत्कालीन वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी ५ मार्च २००७ रोजी महेश नायक यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली व त्यासंबंधी दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्य सचिव जे. पी. सिंग यांना जारी केले होते. यासंबंधी चौकशी अहवाल २० मार्च २००७ रोजी सादर करण्याचा आदेशही देण्यात आला होता. तथापि, त्यानंतर पुढे काहीही झाले नव्हते. महेश नायक यांनी केलेल्या तक्रारींत पुराव्यासह एकूण १७ गंभीर आरोप विविध रस्ता वाहतूक अधिकाऱ्यांवर ठेवले आहेत. वाहन चालक परवाने,फिटनेस परवाने, प्रदूषण नियंत्रण परवाने, परवाने नूतनीकरण, वाहन बदली, बनावट परवाने आदी प्रकरणांसह मोटर वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रस्ता वाहतूक खात्यात विविध कामांसाठी अधिकारी किती दर आकारतात याची एक यादीच तयार करून तीदेखील सचिवांना सादर करण्यात आली आहे.

No comments: