Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 July, 2008

आठ बंडखोर खासदारांची भाजपकडून हकालपट्टी

तेलगू देसम, बिजद व अकाली दलाकडूनही कारवाई
नवी दिल्ली, दि.२३ : लोकसभेत संपुआ सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या व सरकारच्या बाजूने मतदान करणाऱ्या भाजपाच्या आठ बंडखोर खासदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. विश्वास ठरावावर पक्षाने जारी केलेला व्हीप झुगारल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तेलगू देसम, बिजद व अकाली दलानेही बंडखोरांविरुद्ध अशीच पावले उचलली आहेत.
भाजपमधील बंडखोर खासदारांच्या हकालपट्टीविषयीची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. हकालपट्टी करण्यात आलेल्या या आठ खासदारांमध्ये दमोहचे चंद्रभान, सोमाभाई पटेल, सांगतियाना, बाबूभाई कटारा, मंजूनाथ, ब्रजभूषण शर्मा, मनोरमा माधवराज आणि यवतमाळचे हरीभाऊ राठोड आदींचा समावेश आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सरकारच्या विजयावर जोरदार तोफ डागताना सरकारने विजय मिळविण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या व कलंकित विजय मिळविला, असे म्हटले आहे.
लोकसभेच्या इतिहासातील काळा दिवस
"भाजपच्या या आठ खासदारांनी विश्वासदर्शक ठरावात जर "क्रॉस व्होटिंग' केले नसते तर संपुआ सरकारचा पराभव निश्चित झाला असता. २२ जुलैचा दिवस लोकसभेच्या इतिहासातील काळा दिवस आहे. लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी खासदारांना लाच देण्याच्या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी,''अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. राजधानी दिल्लीत अडवाणी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या आठ बंडखोर खासदारांवर हकालपट्टी करण्याच्या कारवाईचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.
""क्रॉस व्होटिंग झाल्यामुळेच संपुआ सरकार जिंकू शकले. क्रॉस व्होटिंगशिवाय सरकार जिंकूच शकले नसते. संपुआ सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. संपुआ सरकारने आपल्या कार्यकाळाला कलंकित मंत्र्यांसोबतच सुरूवात केली होती आणि आता संसदेत विश्वास ठराव जिंकण्यासोबतच कलंकित विजयानेच त्यांनी शेवट केलेला आहे. संपुआने ज्या पद्धतीने विश्वासमत जिंकले, ती पद्धत संसदेच्या प्रतिष्ठेला छेद देणारी आहे. संसदेचा हा अपमान आहे. लोकशाहीची हत्या आहे,''अशी जोरदार टीका अडवाणी यांनी यावेळी केली.
तेलुगू देसम्ची कारवाई
लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानादरम्यान संपुआला मते देणाऱ्या आपल्या बंडखोर खासदारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेत तेलुगू देसम् पार्टीने जगन्नाथन यांना त्वरित निलंबित केले आहे. सोबतच अन्य एका खासदाराला नोटीस बजावून त्वरित पक्ष मुख्यालयात पाचारण केले आहे.
तेलुगू देसम्च्या डी.के.अधिकेश्वरलू नायडू आणि एम. जगन्नाथन या दोन खासदारांनी पक्षादेश झुगारून संपुआला मतदान केले. हा विश्वासघाताचा प्रकार असून याची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही. त्यांच्यावर पक्षातर्फे योग्य ती कारवाई केली जाईल, असे पक्षाचे संसदेतील नेते के. येरन् नायडू यांनी म्हटले आहे.
या कारवाईचा एक भाग म्हणून खासदार जगन्नाथन यांना त्वरित निलंबित करण्यात आले आहे.
'बिजद'कडूनही हकालपट्टी
संपुआ सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या प्रक्रियेत "क्रॉस व्होटिंग' करून व अनुपस्थित राहून सरकारच्या विजयाला हातभार लावणाऱ्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ओरिसातील बिजू जनता दलाने बंडखोरी करणाऱ्या आपल्या एका खासदाराला पक्षातून हाकलले आहे.
पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बिजू जनता दलाच्या या खासदाराचे नाव हरिहर स्वैन असे आहे. बिजू जनता दल हा रालोआचा घटकपक्ष आहे व विश्वासदर्शक ठरावात राओला सरकारच्या विरोधात होता. विश्वासदर्शक ठरावात सरकारच्या विरोधात मतदान करण्यासाठी बिजू जनता दलाने व्हीप जारी केला होता. असे असताना बंडखोर खासदारांनी व्हीप मोडला होता.
""हरिहर स्वैन यांना लोकसभा सदस्यपदावरून अपात्र ठरविण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. स्वैन यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे,''अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री व बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर येथून दिली.
पक्षाने केलेल्या हकालपट्टीच्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी हरिहर स्वैन यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले,""माझ्या अंतराम्याने जे मला करायला सांगितले, तेच मी केले.''
लिब्रा यांच्यावर कारवाई शक्य
डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या महत्त्वपूर्ण मतदान प्रक्रियेत अनुपस्थित राहून सरकारचा विजय सुकर करणारे शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखदेवसिंग लिब्रा यांच्या बंडखोरीची गंभीर दखल पक्षाने घेतलेली आहे. लिब्रा यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत पक्ष नेतृत्वाने आज दिले आहेत.
संपुआ सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या मतदानाच्या वेळी लिब्रा हे अनुपस्थित राहिले होते. त्यांनी अनुपस्थित राहून पक्षाविरुद्ध भूमिका घेतली आहे. याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,''अशी माहिती शिरोमणी अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
""लोकसभेत विश्वासदर्शक ठरावावरील दोन दिवसांच्या वादळी चर्चेत पहिल्या दिवशी लिब्रा हे उपस्थित होते. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र हजरपुस्तिकेवर स्वाक्षरी केल्यानंतर ते अनुपस्थित राहिले. त्यांनी जे काही केले ते पक्षविरोधी आहे. अनुपस्थित राहून त्यांनी सरकारला विजय मिळवून देण्यात हातभारच लावलेला आहे. त्यांनी केलेले कृत्य निषेधार्ह आहे. याबद्दल त्यांना शिक्षा होईल,''असे मुख्यमंत्री बादल यांनी सांगितले.

No comments: