Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 25 July, 2008

अमरनाथ जमीनप्रकरण पुन्हा पेटले जम्मू

.. एका युवकाने केले आत्मबलिदान
..सहा पोलिसांना जबर मारहाण
..तणाव; संचारबदी लागू

श्रीनगर, दि.२४ : अमरनाथ देवस्थान समितीला दिलेली जमीन परत घेण्याच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या एका युवकाने बुधवारी आत्मबलिदान केले. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा आंदोलनाचा वणवा भडकला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जम्मू क्षेत्राचे आयुक्त सुधांशू पांडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अमरनाथ जमिनीच्या वादावरून एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तसेच अमरनाथ संघर्ष समितीने आज "जम्मू बंद'चे आवाहन केले. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही गडबड होऊ नये म्हणून येथे संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
आज "बंद' दरम्यान काही ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी सहा पोलिसांना पकडून त्यांना जबर मारहाण केली आणि त्यांचे कपडे फाडून टाकले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूच्या परेड ग्राऊंडमध्ये बुधवारी २० वर्षीय कुलदीप कुमार डोगरा नामक युवकाने अतिशय भावनिक असे भाषण केले. त्यात त्याने म्हटले की, या संघर्षाला बलिदानाची गरज आहे. त्याचठिकाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपोषणावर बसले होते. भाषणापूर्वीच कुलदीपने विष प्राशन केले होते. काही क्षणातच तो बेशुद्ध पडला तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण, तेथे नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने संतापलेल्या संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी कुलदीपचे शव उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून शव आपल्या ताब्यात घेतले. पण, कार्यकर्त्यांनी पुन्हा ते स्वत:कडे ओढून घेतले. यावरून पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमक उडाली.
नंतर पोलिसांनी कुलदीपचा मृतदेह त्याच्या बिस्नाह नामक गावात नेला. येथील तणाव लक्षात घेऊन आसपासच्या परिसरातही संचारबंदी लागू करण्यात आली. कुलदीपच्या खिशातून निघालेल्या पत्रात म्हटले होते की, नॅशनल कॉन्फसचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी संसदेत दिलेल्या वक्तव्यामुळे आपण दु:खी झालो. त्यात अब्दुल्ला यांनी म्हटले होते की काश्मिरी मेले तरी अमरनाथ बोर्डाला वनभूमी दिली जाणार नाही.
श्रीनगरमध्ये स्फोटात ५ जण ठार
श्रीनगर येथील गजबजलेल्या बाटमालू बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड स्फोटात तीन लहान मुलांसह पाच जण मृत्युमुखी पडले असून इतर १८ जण जखमी झाले आहेत.
प्रसिद्ध लाल चौकापासून जवळच असलेल्या या बस स्थानकावर जम्मूकडे जाण्यासाठी उभ्या असलेल्या बसवर एका अज्ञात इसमाने आज दुपारी हा ग्रेनेड फेकून स्फोट घडवून आणला, अशी माहिती एका अधिकृत सूत्राने दिली.
जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसल्याचेही या सूत्राने सांगितले.
परराज्यातील मजुरांचा समूह आपल्या राहत्या ठिकाणी जाण्यासाठी जम्मूच्या बसमध्ये चढत असताना हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, मृतकांपैकी दोन मुलांची ओळख पटली असून त्यांची नावे खुशबू व आदिल अशी आहेत. मोहम्मद अफरोज यांची ही दोन मुले असून स्वत: अफरोजही या स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत. बेशुद्ध अवस्थेत अफरोजला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, त्यानंतर त्यांना आपली मुले ठार झाल्याचे हॉस्पिटलमध्ये कळले.
या मृतकांमध्ये एका महिलेचा समावेश असून तिची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही.

No comments: