Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 25 July, 2008

मडगावात चोऱ्यांची 'हॅट्रिक' ३.४५ लाखांचे कॅमेरे पळवले

मडगाव दि. २४ (प्रतिनिधी) : सलग तिसऱ्या दिवशी चोरांनी मडगाव पोलिसांना आपला हिसका दाखवताना हमरस्त्यावरील "तळावलीकर इलेक्ट्रिकल्स' हे दुकान फोडून ३.७५ लाख रु. किंमतीचे ४ महागडे कॅमेरे लांबवले. मोठ्या आस्थापनांत होऊ लागलेल्या या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. गेल्या महिनाअखेरीस शहरात उसळलेल्या दंगलीनंतर जागोजागी तैनात केलेला पोलिस बंदोबस्त अजूनही तसाच असताना या चोऱ्या कशा होतात, असा सवाल लोक करू लागले आहेत.
येथील आनाफोन्त उद्यानाकडील मुख्य रस्त्यावर असलेल्या तळावलीकर इलेक्ट्रीकल्स या दुकानात ही धाडसी चोरी झाली. परवा बोर्डा येथे मुश्ताक यांचे दुकान फोडून ज्या पध्दतीने लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू पळवण्यात आल्या होत्या त्याच पध्दतीने म्हणजे शटर वाकवून ही चोरी झाली. यामागे एकाच टोळीचा हात असावा असा पोलिस अधिकाऱ्यांचा कयास आहे.
तळावलीकर यांच्या दुकानातून चोरट्यांनी सोनीचे दोन, एक डिजिटल व एक व्हिडीओ कॅमेरा मिळून एकूण ४ कॅमेरे पळविले. त्यांची एकूण किंमत ३.७५ लाख आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास आल्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला . नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला, पण त्यांना तेथे चोरांचा माग दाखवणारा कोणताच पुरावा सापडलेला नाही.
कालचे बोर्डा येथील १.९० लाखांच्या लॅपटॉप चोरीचे प्रकरण ताजे असतानाच आजचा हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. त्यापूर्वी परवा आकें येथील अरविंद शहा यांचे ८० हजारांची रोकड असलेली बॅग पळविण्याचा प्रकार ताजा असतानाच हे चोऱ्यांचे प्रकार घडले आहेत .त्या पूर्वी गेल्या जून मिहिन्यात आर्लेम -राय येथील व्यंकटेश कामत यांच्या घरातून ८ लाखांचे दागिने प्रवेशव्दार फोडून पळवण्याचा प्रकार सायंकाळी घडला होता. तसेच एका औषधालयातून औषधे पळविण्याचा प्रकार घडला होता . नंतर मालभाट व पाजीफोंड येथे अशाच मोठ्या चोऱ्या झाल्या. तथापि, त्यापैकी कोणत्याही चोरीचा उलगडा अजून झालेला नाही.

No comments: