Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 1 April, 2008

संशयितांच्या चौकशीचे आदेश महानिरीक्षक कुमार यांच्याकडून गंभीर दखल

- तपासाच्या दैनंदिन प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश
- आज शवचिकित्सा अहवाल मिळणार
- पार्वतीच्या हस्ताक्षराची पडताळणी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): फोंड्यातील त्या दोन तरुणीच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी चालवलेल्या संथ तपासकामाची गंभीर दखल पोलिस महानिरीक्षक किशन कुमार यांनी घेतली आहे. निरुक्ता शिवडेकर आत्महत्या प्रकरणात संशयित म्हणून ज्यांची नावे समोर येत आहेत अशांच्या चौकशीचे आदेश आज फोंडा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक महेश गावकर यांना देण्यात आले. तसेच पार्वती (पारो) हिने मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर आणि तिचे हस्ताक्षर याचीही छाननी करून अहवाल सादर करण्याची सूचना कुमार यांनी दिली आहे. या प्रकरणी होणाऱ्या तपासाच्या प्रगतीची माहिती दररोज देण्याचाही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले.
निरुक्ताचा डॉक्टरांनी राखीव ठेवलेला शवचिकित्सा अहवाल उद्या (बुधवारी) पोलिसांना मिळणार आहे. या अहवालानंतर अनेक गोष्टी उघड होतील. दरम्यान फोंडा तालुक्यात तरुणी व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या भागातील सर्व महिला मंडळे आणि सामाजिक संस्थानी पुढे यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शशी पणजीकर यांनी केले आहे.
दरम्यान, नागरिकांकडून यासंदर्भात पोलिसांवर येत असलेल्या दबावामुळे तपासाची चक्रे आता फिरू लागल्याचे दिसून येते. आत्महत्या केलेल्या पहिल्या अल्पवयीन तरुणीच्या मोबाईलची कॉल यादी त्यांनी मागवली आहे. तसेच मयत नियुक्ता शिवडेकर हिच्या मैत्रिणी व तिच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशीही चालू केली आहे.
नियुक्ताच्या आत्महत्येनंतर समाजाच्या विविध स्तरांतून अनेक शंका उपस्थित केल्या जात असताना आणि तिच्या आकस्मिक मृत्यूची कसून चौकशी केली जावी अशी मागणी होत असतानाच फोंडा पोलिस मात्र ती केवळ एक आत्महत्याच आहे याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहता होते. यासंदर्भात नागरिक आणि पत्रकारांनी उजेड घालण्याचा प्रयत्न केला असता हा विषय विनाकारण मोठा केला जात असल्याचा ठपकाही ते ठेवत होते. दोन दिवसांपूर्वी एका महिला संघटनेने फोंडा पोलिस स्थानकावर या प्रकरणी धडक दिली असता त्यांनी तोच सूर लावला होता. फोंड्यातील नागरिक मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी करीत आहे.
नियुक्ताने आत्महत्या करण्यापूर्वी तीन दिवस महाविद्यालयातही गेली नव्हती हे खुद्द त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीच स्पष्ट केले होते. तिने गोकर्णाहून परतताना तिच्या मित्राला शेवटचा फोन केला होता. पोलिसांनी तिच्या त्या मित्राकडून कोणती माहिती मिळविली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु, त्यानंतर घरी परतताच तिने आत्महत्या केली हे वास्तव आहे. ज्या परिस्थितीत ताण तणावाच्या वातावरणात तिने हे सर्व केले आणि जी चर्चा सध्या फोंड्यात सुरू आहे ते पाहता हे प्रकरण दिसते तेवढे साधे नाही असे खुद्द फोंड्यातील नागरिकच मानतात.
नियुक्ताने आत्महत्या करावी असे कोणते संकट तिच्यावर कोसळले होते. ही पाळी तिच्यावर कोणी व का आणली, ती ज्यांच्यासोबत फिरत होती, वावरत होती ती मंडळी कोण, तिचे मित्रमंडळ कोण असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. गेले काही दिवस पोलिसच या प्रश्नाची आपल्या सोयीप्रमाणे उत्तरे देत होते. मात्र स्थानिक नागरिक, अनेक काळजीयुक्त पालक, सामाजिक संघटना, समाज सेवक, नगरसेवक, खुद्द नगराध्यक्ष व अनेकांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचा आग्रह गेल्या काही दिवसांपासून धरल्याने पोलिसांचीच पंचाईत झाली.

No comments: