Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 April, 2008

खाण बंद करण्यासाठी विश्वजित प्रयत्नशील

हरीष मेलवानी यांचा आरोप
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): कोणतेही कारण नसताना केवळ राजकीय सुडापोटी वरचे हरवळे साखळी येथील एच. एल. नथ्थुरमल खाण बंद करण्यासाठी आरोग्य मंत्री विश्वजित राणे प्रयत्नशील असल्याचा आरोप आज या खाणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीष एल. मेलवानी यांनी केला. हा प्रकार राणे यांनी त्वरित न थांबवल्यास लवकरच या खाणीवरील कामगारांसह त्यांच्या घरावर आणि खाण संचालनालयावर मोर्चा काढण्याचा इशारा श्री. मेलवानी आणि दामोदर घाडी यांनी दिला.
हे दोघे आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर खाणींवरील काही कामगार उपस्थित होते. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच स्थानिक पंचायतीकडून "ना हरकत' दाखल असताना मंत्री राणे हे खाण संचालनालयातील अधिकाऱ्यांना पाठवून त्यांना खाणीवर कारवाई करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप मेलवानी व घाडी यांनी केला. या खाणीवर सध्या २५० कामगार आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत आहेत. खाण बंद पडल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.
एका बाजूने विश्वजित राणे सत्तरी भागातील बेकायदा खाणी बंद पाडणार असल्याची डरकाळी फोडतात आणि दुसऱ्या बाजूने केपे आमदाराच्या पत्नी रोहिणी बाबू कवळेकर यांना खाण सुरू करण्यास देतात, हे न कळण्याजोगे आहे. सर्व्हे क्रमांत २७ मधे मे. कवळेकर यांना ही खाण देण्यात आल्याचे घाडी म्हणाले.
प्रदूषण करणाऱ्या खाणी राणे यांना बंद करायच्या असल्यास ते पाळी व आमोणे येथील धूळ प्रदूषण करणाऱ्या खाणी का बंद पाडत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. ही खाण बंद पाडण्याच्या मागे त्यांचा विशिष्ट हेतू असून त्यांनी चर्चेसाठी तसा "एसएमएस'ही पाठवल्याचे सांगण्यात आले.
१९ एप्रिल २००५ रोजी स्थानिक पंचायतीने खाण सुरू करण्यात ना हरकत दाखल दिला. त्यानंतर दि. ६ फेब्रुवारी ०८ रोजी राणे यांनी प्रयत्न करून खाण बंद पाडली. मात्र त्याविरोधात न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती मिळवण्यात आली आणि खाण सुरू करण्यात आली. तथापि, त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी कोणताही न्यायालयाचा आदेश न आणता, खाण संचालनालयाचे निरीक्षक अँथनी लोपिस हे जबरदस्तीने खाणीवर आले आणि त्यांनी तेथे चालणारी सर्व यंत्रे बंद पाडली. त्यावेळी त्यांच्याकडे यंत्रे बंद करण्याचा कोणताही आदेश नव्हता, असा दावा मेलवानी यांनी केला. त्यानंतर लोपिस यांनी डिचोलीला जाऊन खाणीवरील दीडशे कामगारांच्या विरोधात खोटी पोलिस तक्रार दाखल केल्याचे मेलवानी म्हणाले.
रोहिणी बाबू कवळेकर यांना दिलेल्या खाणीच्या ठिकाणी जाण्यास रस्ता नसल्याने विश्वजित राणे हात धुऊन आमच्या राशीला लागल्याचे घाडी म्हणाले. गोव्यात बेरोजगारी आहे. कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या प्रभागातील तरुणांना कामावर लावलेले नाही. अनेक कुटुंब या खाणीमुळे आपला उदरनिर्वाह करतात. ही खाण बंद पडल्यास आमचे हाल होतील, असे तेथील नागरिक दशरथ मळीक यांनी सांगितले.

No comments: