Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 April, 2008

महेंद्रसिंग टिकेैत यांना अटक; जामिनावर मुक्त

मुझफ्फरनगर, दि.२: उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याविरुद्ध जातिवाचक वक्तव्य करणारे "भारतीय किसान युनियन'चे नेते महेंद्रसिंग टिकैत यांनी अखेर आज गेल्या तीन दिवसांपासूनची कोंडी फोडत पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शरणागती पत्करताच त्यांना लगेचच अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांना बिजनौर येथील न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
टिकैत यांना अटक करण्यासाठी तब्बल १० हजार पोलिस जवान तैनात करण्यात आले होते. त्यांच्या दिमतीला निमलष्करी दलही होते. मात्र, टिकैत यांना अटक होऊ नये म्हणून त्यांच्या ४ हजार समर्थकांनी त्यांना वेढा घातला होता. या अभूतपूर्व नाट्यामुळे मुझफ्फरनगरच्या सिसोली गावामध्ये गेल्या तीन दिवसांपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
""होय. ७३ वर्षीय शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांना अटक करण्यात आलेली आहे. शांततापूर्ण वातावरणात आज सकाळी त्यांनी बोलणी केली. यांनतर कारच्या ताफ्यांमध्ये येऊन त्यांनी शरणागती पत्करली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली,''अशी माहिती राज्याचे पोलिस महानिरीक्षक (रेल्वे) गुरुदर्शनसिंग यांनी आज दिली.
""महेंद्रसिंग टिकैत हे आमच्या ताब्यात आहेत. त्यांच्याशी शरणागती पत्करण्याची बोलणी व अटकेची कारवाई शांततापूर्ण वातावरणात व घटनेच्या चौकटीत झाली. यावेळी हजर असलेल्या किसान नेत्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांनी या कारवाईच्या वेळी शांतता राखली व संयम ठेवला,''असे सिंग यांनी जाट नेत्याच्या मुलाच्या घराबाहेर सांगितले.
महेंद्रसिंग टिकैत यांनी काल उशिरा रात्री मायावती यांच्याविरुद्ध केलेले जातिवाचक वक्तव्य मागे घेतले होते. "मायावती मला मुलीसमान आहेत. माझे शब्द त्यांना लागले असतील, तर मी जे काही बोललो ते मागे घेतो,'असेही त्यांनी काल म्हटले होते.
""मुख्यमंत्री मायावती यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करणे ही माझी चूक होती. त्यांच्याविरुद्ध बोलून मी चूक केली. मायावती मला मुलीसारखी आहे. जिभ घसरून मी बोललो. मनुष्याच्या हातून चूक होते त्याचप्रमाणे माझ्या हातून ही चूक घडली. पोलिसांना अटक करू देण्याची माझी इच्छा होती परंतु मी कार्यकर्त्यांच्याही भावनांचा आदर राखला. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला संघर्ष होऊ द्यायचा नव्हता,''असेही टिकैत यांनी सांगितले.

No comments: