Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 April, 2008

निरूक्ता मत्यू प्रकरणी २० जणांच्या जबान्या

कॉल्सचा तपशील पोलिसांच्या हाती
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): निरुक्ता शिवडेकर हिच्या मोबाईलवरील "कॉल्स डिटेल' पोलिसांच्या हाती आले असून त्याआधारे अतापर्यंत पोलिसांनी वीसहून अधिक व्यक्तींच्या जबान्या नोंदवल्याची माहिती फोंड्याचे निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी आज दिली. तसेच पार्वती या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्या चिठ्ठीतील हस्ताक्षर आणि तिचे हस्ताक्षर याची छाननी करून अहवाल सादर करण्याची सूचना काल पोलिस महानिरीक्षक किशन कुमार यांनी तपास अधिकाऱ्यांना केली होती.
निरुक्ताचा राखून ठेवलेला शवचिकित्सा अहवाल आला असून मृत्यूसमयी तिला दिवस गेले नव्हते हे त्याद्वारे स्पष्ट झाल्याचे देसाई यांनी सांगितले. किंबहुना अलीकडे तिच्या आत्महत्येनंतर फोंडा पोलिसांनीच ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले होते. अनेक वृत्तपत्रांनी तसे वृत्त प्रसिद्ध केले होते.
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच
गोकर्ण येथून परत आलेल्या निरुक्ताने आपल्या आयुष्याचा का अंत केला, या प्रश्नाचे उत्तर फोंडा तालुक्यातील नागरिक शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. अंगी कलागुण असलेल्या एका अल्पवयीन मुलीला आत्महत्या करावी, असे का वाटले, हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. निरूक्ताच्या मत्यूचे पडसाद फोंडा आणि आजूबाजूच्या परिसरात उमटल्यानंतर तिच्या संशयास्पद आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून आता तपासाची व्याप्ती वाढवली आहे. निरीक्षक देसाई यांनीही त्या दुजोरा दिला.
पारितोषिकाचे स्वरूप काय?
एका सौंदर्य स्पर्धेत विजयी ठरलेल्या निरुक्ताला पारितोषिक म्हणून काय मिळाले होते, हे अद्याप उघड झालेले नाही. हे पारितोषिक मिळाल्यानंतर विजेते बंगळूर येथे गेले होते, अशी चर्चा सध्या फोंडा शहरात सुरू आहे. मात्र निरुक्ता बंगळूरला गेली होती का, या प्रश्नाचे उत्तर सध्या शोधले जात असून त्याबाबत अनेक तर्क केले जात आहेत. मृत्युपूर्वी एक महिना अगोदर निरुक्ता आपल्या कुटुंबीयांसोबत पुणे येथे गेली होती, अशी माहितीही निरीक्षक देसाई यांनी दिली.

No comments: