Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 April, 2008

भाजपचे ७ ते १३ दरम्यान आंदोलन: पर्रीकर

महागाईने लोक त्रस्त
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): राज्यातील सामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली भरडला जात आहे. याबाबतीत राज्य सरकारची भूमिका मर्यादित असली तरी जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना करणे शक्य असून विद्यमान सरकारला त्याचे गांभीर्यच नाही. म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे येत्या ७ ते १३ एप्रिल या काळात महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज पणजी येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हे आंदोलन अनोख्या पद्धतीने म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून केले जाईल, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तेल,कडधान्य,अन्नधान्य आदींच्या किमती वाढत असताना स्वयंपाक गॅसची कमतरता, केरोसीनचा काळा बाजारही सुरू आहे. या महागाईबाबत उपाययोजना काढण्याचे सोडून केवळ आपल्या अंतर्गत वादात व्यस्त असलेल्या या सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. ही भाववाढ सामान्य जनतेला असह्य बनल्याने त्याचे चटके लोकांना सहन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक हिताच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळच नाही. कचरा प्रश्नावरून सभागृह समिती स्थापण्यात आली परंतु दोन वेळा बैठक घेण्याचे सांगून ती रद्द करण्यात आल्याचे पर्रीकर म्हणाले. वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांना काहीही आर्थिक आधार नसल्याने हा अर्थसंकल्प पोकळ असल्याचे पर्रीकर म्हणाले. महागाईबाबत या अर्थसंकल्पात काहीही उपाय करण्यात आलेले नाहीत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील लोकसभा निवडणुकीत "अन्न सुरक्षा' हाच महत्त्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments: