Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 April, 2008

पाद्रीला मारहाण; केप्यात तणाव

पोलिसांचा लाठीमार, जमावाकडून दुकानांची नासधूस
कुडचडे व कुंकळ्ळी, दि. ४ (प्रतिनिधी): तिळामळ-केपे येथील "अवर लेडी मदर ऑफ पुअर' चर्चचे पाद्री फा. लुसियो डायस यांना मारहाण करण्याची घटना आज सकाळी घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी पोलिस उशिरा आल्याने दुकानांची मोठी नासधूस करण्यात आल्याचे दिसून आले.
जो डिकॉस्ता व एवंजलीस डिकॉस्ता यांनी फा. डायस यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यावर नोंदवण्यात आली आहे. हिंसक वातावरण निर्माण झाल्याने गोवा अतिजलद दलाच्या पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले. पोलिसांनी डिकॉस्ता बंधूंना रात्री अटक केल्यानंतरही पोलिस ठाण्यावर जमलेल्या जमावाने आपला मोर्चा पुन्हा डिकॉस्ता यांच्या अन्य दुकानांकडे वळवून नासधूसीचा प्रयत्न केला, पोलिसांची जीप क्रमांक जीए-०१-जी-१६४२ ची काचही जमावाने फोडल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
चर्चच्या मालकीची या भागात दुकाने असून, ती भाडेपट्टीवर देण्यात आली आहेत. या भाड्यात वाढ करण्यासाठी चर्चचे पाद्री डायस यांनी संबंधित दुकानदारांशी चर्चा केली होती. वाढीव भाड्याने पैसे भरणार नसाल तर दुकाने खाली करा, अशी तंबी यावेळी फादरनी दिली होती, असे समजते. आपण एक महिन्याची मुदत देत असल्याचे सांगून फा. डायस निघून गेले होते. पोटभाडेकरू ठेवून मूळ कंत्राटदार या दुकानाचे नाममात्र भाडे भरतो, अशी माहिती चर्चच्या सूत्रांनी दिली. काल महिन्याची मुदत संपल्याने फादर डायस आज सकाळी ९.३० वाजता तेथे आले व त्यांनी काही दुकानांना टाळे ठोकले. त्याचवेळी तेथे आलेल्या डायस बंधूनी दुकानाचे टाळे तोडले व आपल्याला दुकानात कोंडून, शटर बंद करून जबर मारहाण केली, अशी तक्रार फा. डायस यांनी नोंदविली आहे. डिकॉस्ता बंधूंनीही याबाबत तक्रार नोंदविली आहे.
फा.डायस यांना मारहाण झाल्याचे वृत्त पसरल्यावर सकाळी १०.३० च्या सुमारास जमावाने रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. कुशावती एंटरप्राईझेस या दुकानाची मोठ्या प्रमाणात हानी करण्यात आली. यात सुमारे सहा लाख रुपयांची हानी झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी छायाचित्रे काढण्यास गेलेल्या पत्रकारांनाही जमावाने मनाई केली.
मारहाण केलेल्यांना अटक केल्याशिवाय रस्ता वाहतुकीला खुला करू देणार नाही, असा पवित्रा जमावाने घेतल्याने घटनास्थळी पोलिस मोठ्या संख्येने आले. जमावाने वाहनांची मोडतोड केल्याने वातावरण तंग झाले, त्यामुळे गोवा शीघ्र कृती दलाचे पथक याठिकाणी बोलाविण्यात आले.
हिंसक जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिस उपअधीक्षक आर.के. पत्रे, निरीक्षक उमेश गावकर, हरिष मडकईकर, संतोष देसाई, व्हिल्सन डिसिल्वा, नीलेश राणे यावेळी जातीने उपस्थित होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रस्त्यावरील सर्व अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत केली.

No comments: