Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 February, 2008

"काणकोण बंद' यशस्वी
राष्ट्रीय महामार्ग अडविला आठ तास वाहतूक ठप्प लेखी आश्वासनानंतरच "बंद' मागे

गावडोंगरी, दि. १९ (वार्ताहर)- काणकोण नागरिक समितीने दिलेल्या मुदतीत गुळे ते पोळे रस्त्याच्या नूतनीकरणाला प्रारंभ न केल्यामुळे आज (दि.१९) काणकोणवासीयांनी पुकारलेले "काणकोण बंद' आंदोलन १०० टक्के यशस्वी झाले. बेमुदत पुकारलेले हे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतरच मागे घेण्यात आले. सकाळपासून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखल्याने सुमारे आठ तास वाहतूक ठप्प होती. आंदोलनादरम्यान, काही ठिकाणी रस्त्यावर झाडे टाकून जाळण्याचेही प्रकार घडले.
सकाळी ६ पासून गुळे येथील पेट्रोलपंपाजवळ सहा व चार चाकी वाहने अडवून ती पंक्चर करण्यात आली. त्याचप्रमाणे करमलघाट - गुळे येथेही वाहने अडविण्यात आली. यामुळे मडगावहून कारवारकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. सकाळी ७ च्या दरम्यान, काणकोण - चावडी येथील जुन्या बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर लाकडांना आग लावण्यात आली. यावेळी "चर्चिल मुर्दाबाद', "एक दो एक दो, दिगंबर कामत को फेक दो' अशा घोषणाही देण्यात आल्या. वीज कार्यालयासमोर पाच - सहा टिप्पर ट्रक रेती ओतून वाहतुकीत अडथळा निर्माण केला.
या आंदोलनात शांताजी गावकर, अनंत सावंत, श्याम केंकरे, श्याम देसाई, विशांत गावकर, वल्लभ पै, वल्लभ टेंगसे, नगराध्यक्ष रंगनाथ गावकर, उपनगराध्यक्ष दिवाकर पागी, गोवा कॉंग्रेस युवा उपाध्यक्ष जर्नादन भंडारी, काणकोण युवा कॉंग्रेस अध्यक्ष संजू नाईक, संदेश तेलेकर, संतोष तुबकी, बाबू प्रभुदेसाई, देवेंद्र देसाई तसेच विविध पंचायतीचे सरपंच, पंच यांच्यासमवेत सुमारे ७०० नागरिक सहभागी होते.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी गोकूळदास नाईक यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण, नागरिक त्यांचे काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते आपल्या भूमिकेशी ठाम होते. परिणामी, त्यांनी सुमारे आठ तास राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतूक रोखून धरली. नंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्री. नाईक व कार्यकारी अभियंता यांनी सदर महामार्गाच्या डांबरीकरणाबाबत दि. २२ फेब्रुवारीपर्यंत आदेश देऊन दि. २६ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे लेखी निवेदन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. त्याचप्रमाणे बाळ्ळी ते माशेपर्यंतच्या महामार्ग नूतनीकरणाची जबाबदारी मामलेदार श्री. नाईक यांनी घेतली.
नागरिकांचा पाठिंबा
काणकोण तालुक्यातील आगोंद, खोतीगाव, गावडोंगरी, पैंगीण, पोळे आदी भागांतील सर्वच नागरिकांनी या "काणकोण बंद'ला पूर्ण पाठिंबा दर्शविला. तसेच चावडी येथील दुकानदारांनीही आपापली दुकाने बंद ठेवून आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. महिलाही मोठ्याप्रमाणात आंदोलनात सहभागी होत्या.
आंदोलन योग्यच ः तवडकर
काणकोण तालुक्यातील विकासकामांबाबत अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली. पण, त्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्याचप्रमाणे यापूर्वी दोन वेळा आंदोलन करूनही काणकोणवासीयांच्या पदरी निराशाच आली. यामुळे निद्रिस्त शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे आमदार श्री. तवडकर यांनी सांगितले.
सहनशीलतेचा अंत ः खोत
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर येथील जनतेचा विश्वास होता. पण, कॉंग्रेसमधील अंतर्गत बंडखोरी सांभाळण्यात मग्न असलेल्या मुख्यमंत्र्यांना जणू त्यांनी दिलेल्या आश्वासनांची विसरच पडली. यामुळे येथील जनतेच्या सहनशीलतेचा अंत होऊनच हे आंदोलन छेडले, असे आमदार श्री. विजय पै. खोत म्हणाले.

No comments: