Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 February, 2008

कुडचिरे- वायंगिणे येथे बिबटा जेरबंद
बोंडला येथे रवानगी

डिचोेली, दि. १७ (प्रतिनिधी) - डिचोली तालुक्यात गेले काही महिने बिबट्यांचा वावर वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे ४.३० च्या सुमारास कुडचिरे वायंगिणी येथे एक बिबटा अडकला. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासांत त्याला सुरक्षितपणे बोंडला येथे गाडीतून नेला.
गेले काही महिने डिचोली तालुक्यातील कुडचिरे, मये, शिरगांव, पिळगांव, धबधबा येथे बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून प्राणिमित्र अमृतसिंग व वनखात्यातर्फे बिबट्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. बोर्डे येथे मुख्य रस्त्याच्या बाजूलाच प्रथम बिबट्या विहिरीत पडला होता त्याला अमृतसिंग आणि साथीदारांनी सुरक्षितपणे बाहेर काढून बोंडला येथे रवानगी केली होती .त्यानंतर कुडचिरे भागात बिबट्यांचे राजरोसपणे दर्शन होऊ लागले होते. कुत्रे व इतर पाळीव जनावरांवर बिबटे हल्ले करू लागल्यामुळे दहशत निर्माण झाली होती. १९ डिसेंबर या गोवा मुक्ती दिनी कुडचिरे येथेच बिबटा पिंजऱ्यात अडकला होता, तासाभरातच त्याने पिंजऱ्यातून सुटका करून घेतली होती. जाताजाता अमृतसिंग व साथीदारांना जखमीही केले होते. त्यानंतर बिबट्यांना पकडण्यासाठी व्यापक मोहीम वनखात्यातर्फे राबविण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत आज पहाटे वायंगिणी येथेच बिबटा पिंजऱ्यात अडकला. बनखात्यातर्फे लगेच त्याला ताब्यात घेण्यासाठी मोहीम सुरू झाली. बिबटा अडकला आहे ही गोष्ट गुप्त राखण्यात आली होती. नपेक्षा बघ्यांची संख्या पोलिसांच्यासुद्धा नियंत्रणाबाहेर जाऊन बिबटा अधिकच चवताळतो हा अनुभव लक्षात घेऊन वनखात्यातर्फे अत्यंत सावधपणे आज बिबट्याला ताब्यात घेतले. गोवादूत डिचोली प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली, त्यावेळी पिंजऱ्यात बिबटा शांतपणे बसला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्याची तयारी सुरू झाली त्यावेळी मात्र तो गुरगुरू लागला. बघ्यांची विशेष उपस्थिती नसल्यामुळे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेण्यात सुलभ गेले.
गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याला पकडण्यासाठी इथे खास प्रकारे बनविलेला पिंजरा लावण्यात आला होता. एका बाजूला कुत्र्याला ठेवण्यात आले होते. बिबटा आत शिरला की पिंजऱ्याचे दार बंद होत असे. पण समोर असलेला कुत्रा मात्र दुसऱ्या भागात सुरक्षित असे. वनखात्याचे कर्मचारी विष्णू गावस व महादेव माईणकर यांचा मुक्काम गेले दोन महिने इथेच होता. शेजारील च्यारी कुंटुबियांचेही मोलाचे सहकार्य या मोहिमेला लाभले होते. पूर्ण वाढ झालेला नर जातीचा हा बिबटा आज पहाटे अडकल्यानंतर रेंज फोरेस्ट ऑफिसर तुळशीदास वाडकर, राऊंड फॉरेस्ट ऑफिसर विलास गावस, प्रदीप वेरेकर, धाराजीत नाईक, साईनाथ शिरोडकर व इतरांनी बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन बोंडलाला प्रयाण केले.

No comments: