Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 22 February, 2008

हे नार्वेकर व हॉटेल उद्योजकाचे कारस्थान
ः बाबूश पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)- पोलिसांकडून आपल्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञानमंत्री दयानंद नार्वेकर, ताळगाव मतदारसंघातील एक पंचतारांकित हॉटेल उद्योजक व दोनापावला येथील नियोजित आयटी हॅबिटेट लॉबीचा थेट हात असल्याचा दावा ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
दोन दिवसांच्या अटकेत असलेल्या बाबूश यांची आज येथील सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर मोन्सेरात यांनी रात्री उशिरा ताळगाव येथील आपल्या बंगल्यावर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत या संपूर्ण षड्यंत्राचे नाट्य कथन केले. पोलिस व गुंडांचे साटेलोटे असल्याचा आरोपही बाबूश यांनी यावेळी केला. राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर पोलिस कशा पध्दतीने वागतात याचा ताजा अनुभवच आपल्याला या प्रकरणातून मिळाला, असे सांगून एक लोकप्रतिनिधी म्हणून अशी वागणूक मिळत असेल, तर मग आम आदमीचे काय होईल, असे ते म्हणाले.मुलाला न्याय मिळवून देण्याची भिष्मप्रतिज्ञा
या संपूर्ण प्रकरणाची ठराविक काळात न्यायालयीन चौकशी व्हावी व सत्य उजेडात आणावे अशी मागणी करतानाच मोन्सेरात यांनी आपल्या मुलाला विनाकारण पोलिसी खाक्या दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण न्यायालयात खेचू असा इशाराही दिला. या संपूर्ण प्रकरणी आपण न्यायासाठी लोकशाहीच्या सर्व पायऱ्या चढून न्याय हा अस्तित्वात आहे याचा अनुभव माझ्या मुलाला आणून देईन अशी भिष्मप्रतिज्ञा त्यांनी यावेळी केली. हा संपूर्ण प्रकार देवानेच घडवल्याचे सांगून सर्वसामान्य जनतेला पोलिस कसे सतावत असतील, याची जाणीव आपल्याला झाल्याचे ते म्हणाले. या घटनेमुळे आपले डोळे उघडल्याचे ते म्हणाले. यापुढे अन्यायग्रस्त लोकांसाठी आपण वावरणार असून न्यायासाठी लढणाऱ्या सर्वांना आपला जाहीर पाठींबा त्यांनी व्यक्त केला. मानवी हक्क आयोगाकडे दाद मागू गोव्यात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी व पोलिसांकडून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात व्यापक जनआंदोलन सुरू करण्याची गरज असून गोव्यात मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्याची खरोखरच वेळ आली आहे व आपण त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.अधीक्षक नीरज ठाकूर खरे सूत्रधार या संपूर्ण प्रकरणाचे खरे सूत्रधार हे पोलिस अधीक्षक निरज ठाकूर आहेत. त्यांनी स्वतः आपल्याला बेदम मारहाण करून इतर पोलिस शिपायांच्या पुढ्यात ढकलून दिले व त्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले, असेही ते म्हणाले. या घटनेनंतर लगेच माहिती तंत्रज्ञानमंत्री दयानंद नार्वेकर यांनी नीरज ठाकूर यांना शाबासकी देण्यासाठी फोन केला होता, असा गौप्यस्फोटही बाबूश यांनी केला. आज सकाळी प्रत्यक्ष नीरज ठाकूर यांनी आपल्याला ही कृती केवळ राजकीय दबावापोटी करावी लागल्याचे गुपित उघड केले. या दबावात नार्वेकर यांचा मुख्य सहभाग असल्याचेही त्यांच्या संभाषणातून उघड झाल्याचे ते म्हणाले.अधीक्षक नीरज ठाकूर, उपअधीक्षक मोहन नाईक, पणजीचे निरीक्षक सुदेश नाईक व इतर अधिकारी यांनाही न्यायालयात खेचणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या मतदारसंघातील एका युवकाचे अपहरण येथील गुंडांनी केल्याचा फोन त्याच्या कुटुंबियांकडून आला. या अपहरणात पोलिसही सामील असल्याचे आपल्याला कळताच आपण निरीक्षक सुदेश नाईक यांना फोन केला, परंतु काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिस स्थानकावर धाव घेतली. एक लोकप्रतिनिधी म्हणून पोलिस स्थानकावर आपण गेलो असता असता तिथे निरीक्षक अनुपस्थित होते व कोणीही प्रतिसाद देत नसल्याने त्यांना संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुदत दिल्याचे त्यांनी सांगितले. सदर युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण गेलो नसतो, तर कदाचित सदर युवक जिवंतही राहिला नसता, असेही ते म्हणाले.
आपल्या घराकडून संपूर्ण ताळगावात फेरी काढून हा मोर्चा पणजी पोलिस स्थानकावर नेताना तो रोखण्यासाठी काहीच हालचाली पोलिसांनी केल्या नाहीत. पोलिस स्थानकासमोर काही मोजकेच शिपाई ठेवून मोर्चेकरांच्या मागण्यांबाबतही कोणी वरिष्ठ अधिकारी बोलण्यास तयार नव्हता. रात्री साडे नऊ वाजल्यानंतर आपण पोलिस स्थानकात अटक करून घेण्यासाठी जात असताना मागून दगडांचा वर्षाव सुरू झाला. आपणालाच या दगडांपासून वाचण्यासाठी धडपड करावी लागली. आपले लोक आपल्यावर दगड मारूच शकत नाहीत, असा दावा करून पोलिसांनी काही गुंडांना पेरून हा डाव साधला व मोर्चाला हिंसक वळण मिळवून दिले असा आरोप करून त्यानंतर पुढील तमाशा झाल्याचे ते म्हणाले.
आपण या घटनेनंतर मिरामार येथील बंगल्यावर आलो. त्यावेळी आपल्या मुलाला पोलिसांनी उचलून नेल्याची खबर पत्नीने दिली व या प्रकरणी पोलिस स्थानकावर जात असल्याचे सांगितले. काही वेळानंतर आपल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्याचे कळताच आपण व महापौर टोनी रॉड्रिगीस हे तिथे पोहोचलो.
... आणि पोलिसांनी हल्ला चढवला
आम्हा दोघांनाही सुरूवातीस पोलिसांनी वाट करून देत आत नेले. यावेळी टोनी यांच्यावर कोणीतरी लाथ मारल्याने ते अत्यवस्थ बनले होते. अधीक्षक नीरज ठाकूर यांनी आपल्या माणसांनी हे काय केले ते पाहा, असा सवाल केला. यानंतर लगेच त्यांनी आपल्याला मारहाण सुरू केली. समोर उभे असलेल्या पोलिस शिपायांसमोर एखादे भक्ष्य टाकण्याच्या अविर्भावात आपल्याला त्यांच्या पुढ्यात ढकलून देण्यात आले व त्यानंतर सर्वांनी लाथाबुक्क्यांनी आपल्याला मारले, अशी माहिती त्यांनी दिली. टोनी यांच्या डोक्यावर प्रहार केल्याने त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. याची तक्रार नीरज ठाकूर यांच्याकडे करताच त्यांनी त्याच अवस्थेत त्यांना परत लाथ मारून बेशुध्द केले. बेशुध्दावस्थेतील टोनी यांच्या छाताडावर लाथ मारण्याचे क्रौर्य नीरज ठाकूर यांनी केल्याचे बाबूश यांनी स्पष्ट केले.
नीरज ठाकूर यांनी आपल्याला गोमेकॉत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला, परंतु पोलिसांना घाबरून इस्पितळात झोपण्याचे सोंग घेणाऱ्या राजकारण्यांपैकी आपण नाही, असे ठणकावून सांगत आपण कोठडीत राहणेच पसंत केले असे शेवटी बाबूश म्हणाले.
अन्यायाविरोधातील लोकांबरोबर राहू
या संपूर्ण प्रकरणातून खरोखर सामान्य जनता काय सहन करीत असेल याची प्रचीती आपल्याला झाली व त्यासाठी यापुढे अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आघाडी घेणार असल्याचे बाबूश म्हणाले. या संपूर्ण प्रकरणावर सरकार नक्की काय भूमिका घेते हेच आपल्याला पाहायचे आहे, असे सांगून त्यांनी आता पुढील कारवाईचा चेंडू दिगंबर कामत यांच्या कोर्टात फेकला आहे.

No comments: