Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 February, 2008

"आयपीएल'च्या बाजारात खेळाडूंचा विक्रमी भाव
धोनीची ६ कोटी तर सायमंड्सची ५.४ कोटी किंमत
सर्वांत स्वस्त खेळाडू कामरान

सचिन, सौरव, द्रविड, सेहवाग अन् युवराज "आयकॉन्स', त्यांची बोलीच नाही. एकूण ४०० कोटींची बोली. शाहरूखकडून शोएब अख्तर, रिकी पॉंटिंगची खरेदी, मुकेश अंबानीच्या मुंबई संघात सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग तर प्रीती झिंटाच्या मोहाली संघात युवराज, ब्रेट लीचा समावेश
मुंबई, दि. २० ः क्रिकेटपटूंसाठी कुबेराचा खजिनाच ठरावा अशा व्यावसायिक इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) बाजारात ७७ क्रिकेटपटूंची बुधवारी खरेदी झाली. "स्टार' खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रेंचायझींनी अक्षरश: पैशाच्या राशी ओतल्या. त्यामुळेच "आयपीएलच्या' रुपात भारतीय क्रिकेटमध्ये नव्या इतिहासाची नोंद झाली.
याद्वारे जागतिक क्रिकेटमध्येही एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली असे म्हणता येईल. देशातील क्रिकेटच्या "यंग ब्रिगेड'साठी हे सर्वाधिक कमाईचे माध्यम तर आहेच. शिवाय याद्वारे त्यांना आपले कसब व सामर्थ्यही दाखविता येईल. या बोलीत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सर्वाधिक ६ कोटी तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू सायमंड्सला ५.४ कोटी किंमत मिळाली. धोनीला चेन्नई संघाने तर सायमंड्ला हैदराबादने खरेदी केले. शाहरूख खानच्या कोलकाता संघासहच चेन्नई व हैदराबाद संघही चांगलेच मजबूत वाटत आहेत. मात्र खेळाडूंची खरेदी बघता जयपूर संघ सर्वात कमकुवत वाटतोय. सर्वात स्वस्त खेळाडू पाकिस्तानचा कामरान अकमल ठरला. त्याला केवळ ६० लाख किंमत मिळाली. तो जयपूर संघाकडून खेळेल. सर्व खेळाडूंना "अ' ते "ह' श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. आयपीएलच्या प्रत्येक फ्रेंचायझीला त्याच्या संघात कमीत कमी १६ खेळाडू ठेवावे लागतील. त्यात चार खेळाडूंचे वय २२ वर्षांपेक्षा कमी आणि ४ खेळाडू स्थानिक असतील.
आयपीएलच्या मैदानात फ्रेंचायझीच्या रुपात मैदानात उतरलेले अनेक उद्योगपती आणि बॉलिवुड कलावंतांनी आपापल्या संघात स्टार खेळाडूंना घेण्यासाठी एकापेक्षा एक अधिक रकमेच्या बोली लावल्या. भारतीय व ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची खरेदी करण्यासाठी सर्वाधिक चढाओढ दिसली. आयपीएल ट्वेंटी-२० स्पर्धेत भाग घेणाऱ्या आठ संघांचे हे फ्रेंचायझी सात अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक रक्कम खर्च करणार आहेत. यावर्षी १८ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणाऱ्या आयपीएल ट्वेंटी-२० स्पर्धेत मुंबई, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगलोर, मोहाली आणि जयपूर हे संघ भाग घेणार आहेत.
आयपीएलकडे भारतीय क्रिकेटमधील एक नवा अवतार म्हणून बघितले जात असून यामुळे देशातील तरुण क्रिकेटपर्टूना त्यांची प्रतिभा व सामर्थ्य दाखविण्याची संधी मिळाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बीसीसीआयच्या समर्थित या लीगच्या उद्घाटनिय स्पर्धेत ४४ दिवसांत ५९ लढती खेळल्या जातील. विजेत्या संघाला ३० लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार प्रदान केला जाईल. ही रक्कम गतवर्षी दक्षिण आफिकेट झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाला मिळालेल्या पुरस्कारापेक्षा ११ लाख डॉलर्सने अधिक आहे.
खेळाडूंचे संघ व किंमत
जयपूर संघ :- शेन वॉर्न (१.८ कोटी), युनुस खान (९० लाख), ग्रेमी स्मिथ (१.९ कोटी), कामरान अकमल (६० लाख), युसुफ पठाण (१.९ कोटी), मोहंम्मद कैफ (६.७५ लाख डॉलर्स), मुनफ पटेल.
मुंबई संघ :- सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग (३.४ कोटी), सनथ जयसूर्या (३.९ कोटी), शॉन पोलॉक (२.२ कोटी), रॉबिन उथप्पा (८ लाख डॉलर्स).
कोलकाता संघ :- सौरव गांगुली, शोएब अख्तर (१.७ कोटी), रिकी पॉंटिंग (१.६ कोटी), ब्रॅंडन मॅककुलम (२.८ कोटी), ख्रिस गेल (३.२ कोटी), अजीत आगरकर (१.४ कोटी).
बंगलोर संघ :- राहुल द्रविड, अनिल कुंबळे (२ कोटी), झहीर खान (१.८ कोटी), जॅक्स कॅलिस (३.६ कोटी), मार्ग बाउचर (१.८ कोटी), कॅमरून व्हाईट (२ कोटी), वसीम जाफर ().
चेन्नई संघ :- महेंद्रसिंग धोनी (६ कोटी), मॅथ्यू हेडन (१.५ कोटी), जेकब ओरम (२.७ कोटी), मुथैया मुरलीधरन (२.५ कोटी), स्टीफन फ्लेमिंग (१.४ कोटी), पार्थिव पटेल (१.३ कोटी), जोगिंदर शर्मा (१ कोटी), अँड्र्यू मोर्केल (२.७ कोटी), सुरेश रैना (६.५ लाख डॉलर्स), मखाया नतिनी.
दिल्ली संघ :- वीरेंद्र सेहवाग, डॅनियल व्हेट्टोरी (२.५ कोटी), शोएब मलिक (२ कोटी), मोहम्मद आसिफ (२.६ कोटी), डिव्हीलियर्स (१.२ कोटी), दिनेश कार्तिक (२.१ कोटी), फरवेझ महारूफ (९० लाख), तिलकरत्ने दिलशान (१ कोटी), गौतम गंभीर (७.२५ लाख डॉलर्स), मनोज तिवारी (६.७५ लाख डॉलर्स).
मोहाली संघ :- युवराज सिंग, ब्रेट ली (३.६ कोटी), महेला जयवर्धने (१.९ कोटी), कुमार संगकारा (२.८ कोटी), एस.श्रीसंत (२.५ कोटी), इरफान पठाण (३.९ कोटी), रोमेश पोवार, पीयुष चावला.
हैदराबाद संघ :- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (३.७५ लाख डॉलर्स), ऍण्ड्र्यू सायमंड्स (५.४ कोटी), ऍडम गिलख्रिस्ट (२.८ कोटी), हर्शेल गिब्स (२.३ कोटी), शाहिद आफिदी (२.७ कोटी), स्कॉट स्टायरिस (७० लाख), रोहित शर्मा (७.५ लाख डॉलर्स), चमारा सिल्व्हा (१ लाख डॉलर्स).
राखीव खेळाडू :- मायकेल हसी, तातेंदा तैबू, ग्लेन मॅकग्रा, मोहम्मद युसुफ, चंदरपॉल, रामनरेश सरवन, जस्टीन लॅंगर.
"आयकॉन्स'ची बोलीच लागली नाही
आयपीएलने मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर, बंगाल "टायगर' सौरव गांगुली, धडाकेबाज फलंदाज युवराजसिंग, धावांचा पाऊस पाडणारा युवराजसिंग आणि नजफगडचा नवाब वीरेंद्र सेहवाग यांची "आयकॉन' खेळाडूंच्या रुपात निवड केली आहे. याच कारणास्तव या खेळाडूंची बोलीच लावण्यात आली नाही. मात्र संघातील ज्या खेळाडूची सर्वाधिक बोली लागेल त्याच्यापेक्षा १५ टक्के अधिक रक्कम यांना दिली जाईल. त्यामुळेच या पाचही क्रिकेटपटूंची सर्वाधिक चांदी राहणार आहे. तेंडुलकर मुंबई, गांगुली कोलकाता, राहुल द्रविड बंगलोर, युवराज सिंग मोहाली आणि सेहवाग दिल्ली संघाचे नेतृत्त्व करणार आहे.
"किंग खान'कडून "रावळपिंडी एक्स्प्रेस'ची खरेदी
कोलकाता संघाचा मालकी हक्क मिळविणारा बॉलिवुड स्टार "किंग खान' शाहरूखने "रावळपिंडी एक्स्प्रेस' नावाने प्रसिद्ध क्रिकेट विश्वातील सर्वात वेगवान गोलंदाज पाकिस्तानच्या शोएब अख्तरची १.७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. तसाही शोएब हा शाहरूख खानचा आवडता खेळाडू आहे. तो आपल्या संघात असावा म्हणून बॉलिवुड कलावंताने त्याच्यावर मोठया रकमेची बोली लावली व त्याला खरेदीही केले. मुकेश अंबानीच्या मुबंई संघात सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग तर प्रिती झिंटाच्या मोहाली संघात युवराज, ब्रेट लीचा समावेश झाला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना जोरदार मागणी
मैदानावरील वाईट वर्तणूक खेळ भावनेचा अभाव असल्यामुळे वादग्रस्त ठरले असले तरी आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणावर मागणी राहिली. सिडनी कसोटीत वादाचे केंद्रस्थान असलेला ऍण्ड्र्यू सायमंड्स किंमतीच्या बाबतीत भारताचा कर्णधार धोनीनंतर आयपीएलमध्ये दुसरा ठरला. हैदराबाद संघाने त्याला ५.४ कोटी रुपयांत खरेदी केले. शेन वॉर्न, पॉंटिंग, ब्रेट ली आणि ऍडम गिलख्रिस्ट यांनाही चांगली मागणी राहिली.

No comments: