Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 February, 2008

संजय दत्त - मान्यता विवाह कागदपत्रे कायदा खात्याकडे
मडगाव,दि. १६ (प्रतिनिधी)- दैनिक गोवादूतने सर्वांत प्रथम उघडकीस आणलेल्या संजय दत्त विवाह नोंदणी गैरप्रकारातील सर्व कागदपत्रे मुख्य जन्म मृत्यू व विवाह नोंदणी निबंधक पंढरीनाथ बोडके यांनी ताब्यात घेऊन ती व त्यावरील आपला अहवाल कायदा खात्याकडे पाठविली आहेत. विवाह नोंदणी कार्यालय कायदा खात्याच्या अखत्यारीत येत असते. त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा अंकुश नसतो. त्यामुळे पुढील सर्व चौकशी कायदा खात्याने करावी यासाठी सर्व कागदपत्र कायदा सचिवांकडे पाठवण्यात आली आहेत.
या बनावट रहिवासी दाखल्यासंबंधी दोन ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे. "गोवादूत'ने हे प्रकरण सर्वप्रथम अस्सल कागदपत्रांच्या छायाप्रतींसह उजेडात आणताच, जिल्हाधिकाऱ्यांनी मामलेदारांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. मामलेदार परेश फळदेसाई यांनी तलाठी प्रशांत कुंकळ्येकर याला मेमो दिला असता त्यांनी तो स्वीकारला नाही. उलट उद्दामपणाची उत्तरे दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा उपमर्द केला व शिस्तीचे पालन केले नाही. त्यामुळे अहवाल तयार करून मामलेदारांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करून हे प्रकरण गंभीर असून शिस्तभंगाच्या नियमाखाली तलाठ्याची कृती निलंबन करण्यासारखी आहे असा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. व तात्काळ तलाठ्याला निलंबित करून पुढील कारवाई सुरू केलेली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हे सर्व कागदपत्र घेऊन विवाह नोंदणी करण्यासाठी मडगाव येथील उपनिबंधकाच्या कार्यालयात कदम नामक व्यक्ती गेली होती. येथील एका संबंधित कर्मचाऱ्याला हाताशी धरून ते कागदपत्र बाणावली येथील तारांकित हॉटेलात नेण्यात आले. तेथे संजय दत्त व मान्यता ऊर्फ दिलनशील शेख यांनी त्या कागदपत्रांवर सही केली व ते कागदपत्र पुन्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात आणून दिले असे आढळून आले आहे. विवाहाची नोंदणी करणाऱ्या वधूवरांनी उपनिबंधक कार्यालयात येऊन सही करण्याचा नियम असताना हे कागदपत्र हॉटेलात कसे गेले, कदम याच्याबरोबर कोण कर्मचारी गेले होते, तसेच नोंदणीविषयक कागदपत्र असे बाहेर नेता येतात काय, याची चौकशी व्हावी अशी मागणी उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी पंढरीनाथ बोडके यांच्याकडे केली गेली आहे. संजय दत्त, दिलनशील शेख यांचा संबंध गोव्यातील शिवानंद कदम व त्यांच्या कुटुंबियांशी कसा आला याची चौकशी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी करावी अशी मागणी होत आहे. शिवानंद कदम हे काणकोण तालुक्यात महत्त्वाच्या पदावर होते. तेथे मान्यता हिच्या नावावर भूखंड असल्याची माहिती "गोवादूत'ला मिळाली असून त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे.
बनावट रहिवासी दाखल्यासंबंधी तलाठ्याची कृती ही बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यास त्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवण्यात येईल. त्याशिवाय संजय दत्त याचे घोगळ येथील फेलिसियान अर्पाटमेंटमध्ये वास्तव्य असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे सिद्ध झाल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करता येते असे मडगाव येथील वकिलांनी सांगितले. त्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनीही खोट्या प्रतिज्ञापत्राबद्दल चौकशी करता येते असे सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष या गैरव्यवहार प्रकरणाकडे लागले असून
मुंबई ते दिल्लीपासून अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांनी गोव्यात येऊन त्याची माहिती मिळवण्यासाठी ठाण मांडलेले आहे. काल व आज अनेक पत्रकारांनी जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांची भेट घेऊन बनावट दाखल्यासंबंधी माहिती मिळविली.

No comments: