Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 19 February, 2008

... तर आंदोलकांना आत टाकू!पणजी, दि. १८ (प्रतिनिधी)-काणकोण तालुक्यातील गुळे ते पर्तगाळ व पर्तगाळ ते माशे या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे २० किलोमीटरच्या रस्त्याचे काम येत्या चार दिवसांत सुरू करू, असे आश्वासन सा. बां. खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिले.
केवळ काही तांत्रिक कारणांमुळे दीड महिन्याअगोदर निविदा काढूनही हे काम रेंगाळल्याचा खुलासा त्यांनी यावेळी दिला. या प्रकरणी विनाकारण राजकारण करून काणकोण बंद करू पाहणाऱ्यांना तात्काळ आत टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पोलिसांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
गेल्या सरकारकडे राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यासाठी निधी नव्हता. आपण दिल्लीत प्रयत्न करून सुमारे १४ कोटी रुपये निधी मिळवला असून त्याअंतर्गत ही महत्त्वाची कामे मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. काणकोणच्या या रस्त्याचे काम अडकून पडण्यास बांधकाम सल्लागार समिती जबाबदार असल्याची माहिती त्यांनी दिली. या रस्त्याच्या कामांच्या निविदा वाढीव रकमेत सादर झाल्याने त्याबाबतचा निर्णय बांधकाम सल्लागार समितीने घ्यायचा असतो. मुख्य सचिव जे. पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील या समितीवर वित्त सचिव, सा. बां. खा. सचिव व प्रमुख अभियंते सदस्य आहेत. हे अधिकारी सेवेनिमित्त बाहेर गावी असल्याने त्यांची बैठक होऊ शकली नाही. आज याबाबतचा निर्णय घेऊन येत्या चार दिवसांत कामाचे आदेश दिले जातील, असेही श्री.आलेमाव म्हणाले.

No comments: