Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 28 January, 2010

कौशल्याचा अंतर्भाव, विस्तार व उत्कृष्टता हीच देशाची ताकद

पद्मविभूषण डॉ. माशेलकर यांचा त्रिसूत्री मंत्र

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- काही काळापूर्वी भारत महाशक्ती बनण्यासाठी "आयटी'चा अर्थात माहिती तंत्रज्ञानाच्या मंत्राचा उद्घोष झाला होता. आता मात्र याच "आयटी' मंत्राचे रूपांतर भारतीय कौशल्य (इंडियन टेलंट्स) मध्ये करायला हवे. या भारतीय कौशल्याचे देशाच्या महाशक्तीत परिवर्तन करण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम युद्धपातळीवर राबवण्याची नितांत गरज आहे. "विस्तार, अंतर्भाव व उत्कृष्टता' हा मंत्रच देशाला एका नव्या उच्चांकावर पोहचवू शकतो, असे प्रतिपादन गोमंतकीय सुपुत्र तथा प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
गोवा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी व्याख्यानमालेनिमित्त राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या परिषदगृहात ते "भारतीय कौशल्याच्या आधारे भारतीय भवितव्याचा आकार' या विषयावर बोलत होते. ते पुढे म्हणाले की एकविसाव्या शतकाच्या अनुषंगाने भारत व चीन या देशांवर संपूर्ण जगाची नजर लागून आहे. चीनच्या तुलनेत आपण अजूनही मागे आहोत. गेल्या तीस वर्षांत आपल्या देशात आमूलाग्र बदल घडले. काही काळापूर्वी गॅस सिलिंडरसाठी रांगा लागायच्या, दूरध्वनीसाठी महिनोमहिने प्रतीक्षा यादीत थांबावे लागे, वाहन खरेदीला तर वर्षे लागायची पण आता परिस्थितीत कायापालट झाला आहे. पुढील तीस वर्षांत नेमका काय बदल होईल हे सांगता येणार नाही. देशाला महाशक्ती बनवण्यासाठी आपण या देशाच्या लोकसंख्येचा पुरेपूर लाभ उठवायचा आहे व देशातील लोकांच्या कौशल्याला फुंकर देऊन प्रगतीचे पर्वत पादाक्रांत करायचे आहेत,असे डॉ.माशेलकर म्हणाले.
आपला देश मोठा आहे, असे म्हणून क्षेत्रफळाच्या आकारात लहान असलेल्या विकसीत देशांशी तुलना करून आपले अपयश लपवण्यापेक्षा अधिक आक्रमकपणे लक्ष्याच्या दिशेने गरुडभरारी घेणेच योग्य ठरेल व त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती हवी. देशात कौशल्याची कमी नाही पण या कौशल्याला संधी प्राप्त झाली पाहिजे. कित्येक भारतीय आज विदेशांत उच्चपदांवर आहेत ते का, याचा विचार केला तर भारत हा प्रज्ञासंपन्न देश आहे पण प्रज्ञेला संधी नाही. अमेरिकेसारख्या देशांत असंख्य संधी आहेत. भारतातही इथल्या कौशल्याला कशा संधी मिळतील याकडे लक्ष केंद्रित करायला हवे. भारतात नॅनोसारख्या कारची निर्मिती करण्यात आली व ही निर्मिती करणारा गिरीष वाघ हा कुणी मोठा अभियंताही नाही.याचा अर्थ इथे कौशल्याला कमी नाही. केवळ या कौशल्याचा योग्य प्रशिक्षण व संधी मिळायला हवी व त्याचा योग्य पद्धतीने वापर व्हायला हवा,असेही डॉ.माशेलकर म्हणाले.भारताच्या एकूण लोकसंख्येतील ५५ टक्के भाग हा ऐन पंचविशीतील आहे, त्यामुळे येत्या काळात सर्वांत युवा देश म्हणून आपण जगासमोर जाणार आहोत. पण केवळ १७ टक्के युवक हे उच्चशिक्षणापर्यंत जातात ही सत्य परिस्थिती आहे व ती बदलणे क्रमप्राप्त आहे.१.१ दशलक्षांचा आकडा पार केलेल्या या देशात हाताच्या बोटांवर मोजण्यापर्यंतच उच्चशिक्षण संस्था असणे ही गंभीर बाब आहे. शिक्षणाचा विस्तार, प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती व प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचे लक्ष्य या मंत्राची जोपासना करून देशाला प्रगतिपथाच्या उत्तुंग टोकावर नेणे शक्य आहे,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.देशात सुमारे एक हजार विद्यापीठे,दहा हजार महाविद्यालये व दहा हजार समाज विद्यालये स्थापण्याची गरज आहे. केंद्र सरकारने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत ही चांगली गोष्ट असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. माहिती तंत्रज्ञानाचा जयघोष कितीही केला तरी प्रत्यक्षात या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणाऱ्याची संख्या अत्यल्प आहे याचा गंभीरतेने विचार व्हायला हवा.रॉयल अकादमी व इंजिनिअरिंग सोसायटी या ब्रिटनस्थीत संस्थेकडे केवळ तीनच भारतीय वैज्ञानिक संशोधकांचा समावेश का, ही संख्या वाढली पाहिजे व त्यासाठी शिक्षणाचा झपाट्याने प्रसार होऊन भारतीय कौशल्याचा विकास होणे हेच खरे आव्हान देशासमोर आहे,असे डॉ.माशेलकर म्हणाले.
व्याख्यानमालेचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ.दिलीप देवबागकर यांनी केले.याप्रसंगी मुख्यमंत्री दिगंबर कामत,सभापती प्रतापसिंग राणे,राज्य कायदा आयुक्त ऍड.रमाकांत खलप, तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी,प्राचार्य व शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

No comments: