Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 12 June, 2009

ते दोघे रुग्ण 'स्वाईन फ्लू'चे?

आज चाचणी अहवाल
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : गोव्यात वराह ज्वर (स्वाईन फ्ल्यू)चे दोन रुग्ण आढळून आल्याच्या वृत्ताने संपूर्ण गोव्यात खळबळ माजली आहे. मात्र, या दोघांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे अद्याप सिद्ध झालेले नसून ते संशयित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या संचालिका राजनंदा देसाई यांनी दिली. यात उत्तर गोव्यातील ३५ वर्षीय महिलेचा तर, दक्षिण गोव्यातील ४१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पहिल्या चाचणीत त्यांना वराह ज्वराची लागण झाल्याचे आढळल्याने ताबडतोब त्यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय विरोलॉजी संस्थेमधे पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल उद्यापर्यंत मिळणार आहे. या चाचणीत त्यांना या ज्वराची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यास योग्य उपचार सुरू केले जाणार असल्याची माहिती डॉ. देसाई यांनी दिली.
आज दुपारी गोव्यात वराह ज्वराचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती उघड होता एकच खळबळ माजली. राष्ट्रीय तसेच स्थानिक पत्रकारांनी आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता या माहितीला दुजोरा देण्यास नकार देण्यात आला. शेवटी थेट आरोग्य संचालकांच्या कार्यालयात धडक दिल्यानंतर दोन संशयित रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. दि. ४ जून रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. ही व्यक्ती मूळ गोमंतकीय असून लंडन येथून मुंबईत आणि त्यानंतर गोव्यात दाखल झाली होती. यावेळी दाबोळी विमानतळावर त्याची तपासणी करण्यात आली असता, त्याच्यात स्वाईन फ्ल्युची लक्षणे आढळून आल्याने चिखली वास्को येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शारजा येथून गोव्यात परतलेल्या एका महिलेलाही या रोगाची लक्षणे आढळल्याने तिलाही निरीक्षणाखाली इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या रोगाची अजून फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असून या दोघाही रुग्णांना स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली. दि. ४ रोजी आढळून आलेल्या या रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. यावेळी ""इन्फ्ल्युएनझा (अ)'' चे घटक सापडल्याने त्याची खात्री करण्यासाठी पुढच्या चाचणीसाठी रक्ताचे नमुने ताबडतोब दिल्ली येथे पाठवण्यात आले आहे.
"स्वाईन फ्ल्यु'ला सामोरे जाण्यास आरोग्य खाते समर्थ असल्याचा दावा करून या रोगावर रामबाण ठरणारी दोन हजार ""ऑसेलताम्वीर'' कॅप्स्यूल उपलब्ध असल्याची माहिती यावेळी डॉ. देसाई यांनी दिली. त्याप्रमाणे अशा रुग्णांना उपचार करण्यासाठी चिखली येथील कॉटेज इस्पितळात खास व्यवस्था करण्यात आली असून याठिकाणी स्वतंत्रपणे रुग्णांना ठेवण्यासाठी पाच खोल्या असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
या रोगाच्या संदर्भात आज दोबोळी विमानतळावर २१९ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ६ हजार ६७५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संस्थेने हा विषाणू अत्यंत धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यत ७३ देशांत स्वाईन फ्ल्युने धडक दिली असून २६ हजार ५६३ लोकांनी त्याची लागण झाली आहे. तर, १४० जणं या रोगाचे बळी पडले आहेत.

No comments: