Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 June, 2009

मान्सूनचे दणदणीत आगमन

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित

रस्ते पाण्याखाली, झाडे कोसळली
फोंडा - कुडचडे मार्ग पाच तास बंद
दिवसभरात दीड इंच पाऊस कोसळला


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून त्यामुळे सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. काल रात्रीपासून आरंभ झालेल्या पावसाने आज अचानक जोर धरला, त्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पडझड होऊन वित्तहानीची नोंद झाली आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली. पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात दीडइंच पावसाची नोंद झाली; यंदा आतापर्यंत ४ इंच पाऊस झाला. जनजीवन विस्कळित होऊन काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. तसेच झाडे पडल्याने फोंडा-कुडचडे मार्गावरील वाहतूक सुमारे पाच तास ठप्प झाली. दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे करंझाळे येथे दोन बार्जेस भरकटून त्या किनाऱ्याला लागल्या.
दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे राजधानी पणजीत सर्वत्र पाणी तुडुंब भरले. महापालिकेकडून केला जाणारा मान्सूनपूर्व कामांचा बेबनाव आज खुद्द पावसानेच उघडा पाडला. विविध ठिकाणी गटारातील दगड व कचरा रस्त्यावर पसरल्याने दुचाकी वाहन चालकांची बरीच पंचाईत झाली. कला अकादमी ते मिरामारपर्यंतचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली आल्याने या रस्त्यावरून दुचाकी चालकांना वाहन हाकणेच कठीण बनले होते. पणजी येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयाचे फोन आज दिवसभरात खणाणत होते. संपूर्ण राज्यभरात या मान्सूनपूर्व पावसामुळे बारीक सारीक घटना घडल्याची माहिती देण्यात आली. चिंबल गवळीवाडा येथे व्ही. के. बार या आस्थापनावर झाड कोसळल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. राज्यात सर्व ठिकाणी हा पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: