Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 June, 2009

कॉंग्रेस पक्षाला कुबड्यांचे वावडे!

स्वबळावर सरकार स्थापनेचे वेध

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- घटक पक्षांच्या कुबड्यांचा आधार घेऊन कायम सरकार चालवण्याचा विचार आता सोडायला हवा. कॉंग्रेस पक्षाने आता स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने विचार करायला हवा व त्यासाठी कोणतेही कठोर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अजिबात डगमगून जाऊ नये,असा सूर आज गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत बहुतेक वक्त्यांनी आळवला.
दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, उपसभापती मावीन गुदीन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, गृहमंत्री रवी नाईक, नगर विकासमंत्री ज्योकीम आलेमाव, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो, आमदार श्याम सातार्डेकर,आमदार प्रताप गांवस,फ्रान्सिस सिल्वेरा व अन्य पदाधिकारी हजर होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज केली. निवडणूक काळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास आपले सरकार कटिबद्ध आहे,असे सांगून पुढील तीन वर्षांच्या कालखंडात सर्व सामान्य जनतेसाठी विविध योजना राबवण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की जाहीरनाम्याची पूर्तता करणे ही सरकारची जबाबदारी आहे.आपल्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात येणाऱ्या या समितीवर प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, तसेच जाहीरनामा समितीचे अध्यक्ष ऍड.उदय भेंब्रे व ऍड.रमाकांत खलप यांचा समावेश असेल,असेही ते म्हणाले.माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ राज्यातील प्रत्येक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालांत व बारावी परीक्षेत अव्वल आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा प्रदेश कॉंग्रेस समितीने पुढे केलेला प्रस्ताव नक्कीच विचारात घेतला जाईल,असे आश्वासनही त्यांनी दिले.सरकारवर झालेली टीका आपण नेहमीच सकारात्मक दृष्टीने घेतली व स्वाभिमान आडवा येऊ न देता जनतेच्या इच्छेनुसार निर्णय बदलले,असेही मुख्यमंत्री म्हणाले.आघाडी सरकारचा कारभार चालवताना सर्वांना बरोबर घेऊन जाणे ही किती कठीण गोष्ट आहे हे आपल्यालाच ठाऊक आहे,याची आठवणही त्यांनी यावेळी केली.
गृहमंत्री रवी नाईक यांनी गेल्या दोन वर्षांत सरकारने राबवलेल्या अनेक योजनांची माहिती करून दिली. विशेष करून त्यांच्याकडे असलेल्या महिला व बालकल्याण खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची जंत्रीच त्यांनी सादर केली.महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी योजना आहेत व त्यांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे यावे,असे आवाहनही त्यांनी केले.उपसभापती मावीन गुदीन्हो यांनी यावेळी आक्रमक भाषणे केले. आघाडीच्या इतर घटकांच्या धमक्यांना मुख्यमंत्र्यांनी बळी पडू नये,असे सांगितले. सरकार चालवताना कॉंग्रेस पक्ष बळकट कसा होणार याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कॉंग्रेसचा हा वृक्ष जर अधिक जोमाने वाढवायचा असेल तर त्याला अडथळा ठरणाऱ्या फांद्या कापून टाकण्यास अजिबात चिंता करू नये, असेही ते म्हणाले.मंत्रिमंडळातील सदस्यांकडून उघडपणे केल्या जाणाऱ्या वक्तव्यांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली व मुख्यमंत्र्यांनी बेशिस्त खपवून घेऊ नये,असे आवाहन केले.चर्चिल आलेमाव यांनी या सरकारला पाच वर्षे अजिबात भिती नसल्याचे सांगितले.सहापदरी महामार्गाबाबत आपण केलेले वक्तव्य हे लोकांच्या भल्यासाठी असल्याचे ते म्हणाले.सुमारे आठशे कुटुंबीयांना हाकलून सरकारला हा प्रकल्प राबवायचा असेल तर अवश्य राबवा असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी "जय हो' चा नारा लक्षात ठेवा,असे सांगितले. कॉंग्रेसची संघटना बळकट करण्याचे आपले उद्दिष्ट असून येत्या पंधरा दिवसांत दक्षिण गोव्याचा दौरा काणकोण व सांगे भागातून सुरू करणार असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मंत्री व आमदारांचा प्रदेश समितीतर्फे गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलनाने झाले.यावेळी प्रदेशाध्यक्ष शिरोडकर यांनी पुष्पहार घालून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. युवा कॉंग्रेस व महिला कॉंग्रेसच्या वतीनेही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष एम.के.शेख यांनी केले.

-आमदार दयानंद नार्वेकर,चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर,पांडुरंग मडकईकर,पंचायतमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर,आग्नेल फर्नांडिस,फिलीप नेरी रॉड्रिगीस,व्हिक्टोरिया फर्नांडिस,वीजमंत्री आलेक्स सिकेरा आदी गैरहजर होते.

-गोमंतक मराठा समाज सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला खरा परंतु त्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था कमी पडल्याने अनेकांना उभे राहावे लागले.

-गृहमंत्री रवी नाईक यांनी आपले भाषण बरेच लांबवले. गृह खात्यापेक्षा त्यांनी महिला व बाल कल्याण खात्यावर आज जास्त भर दिला व महिलांसाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची यादीच त्यांनी जाहीर केली. लिज्जत पापडांप्रमाणे महिलांनी गोवा पापड तयार करावेत,खतखतें,सर्पतेल आदी खास गोमंतकीय खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची योजना आहे,त्याचाही लाभ महिलांनी घ्यावा,असेही ते म्हणाले. महिलांसाठीच्या योजना जाहीर करण्यात ते इतके रमबाण झाले की त्यांना आवरावे लागले.भाषण कमी करण्याची विनंती केल्याने ते भडकले व त्यांनी अखेर आपले भाषण आवरते घेतले.

No comments: