Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 10 June, 2009

पूजाला ताब्यात घेण्यास टाळाटाळ का?


भांडाफोड होणार असल्याने अभय!


पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक यांनी खून करून सोळा तरुणींकडून लुटलेले सोने दहा लाखांचे होते का,.एवढ्या किमतीचे सोने त्यांच्याजवळ नसेलच मग ते सोने नेमके कुठून महानंदकडे आले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत, हे सोने विक्री करण्यासाठी महानंद याच्याबरोबर त्याची पत्नी पूजा नाईकही येत होती, मग पोलिस तिला का संरक्षण देत आहेत, असा खडा सवाल समाजकार्यकर्त्या तारा केरकर यांनी केला आहे. पूजाला ताब्यात घेतल्यास काही राजकीय नेते तसेच सरकारी अधिकाऱ्यांचा भांडाफोड होणार असल्याने पोलिस तिला चौकशीला बोलावत नसल्याची माहिती दै."गोवादूत'ला मिळाली आहे.
गेली पंधरा वर्षे महानंद याच्याकडून लुटलेले सोने विकत घेणारे सोनार महानंदएवढेच जबाबदार असून महानंदने फोंड्यातील अन्य सोनारांनाही सोने विकले आहे. याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असूनही पोलिस त्या सोनारांची चौकशी का करीत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. चोरीचे सोने विकत घेणे हा गंभीर गुन्हा असून या सोनारांवर कारवाई न झाल्यास उद्या समाजातील अशा क्रूर महानंदकडून हे सोनार चोरीचे सोने घेत राहतील आणि लुटारू सामान्यांना लुटत राहतील, असे मत श्रीमती. केरकर यांनी व्यक्त केले.
ज्या तरुणी महानंदाच्या बळी ठरल्या आहेत, त्यांच्या अंगांवर एक सोनसाखळी, हातात दोन बांगड्या, अंगठी असाच ऐवज होता. याची किंमत दहा लाख होणे मुश्कील आहे. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेले दहा लाखांचे सोने महानंदने कोणाचे चोरले होते, याचाही उलगडा होणे गरजेचे आहे. मोर्ले सत्तरी येथे योगीताचा खून केल्यानंतर तिच्या अंगावरील सोने डिचोली येथील एका सोनाराला विकले होते. त्याप्रमाणे महानंदने गोव्यातील अन्य सोनारांकडेही सोने विक्री केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी "शॉटकर्ट' पद्धत न अवलंबता अशा सर्व सोनारांचा तपास लावावा, अशी मागणी केरकर यांनी केली आहे.
महानंदची साथीदार ,त्याची पत्नी पूजाही तेवढीच जबाबदार आहे. लुटलेले सोने विकायला पूजाही त्याच्याबरोबर येत होती. त्यामुळे महानंद हे सोने कुठून आणत होता याची पूर्ण कल्पना पूजाला होती. गरीब सामान्य तरुणींना लक्ष करून त्यानंतर त्यांचा खून करून सोने लुटणे हा या पतीपत्नीचा धंदाच झाला होता, अशी टीका यावेळी केरकर यांनी गोवादूतशी बोलताना केली.
पूजा हिला या प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न चालले आहेत. पूजा नाईक हिचे राजकीय बळ बरेच असल्याची माहिती मिळाली असून तिला संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातूनही प्रयत्न होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजकीय लोकांचे पाठबळ पूजाला का लाभले, याचा शोध लावून या राजकीय व्यक्तींचा भांडाफोड करून अशा राजकारण्यांना जनतेसमोर उभे करावे, अशी मागणी पणजीतील कलाकार व जागृत महिला उज्ज्वला तारकर यांनी केली आहे. महानंदला वाचवण्यासाठी ज्या ज्या राजकीय व्यक्तींनी प्रयत्न केले आहेत, अशा सर्वांना ठेचायलाच पाहिजे, असेही मत सौ. तारकर यांनी व्यक्त केले आहे.

No comments: