Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 June, 2009

महिलेने बिबट्याला घरात कोंडले!

एकाकी झुंज देत दाखविले प्रसंगावधान

आगोंद , दि. ८ (प्रतिनिधी) - पारयेकट्टा- खोला येथील श्रीमती रंगावती पुतू वेळीप (४५) यांच्या घरात आज सकाळी ६.३० च्या दरम्यान एका बिबट्याने प्रवेश करून,तिच्यावर हल्ला केला. प्रसंगावधान दाखवून रंगावतीने बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि त्याला घरात बंद करून ही माहिती शेजाऱ्यांना दिली. जखमी रंगावतीवर मडगावच्या हॅास्पिसिओ इस्पितळात उपचार चालू आहेत, अशी माहिती काणकोण वन्यप्राणी विभागाचे वनाधिकारी परेश परब यांनी दिली .
वनाधिकारी श्री. परब यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसहाच्या सुमारास रंगावती आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवून पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेली होती . त्या परिसरात असलेल्या एका बिबट्याने रंगावतीच्या घरात प्रवेश केला, त्याची कल्पना त्या महिलेला नव्हती. पाणी घेऊन ती महिला परत घरात प्रवेश करताच, त्या बिबट्या वाघाने त्या महिलेवर हल्ला केला व तिला जखमी केले. त्या महिलेच्या डोक्याला,तोंडाला तसेच हाताला वाघाची नखे लागल्याने ती जखमी झाली. ती कशीबशी घराबाहेर येऊन त्यांनी बाहेरून दरवाजा बंद करून कडी घातली व आपला बचाव केला. बिबटा घरात असल्याची माहिती त्या भागातील नागरिकांनी वन्यप्राणी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. लगेच पिंजरा तसेच अन्य प्रकारचे साहित्य घेऊन वनाधिकारी परेश परब आपल्या कर्मचाऱ्यांसह तेथे दाखल झाले. काणकोणचे साहाय्यक वनपाल रमेश देसाई तेथे पोहचले. घरात असलेल्या त्या बिबट्या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करून हत्तीपावल येथील निसर्ग पर्यटन केंद्रात आज दुपारी आणण्यात आले .
बिबट्या वाघाला पिंजऱ्यांत जेरबंद केल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्याला पाहाण्यासाठी हत्तीपावल येथे एकच गर्दी उडाली.आज संध्याकाळी वरिष्ठाच्या आदेशानुसार त्या बिबट्याला बोंडला अभयारण्यात किंवा दाट जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचे वनाधिकारी परेश परब यांनी सांगितले.
पारयेकट्टा या वाड्यावर ३० च्या आसपास घरे आहेत. शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने गाई, म्हशींचे गोठे या भागात आहेत. जंगली जनावरांनी आपला मोर्चा आता गावांकडे वळविल्याचे दिसून येते. रंगावती ही एकटीच या छोट्या घरात राहते, तिचे पती व अन्य कुटुंबीय मुख्य घरात राहतात. रंगावती हिने धाडसाने झुंज देत आपली सुटका करून घेतलीच शिवाय बिबट्यालाही पकडून दिले याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

No comments: