Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 4 March, 2009

पर्येतील घरे पाडण्यासाठी आलेले हात हलवित परतले...!

केरी-सत्तरी, दि. ३ (वार्ताहर): धाट-पर्ये येथील धनगरवाड्यावरील काही घरांवर पाच महिन्यांपूर्वी कारवाई करीत तेथील रहिवाशांना उघड्यावर टाकल्यानंतर आता पुन्हा आणखी नऊ बांधकामे बेकायदा असल्याची नोटिस पाठवून पंचायतीतर्फे कारवाईची आज तयारी केली गेली होती, त्यासाठी पोलिस उपअधीक्षक श्री. सिल्व्हा यांच्यासह पोलिसही आले होते, तथापि मामलेदार व गटविकास अधिकारी न आल्याने पोलिस हात हलवित परतले. दरम्यानच्या काळात एका मंत्र्याचा दूरध्वनी आल्याने अधिकारी फिरकले नाहीत व कारवाई स्थगित करण्यात आली. त्यामुळे धनगरांची घरे वाचली, असे सांगण्यात येते. वाळपईचे गटविकास अधिकारी अरविंद मिश्रा नंतर त्या ठिकाणी येऊन गेल्याची माहिती मिळाली.
बाबू मानू शेळके, केशव शेळके, भागी भावदाणे, भागो शेळके, कोंडो झोरे, धोंडो वरक, नारायण झोरो, भागो चानो शेळके व नारायण भागो झोरो यांच्या घरांवर आज कारवाई केली जाणार होती.या ठिकाणी तीनच घरांना क्रमांक असल्याचे सरपंच हर्षा हेमंत राणे सरदेसाई यांनी सांगितले. बेकायदा बांधकामांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याबद्दल वरिष्ठांकडून जाब विचारला जातो. मागे काही घरे पाडल्यानंतरही संबंधितांनी याबद्दल पंचायतीशी संपर्क साधला नाही, त्यामुळे आजची कारवाई आवश्यक ठरली, असे त्या म्हणाल्या. मिळालेल्या माहितीनुसार धनगरांना मुंडकार हक्क सोडून अन्यत्र राहायला जाण्याची "ऑफर' देण्यात आली होती असे समजते. इंग्रजीत नोटिसा पाठवून, कारवाई करून, गरीब लोकांना छळण्याचा हा उपद्व्याप पंचायतीने बंद करावा, अशी मागणी या भागात केली जात आहे. "सिदाद'सारखे बांधकाम जर वटहुकूम काढून वाचविले जाऊ शकते तर गरिबांना हाच न्याय का लावला जात नाही, अशी चर्चा या भागात सुरू आहे.

No comments: