Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 March, 2009

सकारात्मक विचार हेच प्रत्येक समस्येचे उत्तर

ब्राझिलचे जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार लर्नर यांचे प्रतिपादन

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - नगर नियोजनाच्या बाबतीत राजकीय इच्छाशक्ती, रणनीती, एकसंधता व प्रत्येक समस्येला योग्य पर्यायाची जोड महत्त्वाची ठरते."होय,प्रत्येक गोष्ट शक्य आहे व ती मी करू शकतो'हा सकारात्मक विचार घेऊन पुढे गेल्यास काहीच अशक्य नसल्याची प्रचिती येईल,असे प्रतिपादन ब्राझिलचे जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार तथा माजी गव्हर्नर जेमी लर्नर यांनी केले.
पणजी येथे कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात आयोजित दामोदर धर्मानंद कोसंबी स्मृती व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफताना ते बोलत होते."स्वयंनिर्भर शहर' या विषयावर त्यांनी आज आपले विचार व्यक्त केले.
शहर किंवा नगर ही समस्या नसून तोच मुळी एक उपाय आहे.आपल्या शहराच्या नियोजनाबाबत किंवा विकासाबाबत नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास बदल घडणे अशक्य आहे.मुळात शहराचे नियोजन करताना जनतेला या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची आवश्यकता आहे. दुसरे म्हणजे राजकीय निर्णय घेतल्यानंतर त्याची तडफेने कार्यवाही करण्याची गरज असते. अन्यथा वायफळ चर्चा संपतच नाही. सार्वजनिक वाहतूक ही शहराच्या नियोजनाचा प्रमुख घटक आहे. या वाहतुकीचे योग्य नियोजन झाल्यास अनेक समस्या दूर होतात, असे त्यांनी नमूद केले.
कोणत्याही निर्णयाबाबत जनतेला विश्वासात घेऊन त्यांना योग्य पद्धतीने हाती घेण्यात येणाऱ्या कामाबाबत समजून दिले गेल्यास जनतेचा विरोध होण्याचे कारण नाही व त्यासाठी योग्य समन्वय साधणे गरजेचे असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. व्याख्यानाचे सूत्रसंचालन रितू प्रसाद यांनी केले.वास्तुरचनाकार चार्ल्स कोरीया यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. डीन डिक्रुझ यांच्या हस्ते श्री. लर्नर यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कचरा ही डोकेदुखी नाहीच
कचऱ्याच्या समस्येवर जनजागृती सर्वांत महत्त्वाची आहे. ब्राझिलमध्ये कचऱ्याची समस्या हाताळताना सुरुवातीला सर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना कचरा वेगळा कसा करावा याचे शिक्षण दिले.सहा महिन्यानंतर या विद्यार्थ्यांनी ही माहिती पालकांना दिली. त्यानंतर घरातील वेगळा केलेला कचरा पालिकेच्या वाहनांत भरल्यावर त्या बदल्यात पैसे किंवा फळभाज्या देण्याची पद्धत सुरू केली. कचरा विल्हेवाट प्रकल्प हीच मुळी एक मोठी सुंदर बाग म्हणून विकसित करण्यात आली. त्यामुळे ती जागा त्रासदायक होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही,असे त्यांनी सांगितले. मुळात शहराचा आराखडा हा प्रत्येक नागरिकाला पाठ असायला हवा.शाळेतील विद्यार्थ्यांना आपले शहर कसे आहे हे कळायला हवे तेव्हाच त्यांच्याकडून आपल्या शहराचा आदर केला जाईल.

No comments: