Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 5 December, 2008

गोव्याची गुप्तहेर यंत्रणा खिळखिळी

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोव्यालाही दहशतवादी कारवायांपासून धोका असल्याचे स्पष्ट होत असतानाच पोलिस खात्याचा कणा समजला जाणाऱ्या गुप्तहेर विभागाची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे उघड झाले आहे. गोवा पोलिस खात्याच्या गुप्तहेर विभागात गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केवळ १२० पोलिस आहेत. त्यातील ९० टक्के कर्मचारी राजकीय घडामोडी सामाजिक संघटनाच्या बैठकांतील माहिती आणि पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची छाननी करणे यातच गुंतलेला असतो, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
"गुप्तहेर विभागाच्या "स्पेशल सेल'ला २५० पोलिसांची गजर असून यात सुमारे १५० पोलिसांची चणचण भासत आहे. तसेच या विभागाकडे एकही चार चाकी वाहन नसून संपूर्ण गोव्यात या विभागाकडे केवळ १४ दुचाक्या आहेत. ही माहिती या विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. या विभागाला ४ चारचाकी वाहने, १५ दुचाक्यांची गरज आहे. तसेच कळंगुट या सतत गजबजलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विदेशी मंडळींचा राबता असतो. त्यामुळे तेथील गुप्त माहिती गोळा करण्यासाठी स्पेशल सेल केंद्र सुरू करण्याची गरज आहे. संपूर्ण राज्यात ४ केंद्रे सध्या कार्यरत असून या विभागाची सात "स्पेशल सेल'ची केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. तथापि, "एटीएस' प्रमाणेच या विभागाचाही प्रस्ताव पोलिस मुख्यालयातच धूळ खात पडला आहे, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे.
कळंगुट व कोलवा येथे "स्पेशल सेल' केंद्र सुरू करणे निकडीचे बनले आहे. दहशतवादी कारवाया केंद्रबिंदू ठेवून माहिती गोळा करण्याचे काम या विभागाकडून होत नसल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मान्य केले. म्हापसा येथील गुप्तहेर विभागाला तेरेखोल पेडणे ते बेती वेऱ्यापर्यंत लक्ष ठेवावे लागते. ही बाब व्यावहारिक नसल्याने अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचप्रमाणे खबऱ्यांचे जाळे विणण्याच्या बाबतीतही पोलिसांचा गुप्तहेर विभाग खूपच मागे असल्याचे अनेक गोष्टींवरून स्पष्ट झाले आहे.
"सिमी' या दहशतवादी संघटनेचा रझीउद्दीन नाझीर याला हुबळी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने गोवा आमच्या "हिटलिस्ट'वर असल्याची माहिती दिली होती. त्याला गोवा "टार्गेट' करण्यासाठी "इंडियन मुजाहिद्दीन'चा मास्टरमाईंड सफदर नागोरीने आदेश दिला होता, असा गौप्यस्फोट त्याने पोलिस तपासात उघड केला होता. त्यानंतर दोनवेळा दहशतवाद्यांनी गोव्यात येऊन टेहळणी करून अनेक ठिकाणची छायाचित्रे आणि महत्त्वाची माहिती गोळा केली होती. सफदर नागोरी याचे लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी घनिष्ठ संबंध असल्याने लष्करे ए तोयबा या संघटनेचीही गोव्यावर वक्रदृष्टी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

No comments: