Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 2 December, 2008

आर.आर. पाटील यांचा राजीनामा

विलासराव देशमुखांची गच्छंती अटळ, राजीनामा श्रेष्ठींना सुपूर्द

नवे मुख्यमंत्री सुशीलकुमार की पृथ्वीराज चव्हाण?

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) - मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची खुर्ची गेल्यानंतर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनीही आपला अंतरात्मा जागा झाल्याचे सांगत आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान देशमुख यांचीही उचलबांगडी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईतील अतिरेकी हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील कॉंग्रेस पश्रश्रेष्ठींकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. याबाबत आता श्रेष्ठीच निर्णय घेतील. हायकमांडने घेतलेला निर्णय मला मान्य असेल, असे सांगत श्री.देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय श्रेष्ठींच्या कोर्टात ढकलला आहे.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आर. आर. पाटील तातडीने राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती. तथापि,राजीनाम्याची गरज नाही, असे सांगत यापूर्वी संसदेवर आणि अक्षरधामवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपचे लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांनी कुठे राजीनामे दिले होते, असा उलटसवाल आर.आर. यांनी रविवारी सकाळी केला होता. मात्र २४ तास उलटल्यानंतर आता आर.आर. पाटील यांना उपरती झाली आहे. त्यांचा अंतरात्मा जागा झाला असून, त्यामुळेच आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे.
राजीनामा देण्यासाठी आर. आर. पाटील यांच्यावर प्रचंड दबाव होता. गेल्या शनिवारी शरद पवार आणि आर. आर. पाटील यांची खास भेट झाली होती. त्यानंतरही आर.आर.पाटील यांनी राजीनामा देणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु मिडियातून सातत्याने होणारी टीका आणि जनमताचा रेटा यामुळे आबा अस्वस्थ होते. रविवारी रात्रभर ते धड झोपू शकले नव्हते. आधीच पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे भावनाविवश झालेल्या आबांचा अंतरात्मा अखेर जागा झाला. सोमवारी सकाळीच त्यांनी तातडीने "वर्षा' या अधिकृत निवासस्थानी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवून दिला. आबांच्या जागी आता नवे गृहमंत्री म्हणून माजी गृहमंत्री छगन भुजबळ व जलसंपदामंत्री अजितदादा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
आम्हाला विचारुनच मुख्यमंत्री ठरवा ः राष्ट्रवादी कॉंग्रेस
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्यापूर्वी कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधी आमच्याशी चर्चा करावी, असे ते म्हणाले.
विलासरावांवर संक्रात निश्चित
आमचा पक्ष हा सदैव देशातील जनतेकरिता जबाबदार राहिला आहे. मुबंईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा बेजबाबदारपणा दिसून आल्यास त्या कार्यकर्त्यास पदाचा राजीनामा द्यावा लागेल असे सांगत कॉंग्रेसच्या प्रवक्त्या जयंती नटराजन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
नटराजन पुढे म्हणाल्या की, कॉंग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याच्या नावांबद्दल चर्चा झाली आहे. तथापि, या नावांबद्दल सध्याच काही सांगण्याबाबत त्यांनी नकार दिला. महाराष्ट्राचे प्रभारी तथा केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के.ऍन्टनी दोन दिवसांनी महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .
दरम्यान, पक्षाने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांचे पाहणी मंडळ पाठविल्याची माहितीही पक्षाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
पवारांना कळवून राजीनामा
आज सकाळी आर.आर.पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दूरध्वनी करून राजीनामा देण्याची परवानगी मागितली. नंतर त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना दूरध्वनी केला आणि राजीनामा पाठवित असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या पोलिस उच्चस्तरीय समितीच्या बैठकीला आपण येऊ शकणार नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
त्यानंतर सर्व सरकारी वाहने आपल्या चित्रकूट बंगल्यात सोडून, खाजगी स्कोडा गाडीतून ते सांगली जिल्ह्यातील आपल्या गावाकडे (अंजनी) रवाना झाले. त्यामुळे मुंबईत राजकीय गदारोळ होत असताना आबा येथे नाहीत.
मात्र, आर.आर. पाटील यांनी आपल्या राजीनामापत्रात कोणतेही कारण नोंदविलेले नाही. त्यांचा राजीनामा केवळ एका ओळीचा आहे, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले.
निर्णय श्रेष्ठींना विचारा : विलासराव
परवा कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मी राजीनाम्याची तयारी दाखविली होती. पण अजून त्याबद्दल काहीही संकेत मला प्राप्त झालेला नाही, असा दावा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला आहे.
आज सकाळी "वर्षा' बंगल्यावर पत्रपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, मुंबईवरील हल्ल्‌याच्या संदर्भात माझी काही जबाबदारी असेल तर त्याबद्दल श्रेष्ठींनी निर्णय घ्यावा, तो मला मान्य राहील, असे मी सांगितले आहे.
तुमच्या प्रस्तावावर काय निर्णय झाला, असे विचारता मुख्यमंत्री म्हणाले की, ते आमच्या श्रेष्ठींना विचारा ना. हा प्रश्न मला कसा काय विचारला जाऊ शकतो ?
संपूर्ण पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी स्वत:बद्दल एकदाही "राजीनामा' हा शब्द उच्चारला नाही. मी प्रस्ताव दिला (आय हॅव ऑफर्ड...) यावर ते कायम राहिले. एकदा तर ते म्हणाले की, मी अतिशय स्पष्ट व समजेल अशा शब्दांमध्ये सांगितले आहे. आणि, आपल्या (प्रश्नकर्त्याच्या) आकलनशक्तीवर माझा विश्वास आहे.
आपले काही पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाले आहेत काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, एकाची दुसऱ्याला या पद्धतीने लागण होत असते !
ताज व ओबेराय हॉटेल्सना दिलेल्या भेटीत मुलगा रितेश व चित्रपटनिर्माते रामगोपाल वर्मा यांना सोबत नेण्याचे एकप्रकारे समर्थन करताना विलासराव म्हणाले की, ते काही गुन्हेगार किंवा परदेशी नागरिक नाहीत. आणि, मोहीम संपल्यानंतर अनेक लोक तेथे जाऊन आले आहेत. शिवाय, या दौऱ्याची व्हिडिओ कॅसेट आमच्या सरकारनेच वाहिन्यांना पुरविली. कारण तेथे वाहिन्यांचे प्रतिनिधी नव्हते, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, आमच्या मनात खोट असती तर आम्ही असे केले असते का ?
भुजबळ इच्छुक
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदासाठी छगन भुजबळ हे इच्छुक असून त्यांनी आपली इच्छा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बोलून दाखविल्याची चर्चा आहे. शरद पवार यांना मोबाईलवरून एसएमएस पाठवून आपल्याला एकदा संधी द्यावी, अशी विनंती केल्याचे समजते. मात्र, पवारांनी त्यासंदर्भातील "एसएमएस' राज्यातील अन्य एका मंत्र्याकडे "फॉरवर्ड' केल्याने भुजबळ यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments: