Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 30 November, 2008

अनुसूचित जमात राज्यव्यापी जागृती रथयात्रा आजपासून

कुंकळ्ळी, दि. २९ (प्रतिनिधी) - गोव्यातील गावडा, कुणबी व वेळीप समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळून पाच वर्षे पूर्ण होऊनही या समाजाला त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. राज्यातील सर्व समाजबांधवांना त्यांच्या हक्कांबाबत अवगत करण्यासाठी तसेच सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी "युनायटेट ट्रायबल असोशिएशन अलायन्स' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागृती रथयात्रेला उद्या रविवारपासून प्रारंभ होणार आहे.
ही रथयात्रा ८ डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात फिरवली जाणार आहे. या रथयात्रेदरम्यान संघटनेचे नेतेआमदार रमेश तवडकर,आमदार वासुदेव मेंग गावकर,आमदार पांडुरंग मडकईकर तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संघटनेचे इतर पदाधिकारी व हजारो कार्यकर्तेया यात्रेत सहभागी होणार आहेत. या जनजागृती रथ यात्रेची सुरुवात काणकोण तालुक्यातून होणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता गावडोंगरी काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानातून ही यात्रा सुरू होईल. त्यानंतर १ डिसेंबर रोजी केपे, २ रोजी सांगे, ३ रोजी सावर्डे, ४ रोजी सासष्टी, ५ रोजी तिसवाडी,६ रोजी बार्देश,७ रोजी सत्तरी व ८ रोजी फोंडा तालुक्यात म्हार्दोळ फोंडा येथील क्रांती मैदानावर या रथयात्रेचा समारोप होईल.
या यात्रेत समाजाचे सुमारे ६० हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असून यात्रेनंतर या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाठवण्यात येणार आहे. ही यात्रा पूर्णपणे लोकशाही पद्धतीने होईल,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ८ जानेवारी २००३ साली अथक प्रयत्नानंतर गावडा, कुणबी व वेळीप समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला. प्रत्यक्ष विकासापासून वंचित राहिलेल्या या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेत अनेक अधिकार दिले आहेत. अर्थसंकल्पातील महत्त्वाचा भाग हा या घटकांच्या विकासासाठी वेगळा ठेवण्यात येतो. हे अधिकारी व हक्क या लोकांना देण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचे निमंत्रक रमेश तवडकर यांनी सांगितले.
गोव्यातील या समाजाला त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवले जात असल्याने मुळात या लोकांनाच त्यांचे हक्क काय आहेत, याबाबत जागृत करणे महत्त्वाचे आहे, असे सांगून यामुळेच ही रथयात्रा काढण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या रथयात्रेत या समाजाचे सर्व बांधव सहभागी होणार असून वैयक्तिक मतभेद दूर सारून या घटकाची ताकद या रथयात्रेव्दारे सरकारला दाखवून देण्याचाही हा प्रयत्न असेल,असेही आमदार तवडकर यांनी सांगितले. अनुसूचित जमात आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असले तरी या महामंडळाला आवश्यक निधी पुरवण्यात येत नसल्याने अनेक योजना धूळ खात पडल्या आहेत. केंद्र तथा राज्य सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. आता राष्ट्रपती व पंतप्रधानांचेही दरवाजे ठोठावण्यात येतील,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

No comments: